जंबोजेट जंबोजेट झुईइई हे गाणं आठवत असेल पण हा शब्द आला कसा !
जंबो हा शब्द आपल्याला काही नवा नाही. जे काही मोठ्यात मोठ्या आकाराचं असेल त्या 'साइझ'ला एकच नाव आहे- जंबो !आता या नावामागे नाही म्हटलं तरी २०० वर्षाचा इतिहास आहे.१८८५ साली अमेरीकेतल्या एका सर्कसने -पी टी बार्नमने एक आफ्रीकन हत्ती सर्कशीत आणला.त्याचं नाव ठेवलं 'जंबो' आणि त्यानंतर कोणत्याही मोठ्या अवाढव्य आकाराला 'जंबो' म्हणायची पध्दत सुरु झाली. दुर्दैवाने हा जंबो हत्ती मालगाडीच्या धडकेने मरण पावला. मागे राहीला 'जंबो' हा शब्द !
नंतर वर्षानुवर्षं हा शब्द जाहिरातीत वापरला गेला. या जंबोची चित्रं आणि तो शब्द आजही अनेक कंपन्या वापरत आहेत. फक्त भारताचा विचार केला तरी आजच्या तारखेस जंबो शब्दाशी जोडलेले १०० हून अधिक ब्रँड्स आहेत.
भारतात मात्र 'जंबो हा शब्द भाषेत रुळला तो एअर इंडीयाने जंबो जेट विमानं विकत घेतल्यावर !
सत्तर साली भारतात आलेल्या जंबोजेटने जंबो शब्द वापरात आणला.
जंबोजेटच्या कहाण्यांनी-फोटोंनी पेपरांची पाने भरून वाहत होती.लांब पल्ल्याच्या ताफ्यातले एअर इंडीयाचे पहीले विमान.एअर पोर्टवर ते बघायला प्रचंड गर्दी व्हायची. सुरुवातीचे काही महीने पार्ला अंधेरी -सांताक्रुझ मध्ये लोकं गच्चीवर उभी राहून जंबो दिसायची वाट बघायची. मग जंबो सगळीकडेच दिसायला लागलं.
मुंबईत अंधेरीला नविन सोसायटी आली तिचं नामकरण जंबोदर्शन -बाजूलाच दुसरी सोसायटी आली तिचं नाव विमान दर्शन
मोठं मंत्रीमंडळ आलं ते पण जंबो मंत्रीमंडळ -मोठ्ठ्या थैल्या आल्या त्या जंबो बॅग -मोठा वडापाव जंबो वडापाव.
सगळीकडे जंबो जंबो !!
तुमच्या आमच्या मनात जंबो म्हटलं की एक पिकनीक साँग वाजायला लागतं.जंबोजेट जंबोजेट झुईइई.आता विषय जंबोचा आहे म्हणू ते संपूर्ण गाणंच इथे वाचायला ठेवतोय ! खूप पूर्वी अशोक हांडेंच्या (मराठी बाणा वाले) कार्यक्रमात हे गाणं घेतलं जायचं.
हो, सोबत एक चॅलेंजपण देतो आहे ! हे गाणं कोणी लिहिलं त्या कविचं नाव कमेंटमध्ये सांगा.बरोब्बर उत्तर देणार्यांना पुढच्या भेटीत एक जंबो कॅडबरी नक्की देऊ !
जंबोजेट जंबोजेट
लंडन -मुंबै प्रवास थेट
जगलो वाचलो पुन्हा भेट
जंबोजेट जंबोजेट झुईई...
घराला धडक दाराला कडक
पकडली गाडी आणि निघाला तडक
विमानतळावर शोधतोय स्थळ
भारत सोडून काढतोय पळ
उंच आकाशामधले ढग
चमकून पाही सारे जग
भेदून गेले एक विमान
पंखावरती देऊन ताण
पंखाला त्या पंखे नव्हते
विमानाला शेपूट होते
वायू सागरी तरते जेट
जंबोजेट जंबोजेट झुईइई
विमानात या यानात
नव्हती कसली यातायात
आकाशाला खिडकी होती
डोकावणारी डोकी होती
प्रत्येकाशी सलगी होती
खुर्चीला एक पट्टा होता
फास त्याचा पक्का होता
मुलगी आली माझ्याजवळ
म्हणते गेला विमान तळ
बिअर ड्रिंक्स ऑर्डर स्ट्रेट जंबोजेट जंबोजेट झुईईइ
इथे सेवेला सुंदर गाणी
इथे शिबंदी शौच नहाणी
बिअर ब्रँडी बाटली फुटली
लिंबू सरबत तहान मिटली
इंग्लीश टाईम्स भरपूर वाचा
महाराजाचा होऊन भाचा
एकच फेरी मोठं बजेट
जंबोजेट जंबोजेट झुंईईइइईई
सगळे होते शांत शांत
विमान होते आकाशात
त्यात होतं माथेफिरू
त्यानी केलं काम सुरु
तो म्हणाला पायलटला
विमान वळव बैरुटला
विमान उतरव त्या शेतात
पिस्तूल आहे या हातात
त्यात आहेत सहा बुलेट
जंबोजेट जंबोजेट झुंईईईई
प्रत्येक देशात कस्टम्स आहेत
तपासण्याच्या सिस्टीम्स आहेत
लगेज बॅगेज तपासतात
सारे प्रवासी तपासतात
त्यात असला स्मगलर तर
गोंधळामधे पडते भर
सोन्याची विट त्याच्याजवळ
सामानाची ढवळाढवळ
पोलीस त्याला पकडतात
सारे प्रवासी रखडतात
बाहेर पडायला होतो लेट
जंबोजेट जंबोजेट झुंईईईईई