डॉ. नीना गुप्ता- रामानुजन पुरस्कार मिळवणाऱ्या चौथी भारतीय व्यक्ती आणि तिसरी महिला!! त्यांचं गणिती क्षेत्रातलं कार्य काय आहे?

श्रीनिवास रामानुजन हे जगातले सर्वोकृष्ट गणितज्ञ मानले जातात. रामानुजन यांची महानता जगाने मान्य केली आहे. याच रामानुजन यांचा वारसा जगभरातील गणितप्रेमी पुढे घेऊन जात आहेत. रामानुजन यांच्या नावाने गणित या विषयातील सर्वात मोठा पुरस्कार दिला जातो. यंदाचा रामानुजन पुरस्कार एका भारतीय महिलेला मिळाला आहे. या गणितज्ञ महिलेचे नाव आहे नीना गुप्ता आणि हा पुरस्कार त्यांना मिळणे ही भारतासाठी अभिमानास्पद अशी बाब आहे.

४५ वर्ष वयाखालील गणितज्ञांना हा पुरस्कार दिला जातो. विकसनशील देशांतील तरुण गणितज्ञांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या पुरस्काराची सुरुवात २००५ साली झाली होती. अब्दुस सलाम सेंटर फॉर थेरिटीकल फिजिक्स, भारत सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय गणित परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला जातो.

नीना गुप्ता या कोलकाता येथील इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गणितातील हा प्रतिष्ठीत पुरस्कार जिंकणाऱ्या त्या ४ थ्या भारतीय तर ३ ऱ्या महिला आहेत. गुप्ता यांना अल्जिब्रिक ज्यॉमेट्री आणि कम्युटेटीव अल्जिब्रा या विषयातील त्यांच्या कामगिरीसाठी हा सन्मान प्राप्त झाला आहे.

गुप्ता यांचे गणितातील कार्य खरोखर कौतुकास्पद असेच आहे. २०१९ साली त्यांच्या याच गणितातील योगदानासाठी त्यांना विज्ञान विषयातील महत्वाच्या कामगिरीसाठी देण्यात येणारा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला होता. त्याचप्रमाणे २०१४ साली अल्जिब्रिक ज्यॉमेट्री या विषयातील zariski cancellation problem सोडवून दाखवल्याबद्दल नॅशनल सायन्स अकॅडमीकडून यंग सायंटिस्ट पुरस्कार मिळाला होता.

गुप्ता यांनी सोडवलेला हा प्रॉब्लेम गेल्या काही वर्षांतील सर्वोकृष्ट सोल्युशन म्हणून ओळखला जातो. डॉ. नीना गुप्तांनी कोलकात्याच्या बॅथ्यून कॉलेजमधून गणितात पदवी घेतली होती. तसेच प्राध्यापक म्हणून रुजू होण्यापूर्वी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक्स येथून त्यांनी पीएचडी पूर्ण केली होती.

गुप्ता यांची विशेषता म्हणजे त्यांना लहानपणापासून गणित आवडत असे. इतर अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे आवड वेगळी असली तरी करियरचे सर्वमान्य मार्ग न निवडता त्यांनी गणितातच करियर केले आणि आज त्या गणित या विषयातील तज्ञ म्हणून जगभर प्रसिद्ध होत आहेत.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required