आजच्याच दिवशी क्रिकेट जगताने पाहिली होती इंजमाम उल हकच्या फलंदाजीची जादू, पाकिस्तानला मिळवून दिला होता विजय
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक असे दिग्गज फलंदाज होऊन गेले, ज्यांनी आपल्या फलंदाजीने सर्वांचेच मन जिंकले. त्यापैकीच एक फलंदाज म्हणजे पाकिस्तान संघाचा माजी फलंदाज इंजमाम उल हक. कसोटी क्रिकेटमध्ये ८ हजार पेक्षा अधिक धावा आणि वनडे क्रिकेटमध्ये ११ हजार पेक्षा अधिक धावा करणाऱ्या या फलंदाजाने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले. परंतु त्याच्या कारकीर्दीतील आठवणीतला सामना राहिला तो, १९९२ विश्वचषक स्पर्धेत झालेला न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना. याच सामन्यात त्याने पाकिस्तान संघाला पराभवाच्या तोंडातून बाहेर काढले होते.
आजच्याच दिवशी (२१ मार्च) १९९२ विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने आले होते. हा उपांत्य फेरीचा सामना ऑकलँडच्या मैदानावर पार पडला होता. याच मैदानावर असे काहीतरी घडले होते, ज्याची क्रिकेटच्या इतिहासात नोंद झाली आहे.
ही विश्वचषक स्पर्धा खास असण्याची अनेक कारणे होती. कारण पहिल्यांदाच सर्व संघ रंगीबेरंगी कपडे घालून मैदानात उतरले होते. यापूर्वी सर्व संघ पांढरे कपडे घालून मैदानात जायचे. त्यामुळे खेळाडूंमध्ये देखील उत्साह पाहायला मिळत होता. मार्टिन क्रोच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंड संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार क्रोने जबाबदारी पार पाडत ९० धावांची तुफानी खेळी केली होती. तर केन रुदरफोर्डने ५० धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला ५० षटक अखेर ७ बाद २६२ धावा करण्यात यश आले होते.
पाकिस्तान संघाचे कर्णधारपद इम्रान खान कडे होते. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना त्याने स्वतः तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचा निर्णय घेतला होता. त्याने या धावांचा पाठलाग करताना ४४ धावांचे योगदान दिले. तर दुसऱ्या बाजूने जावेद मियादाद देखील चांगली फलंदाजी करत होता. पाकिस्तान संघाला १५ षटकात १२३ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी ही धावसंख्या देखील खूप मोठी मानली जायची. असे वाटू लागले होते की, पाकिस्तान संघ हा सामना गमावनार आणि न्यूझीलंड संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल.
परंतु म्हणतात ना, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. असेच काहीसे या सामन्यात देखील पाहायला मिळाले. इंजमाम उल हक नावाचा २२ वर्षीय खेळाडू खेळपट्टीवर आला. त्यानंतर त्याने गोलंदाजांवर हल्ला बोल करायला सुरुवात केली. मैदानाचा एकही असा कोणा नसेल जिथे चेंडू गेला नसेल. त्याने चौफर फटकेबाजी केली आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अडचणीत टाकले होते.
न्यूझीलंड संघाकडून सर्वात चांगली गोलंदाजी करणाऱ्या दीपक पटेलने सुरुवातीच्या ८ षटकात केवळ २८ धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या २ षटकात त्याने तब्बल २२ धावा खर्च केल्या. तुफानी फटकेबाजी करत त्याने अवघ्या ३१ चेंडूमध्ये अर्धशतक झळकावले होते.तर ३७ चेंडूमध्ये ६० धावा करत तो धावबाद झाला होता. परंतु त्याने आपले काम केले होते. हा सामना पाकिस्तान संघाने ४ गडी राखून आपल्या नावावर केला होता. तसेच अंतिम सामन्यात इंग्लंड संघाला पराभूत करत पाकिस्तान संघाला जेतेपदावर देखील नाव कोरले होते.