computer

फोटोशॉप, रीडर, इनडिझाईन अशी अडोबी प्रॉडक्ट्स वापरत आहात? त्यांचा तितकाच रंजक आणि सुरस इतिहासही जाणून घ्या!!

'जो जे वांछील तो ते लाहो' ही संत ज्ञानेश्वरांची प्रार्थना बहुधा अडोबी कंपनीने ऐकली असावी. आर्ट किंवा क्रिएटिव्ह फील्डशी संबंधित असलेले हौशी युजर्स, व्यावसायिक, विद्यार्थी, शिक्षक अशा प्रत्येकासाठी अडोबी काही ना काही देऊ करते. फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझाईन, पुस्तकांचे लेआउट्स, मोशन ग्राफिक्स, ॲनिमेशन, इलस्ट्रेशन, वेब डिझाईन, साऊंड एडिटिंग या क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांसाठी अडोबीची सॉफ्टवेअर्स 'मस्ट यूज' सदरात मोडतात.

केवळ आपल्या ग्राहकांसाठीच नाही, तर गुंतवणूकदारांसाठीही ही कंपनी वरदान आहे. गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकींवर चांगला परतावा देणं, मार्केटमध्ये अव्वल स्थानी राहणं आणि ग्राहकांचं समाधान या गोष्टींकडे ही कंपनी काळजीपूर्वक लक्ष पुरवते. इथलं कामाचं वातावरण अतिशय पोषक आहे. वाढीच्या संधी आहेत. चांगल्या कामाबद्दल मिळणारी रीवॉर्ड्स आहेत. थोडक्यात सर्व काही छान छान आहे. पण हे एका रात्रीत उभं राहिलेलं नाही.

अडोबीची स्थापना १९८२ मध्ये चार्ल्स गेश्के आणि जॉन वॉरनॉक यांनी केली. हे दोघं आधी झेरॉक्स कॉर्पोरेशन (आपण जी झेरॉक्स काढून आणतो, ती या कंपनीचीच देन) या कंपनीत ग्राफिक रीसर्चचं काम करत होते. पण त्यांनी विकसित केलेली उत्पादनं रीसर्च स्टेजच्या पुढे जायला तयार नव्हती. म्हणजे झेरॉक्स कंपनी तसं काही होऊ देत नव्हती. शेवटी निराश होऊन दोघांनी कंपनी सोडण्याचा आणि स्वतःचा नवीन उद्योग सुरू करण्याचा विचार केला आणि त्यांच्या घराजवळून वाहणाऱ्या एका खाडीच्या नावावरून अडोबी ही कंपनी जन्माला आली.

त्यानंतर यांनी पोस्ट स्क्रिप्ट नावाचं सॉफ्टवेअर विकसित केलं. मुळात ही एक संगणकीय भाषा होती. तिचा वापर करून कॉम्प्युटरवर साठवलेली कोणतीही इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स जशीच्या तशी प्रिंट करता येत असत. या डॉक्युमेंटमधली कॅरेक्टर्स, त्यांच्यामधलं अंतर किंवा स्पेसिंग, त्या कॅरेक्टर्सची साईझ ही सर्व माहिती पोस्ट स्क्रिप्टच्या माध्यमातून प्रिंटरला पुरवली जात असे. डीटीपी म्हणजेच डेस्क टॉप पब्लिशिंग या तंत्राचा उदय होण्याचा हा काळ. यामुळे प्रिंटिंगमध्ये मोठी क्रांती झाली. प्रिंटिंगचं क्लिष्ट वाटणारं काम आता सोईस्कर बनलं.

पोस्ट स्क्रिप्टचे संभाव्य उपयोग आणि त्याला येऊ घातलेली मागणी लक्षात घेऊन अडोबीने संगणक, प्रिंटर, इमेज सेटर आणि फिल्म रेकॉर्डरच्या निर्मात्यांना पोस्ट स्क्रिप्टचं मार्केटिंग करण्याची परवानगी दिली. पुढे त्यात ऍपलने गुंतवणूक केली.

यापुढचं आव्हान म्हणजे पोस्ट स्क्रिप्ट कुठल्याही मशीनवर चालवता येईल अशा प्रकारे तिचा विकास करणं. यासाठी प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीम आणि हार्डवेअर कॉन्फिगरेशनसाठी चालतील अशी ५००० पेक्षा जास्त पोस्टस्क्रिप्ट ॲप्लिकेशन्स विकसित केली गेली. या लॅंग्वेजचा वापर करून चालवता येतील असे प्रिंटर्स तयार केले गेले. लवकरच पोस्टस्क्रिप्ट मिनी कॉम्प्युटर्स आणि मेनफ्रेम कॉम्प्युटर्सवर वापरता येऊ लागली. एकेक टप्पे पार करत काही दिवसांनी जगभरात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्युटर लँग्वेजेसमधे या भाषेचा समावेश होऊ लागला.

या पोस्ट स्क्रिप्ट लॅंग्वेज प्रणालीला पूरक असं अजून एक तंत्रज्ञान अडोबीने विकसित केलं. ते टाईप वन या नावाने ओळखलं जाऊ लागलं. याचा वापर करून कोणत्याही रेझोल्युशनमध्ये प्रिंट करता येतील अशा प्रकारचे डिजिटल फॉन्ट्स तयार करता आले. त्यानंतर त्यांनी टाईपफेसेस तयार करायला सुरुवात केली. (टाईपफेस हा फॉन्टचाच मोठा भाऊ. उदाहरणार्थ हेल्वेटीका हा झाला टाईपफेस. यात विविध फॉन्ट्सचा अंतर्भाव होतो, ज्यांचं वळण, स्टाईल, अक्षरांची जाडी हे सर्व हेल्वेटीका या विशिष्ट फॅमिलीसारखं आहे.) दरम्यान कंपनीची घोडदौड सुरू राहिली. ती आता पब्लिक कंपनी होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली होती.

अडोबीच्या यशामागे एक महत्त्वाचं सूत्र आहे, ते म्हणजे ॲपलसारख्या उत्पादन कंपन्यांना आपल्या तंत्रज्ञानाचा आणि मार्केटिंगचा परवाना देण्याचं कंपनीचं धोरण. यामुळे अडोबीला विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध झाली.

१९८७ हे वर्ष कंपनीसाठी माईलस्टोन ठरलं. याच वर्षात अडोबी इलस्ट्रेटरचा जन्म झाला. यामुळे उच्च दर्जाची इलस्ट्रेशन तयार करणं शक्य झालं. आजही इलस्ट्रेशन्स आणि ग्राफिक डिझाईनसाठी हे सॉफ्टवेअर मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. अडोबी टाईप लायब्ररी हीही त्याच काळात अस्तित्वात आली. यामध्ये अनेक प्रकारच्या फॉन्ट्सचा संग्रह होता. नंतर ही टाईप लायब्ररी जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरली जाऊ लागली.

या संपूर्ण कालावधीत अडोबीने आपलं बाजारपेठेतील स्थान कायम राखण्यासाठी टाईपफेसचं तंत्रज्ञान गुलदस्तात ठेवलं होतं. इतर स्पर्धकांना तोंड देण्यासाठी हे आवश्यकच होतं. दुसरीकडे गरज पडेल तसे नवनवीन प्रोग्रॅम आणि टूल्स विकसित करणं कंपनीने सुरू ठेवलं. इमेज एडिटिंग, कलर करेक्शन म्हणजेच इमेजमधील रंग सुधारणं, री टचिंग, फोटोमध्ये हवे ते बदल घडवून आणणं या कामांसाठी वापरलं जाणारं फोटोशॉप ही अडोबीने जगाला दिलेली सगळ्यात मोठी देणगी. फोटोशॉप मुळात आर्टिस्ट आणि डेस्कटॉप पब्लिशर्स यांच्यासाठी ॲपल मॅकिंटॉश यांच्या सहयोगाने बाजारात आणलं गेलं. फोटोशॉपचे सर्व अधिकार अडोबीकडे होते.

१९९० चं दशक संपताना कॉम्प्युटर व्यवसायातली तेजीची लाट ओसरण्याची चिन्हं दिसू लागली होती. बदलत्या काळाला सामोरं जाण्यासाठी कंपनीने आपल्या रणनीतीतही काही बदल केले. आता त्यांनी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर ऑपरेट करता येऊ शकेल असं सॉफ्टवेअर बनवायचे प्रयत्न सुरू केले.

कंपनीचा विस्तार करत असताना आणि सातत्याने नवनवीन उत्पादनं बाजारात आणत असताना अडोबीने इतर कंपन्या विकत घेण्याचं धोरण अंगीकारलं. त्यापैकी काही व्यवहार त्यांना चांगलेच फायद्याचे ठरले, तर काहींत हात पोळून निघाले. मात्र एकंदरीत अडोबीच्या महसुलात प्रचंड वाढ झाली. १९९१ मध्ये कंपनीच्या महसुलात तब्बल ३६ टक्क्यांची आणि उत्पन्नामध्ये २९ टक्क्यांची विक्रमी वाढ झाली. १९९२ मध्ये अडोबी दहा वर्षांची झाली. या काळात उद्योग जगतात प्रचंड स्पर्धा होती, त्यामुळे प्रस्थापितांना आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी नवीन नवीन मार्ग शोधणं गरजेचं होतं. काळाच्या गरजा ओळखून अडोबीने व्हिडिओ एडिटिंगसाठी अडोबी प्रीमियर, डॉक्युमेंट प्रोसेसिंगसाठी ॲक्रोबॅट यांसारखी सॉफ्टवेअर बाजारात आणली. पुढील काही वर्षांमध्ये अडोबीने बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी इतर काही कंपन्या आणि विकत घेण्याला प्राधान्य दिलं. पेज मेकर हे पेज डिझाईनिंग सॉफ्टवेअर, आणि ॲनिमेशन, मोशन ग्राफिक्स आणि स्पेशल इफेक्ट्स साठी वापरलं जाणारं आफ्टर इफेक्ट्स हे सॉफ्टवेअर त्याच्या खात्यावर जमा झालं ते याच काळात. फोटो डीलक्स, पेज मेल, फ्रेम मेकर यासारखी काही उत्पादनंही या दशकात अडोबीने बाजारात आणली.

पण म्हणून सगळ्याच आघाड्यांवर गुडी गुडी चित्र नव्हतं. १९९७ मध्ये ह्युलेट पॅकार्ड अर्थात एचपी या कंपनीने पोस्ट स्क्रिप्टचं स्वतःचं व्हर्जन काढलं. त्यामुळे त्यांना अडोबीच्या पोस्ट स्क्रिप्टची गरज उरली नाही आणि त्यांनी अडोबीबरोबरचा करार रद्द केला. जोडीला मायक्रोसॉफ्ट हा मजबूत प्रतिस्पर्धी बाजारपेठेत उतरला होता. भरीत भर म्हणून आशियामध्ये मंदीची लाट असल्याने अडोबीची बाजारपेठ असलेल्या जपानवरही आर्थिक संकटाचे ढग होते.

१९९८ मध्ये कंपनीची आर्थिक स्थिती आजारी असल्यासारखीच होती. हे वर्ष कंपनीच्या दृष्टीने फारच वाईट गेलं. क्वार्क एक्सप्रेस हे पब्लिशिंग आणि पेज डिझाईनचं सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या क्वार्क कंपनीने अडोबीचा घास घेण्याचा प्रयत्न केला. अडोबीने हल्ला परतवून लावला, मात्र त्यांनी आता कंपनीची पुनर्रचना करण्याचं मनावर घेतलं.

पुढचं वर्ष - १९९९ - त्यादृष्टीने फार व्यस्त गेलं. डेस्कटॉप पब्लिशिंग आणि पेज लेआउट करण्यासाठी उपयोगी असणाऱ्या इनडिझाईन सॉफ्टवेअरचा जन्म याच वर्षातला. या इनडिझाईनची लोकप्रियता इतकी वाढली, की त्याने क्वार्क एक्सप्रेस ला अक्षरश: खाऊन टाकलं. आजही त्याचा उल्लेख क्वार्क किलर म्हणून केला जातो. याव्यतिरिक्त इतरही काही सॉफ्टवेअर्सची नवीन व्हर्जन्स अडोबीने या काळात आणली. इनडिझाईनने अल्पावधीत अडोबीचा सर्व तोटा भरून काढला, आणि कंपनीने खऱ्या अर्थाने यु टर्न घेतला. तेव्हापासून कंपनीची घोडदौड आजतागायत सुरू आहे. नवीन उत्पादनं, तंत्रज्ञान आणि कल्पना यांच्या जोरावर मार्केट काबीज करत आहे.

जाता जाता, या कंपनीत अनेक महत्त्वाच्या पदांवर सध्या भारतीय आहेत. सीईओ शंतनू नारायण, चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर अभय पारसनीस, डिजिटल एक्सपीरियन्स बिझनेसचे अनिल चक्रवर्ती यांच्यासारखे भारतीय कंपनीचे नेतृत्व करत आहेत. आपल्यासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required