सर्वात जास्त ऑक्सिजन निर्माण करणारी ६ झाडे!! तुमच्या आसपास यातली किती झाडे आहेत?
ऑक्सिजन जीवनावश्यक आहे. गेल्या २ वर्षांत तर ऑक्सिजनचे महत्व नव्याने सगळ्यांना कळले आहे. इतक्या वर्षांत ऑक्सिजनची एवढी कमतरता कधीही भासली नसेल. वनस्पती ऑक्सिजन तयार करतात. त्यामुळे वृक्षसंवर्धन खूप महत्वाचे ठरते. पण तुम्हाला हे माहित आहे का, सर्वात जास्त ऑक्सिजन निर्माण करणारे वृक्ष कोणते आहेत? आज आपण याच झाडांबद्ल जाणून घेणार आहोत. ही ६ झाडे पर्यावरणासाठी वरदान आहेतच. शिवाय मनुष्याचे आरोग्य वाढवणारी देखील आहेत.
पिंपळाचे झाड
पिंपळाला बौद्ध धर्मात बोधी वृक्ष म्हणून ओळखले जाते. या झाडाखाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्याचे सांगितले जाते. भारतातही पिंपळाला अध्यात्मिक महत्व आहे. हे झाड ६० ते ८० फूट उंच वाढू शकते. हे झाड सर्वात जास्त ऑक्सिजन देते. हे एकमेव असे झाड आहे जे दिवसातून पूर्ण २४ तास ऑक्सिजन देते. प्राचीन काळापासून या झाडाची पूजा केली जाते. म्हणूनच पर्यावरणवादी पिंपळाचे झाड लावायला सांगतात. तसेच गावोगावी तुम्ही पहिले असेल, गावात किमान एकतरी पिंपळाचे झाड लावले जायचे.
हा वृक्ष भिंतीवर, छपरावर, खांबावर, झाडावर, जेथे जागा मिळेल तेथे वाढतो. हा 'मोरेसी' म्हणजे 'वट' लातील वृक्ष आहे. याचे वनस्पतिशास्त्रातील नाव 'फायकस रिलिजिओसा' आहे.
अशोकाचे झाड :
अशोक वृक्ष केवळ ऑक्सिजन निर्माण करत नाही, तर त्याची फुले वातावरण सुगंधित ठेवतात. अशोक वृक्ष लावल्याने पर्यावरण शुद्ध राहतेच. शिवाय निसर्ग सौदर्य ही वाढते. अशोकाला भारतीय भाषांमधून वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. यांत साधा अशोक, पानांचा अशोक आणि लाल-नारिंगी फुलांचा अशोक असे प्रकार आहेत. या फुलाच्या अशोकाला सीतेचा अशोक, रक्ताशोक, रक्तपल्लव, ताम्रपल्लव, तपनीय अशोक, सुवर्णाशोक अशीही नावे आहेत. सर्वात जास्त ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या वृक्षामध्ये अशोकाच्या झाडाचाही समावेश होतो. त्यामुळे ही झाडे आपल्याला जास्त करून कार्यालयासमोर विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
वडाचे झाड
वडाचे झाड वडाच्या झाडाला अक्षयवृक्षही म्हणतात. अक्षय्य म्हणजेच ज्याचा क्षय होत नाही, ते वाढतच राहते. १०० वर्षांपेक्षा जास्त आयुष्य या झाडाला असते. याला भारताचा राष्ट्रीय वृक्ष म्हणूनही ओळखतात. असे म्हणतात, एक तासाला हा वृक्ष ७१२ किलो ऑक्सिजन तयार करतो. म्हणूनच सर्वात जास्त ऑक्सिजन देणाऱ्या झाडांमध्ये या झाडाची गणना होते. हवा शुद्ध ठेवण्याचे कामही वडाच्या झाडामुळे होते. हिंदू धर्मातही याला अत्यंत पवित्र मानले जाते. स्त्रिया याची पूजा करून पतीच्या दीर्घआयुष्याची प्रार्थना करतात.
कडुलिंबाचे झाड
नैसर्गिकरित्या हवा शुद्ध करणारे झाड म्हणजे कडुलिंबाचे झाड! याचे अनेक फायदे आहेत. हे झाड हवेतून कार्बन डायऑक्साइड, सल्फर आणि नायट्रोजन यांसारखे प्रदूषित वायू घेऊन वातावरणात ऑक्सिजन सोडते. त्याच्या पानांची रचना अशी आहे की ते मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तयार करू शकतात. वर्षभर हिरवे राहणारे हे झाड असल्याने वातावरण प्रसन्न राहते. सभोवतालची हवा शुद्ध राहण्यासाठी एकतरी कडुलिंबाचे झाड जवळपास हवेच.
अर्जुनाचे झाड
अर्जुन वृक्षाविषयी असे म्हटले जाते की ते नेहमी हिरवेगार राहते. याचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत. या झाडाचे धार्मिक महत्त्वही खूप आहे आणि असे म्हटले जाते की हे माता सीतेचे आवडते झाड होते. हवेतील कार्बन डाय ऑक्साईड आणि दूषित वायू शोषून ते ऑक्सिजनमध्ये रूपांतरित करतात. अर्जुनाचे झाड वयात आले की एखाद्या त्याची साल आपोआप गळून पडते. मानवाच्या आरोग्यासाठी ती देवासारखी उपयोगी पडते म्हणून त्या झाडाला देवसाल, शक्रतरू, इन्द्रू अशी इंद्राची नावे आहेत. नदीकाठी अर्जुनाची चांगली वाढ होते म्हणून याला नदीसर्ज असे नाव आहे.
बांबू
बांबू हा वृक्ष नाही. वनस्पतीशास्त्रानुसार हे एक प्रकारचे गवतच आहे. हे गवत प्रकारात मोडते, कारण त्याची वाढ सर्वात जलद होते. बांबूची शेते यामुळेच एखाद्या जंगलासारखी दिसतात. बांबूचे जंगल हवा ताजी आणि शुद्ध करण्यासाठीही फायदेशीर ठरते. इतर झाडांच्या तुलनेत बांबूचे झाड ३० टक्के अधिक प्रमाणात ऑक्सिजन तयार करते. बांबू जवळपास ७५ फुटांपर्यंत वाढू शकते. बांबूपासून अनेक उत्पादने तयार होतात. तसेच याचा ऑक्सिजन निर्मिती साठीही उपयोग होतो.
शीतल दरंदळे