श्रीलंका आणि पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांना आपण का मदत करतो ?
आजच्या बोभाटाच्या लेखाचा विषय आहे श्रीलंका आणि पाकीस्तान या दोन शेजारी देशातील अनेक प्रश्नांचा पण आपण सुरुवात करू या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या एका अभंगापासून!
ही सुरुवात थोडी विचित्र वाटेल पण अभंगाच्या नेमक्या दोन ओळी वाचूनच पुढे जाऊ या.
सेजेचा एकांत अगीपाशी कळे।
झाकलिया डोळे अध:पात।
या ओळींचा अर्थ असा की आजूबाजूला आग धुमसत असताना डोळे मिटून पडण्यासारखा दुसरा मोठा धोका नाही.
थोडक्यात सांगायचे असे की दोन्ही बाजूच्या शेजाऱ्यांची घरे जळत असताना आपले घर सुखरूप राहील याची शाश्वती नाही
परकीयांचे कर्ज ,त्यावर थकलेले व्याज आणि झोळीत चार दिवस पुरेल इतकाच शिधा ही श्रीलंकेची अवस्था आहे.श्रीलंकेच्या गळ्याभोवती चीनी सावकाराचा फास आहे पाकिस्तानचे हात लाचारीसाठी अमेरिकेसमोर जोडलेले आहेत. पाकिस्तानला केवळ नागरी मदत या नावाखाली दरवर्षी अमेरिका ५ बिलियन डॉलर त्यांच्या झोळीत घालते. पाकिस्तानात निवडणूका आल्या की अमेरिका पैसे देते, अफगाणिस्तानात युध्द झाले पाकिस्तानला पैसे देते.लष्करी संसाधनांसाठी पैसे अमेरिका देते.त्याखेरीज सौदी अरेबिया, ब्रिटन झोळीत भर घालतच असतात.थोडक्यात जावयाचे घर सासरा चालवतो आहे आणि जावई सासर्याच्या ताटाखलचे मांजर आहे.
श्रीलंका अनेक वर्षे अंतर्गत बंडाळीला तोंड देत होती.सिंहली आणि तामिळ या आपसातल्या संघर्षात देशाची अवस्था बिकट झाली होती.
भारताने या संघर्षात वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न केला.भारताने शांतिसेना (IPKF) तेथे पाठवली.समेट घडवून आणण्याचे प्रयत्न केले.
आपले पंतप्रधान राजीव गांधी श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना त्यांच्यावर जो हल्ला झाला त्या प्रसंगाला फारसे राजकीय महत्व दिले नाही.त्यानंतर श्रीलंकेतल्या यादवीमुळेच राजीव गांधींची हत्या झाली.
ग्लोबलायझेशनच्या वाटेवर असलेल्या भारताला ही सर्वात मोठी किंमत केवळ श्रीलंकेमुळे मोजावी लागली.असे असूनही भारताने सौख्य साधण्याचाच प्रयत्न केला.पण ही राजकीय गैरसमजाची दरी बुजवायचे प्रयत्न श्रीलंकेने केले नाहीत आणि दुरावा कायम राखला.
हा इतिहास इथे उगाळायचे कारण असे की नंतरच्या काळात श्रीलंकेने चीन सोबत घरोबा केला आणि प्रचंड मोठे कर्ज घेतले.
आज त्याच कर्जाची परतफेड करणे अशक्य झाले आहे आणि श्रीलंकेचे एक संपूर्ण बंदर चीनच्या कब्जात आहे.
श्रीलंकेची अवस्था तुकोबांच्या अभंगात सांगीतली तशी आहे.
ऋणाच्या परिहारा जालों वोळगणा
द्यावी नारायणा वासलाती
आजवरी होतो धरुनी जिवासी
व्याजे कासाविसी बहू केले
आता प्रश्न असा आहे की इतका सगळा इतिहास असताना भारत श्रीलंकेला मदत का करतो आहे ?
१ trans-shipment करण्यासाठी भारतीय निर्यातदार कोलंबो बंदरावर अवलंबून आहेत. भारताच्या ६०% ट्रान्सशिपमेंटचा व्यवहार कोलंबोतून होतो.देशाबाहेर एका जहाजातून दुसर्या बंदरात पाठवलेला माल काही प्रमाणात पुन्हा एकदा नव्या जहाजात भरणे म्हणजे ट्रान्सशिपमेंट.
२ भारतातून श्रीलंकेला दरवर्षी ४.८ बिलियन डॉलरचा माल पाठवला जातो. आपल्या एकूण निर्यातीच्या १.३% व्यापार श्रीलंकेत होतो.
३ पर्यटन- रिअल इस्टेट-कारखाने -पेट्रोलियम या क्षेत्रात भारताने मोठी गुंतवणूक केली आहे.भारताची एफडीआय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात आहे.
४ श्रीलंकेतील तमिळ- सिंहली संघर्ष अजूनही संपलेला नाही.अशा अस्थिर राजकीय स्थितीत पुन्हा एकदा वाद उफाळला तर भारतातील अनेक छुपे तमिळ समर्थक पाठींबा देतील. परिणाम अर्थातच आपल्याला भोगावे लागतील.
५ सगळ्यात महत्वाचे कारण आता समजून घेऊ या. गेली अनेक वर्षे अमेरिका (आणि आता चीन ) श्रीलंकेत लष्करी तळ स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताने हे मनसुबे आतापर्यंत तरी उधळून लावले आहेत पण श्रीलंकेत अशीच स्थिती राहिली तर ? हा मोठा प्रश्न आहे.
पाकिस्तानातील राजकीय अस्थिरतेचा आपल्याला वेगळ्या प्रकारे धोका आहे तो असा.
१ पाकिस्तानातील लोकशाही लष्कर प्रमुखांच्या हातातले बाहुले असते हा आतापर्यंतचा इतिहास आहे.भारतासोबत कुरबुरी वाढवत राहणे ही पाकिस्तानी लष्कराची निरंतर गरज आहे. उघड उघड लाढाई पुकारण्यापेक्षा आतंकी परिवाराला मदत करून भारताचे नुकसान करत राहणे हे पाकिस्तानी लष्कराचे उद्दीष्ट असते हे आतापर्यंत बर्याच्वेळ सिध्द झाले आहे.नाममात्र का होईना लोकशाही राजवट असली की या प्रकारांना खिळ बसते. म्हणून पाकिस्तानात सशक्त लोकशाही असणे ही आपली गरज आहे.
२ दुसरे कारण असे की मध्य आणि मध्यपूर्व आशियातील आतंकवादींना भारतात थेट प्रवेश सहज करता येत नाही कारण पाकिस्तान आपल्यासाठी एखाद्या 'बफर' सारखे म्हणजे उशीसारखे काम अप्रत्यक्षरित्या करते. जर पाकिस्तानातील राजवट दुबळी पडली तर या गटांना 'डायरेक्ट अक्सेस' मिळू शकतो.
थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या सुरक्षेसाठी शेजार्यांची घरे सुरक्षित असावी म्हणून आपल्याला दोन्ही शेजारी राष्ट्रांना सांभाळून घ्यावे लागते.