दोन्ही बाजूला मर्तिकाची दुकानं आणि मध्ये सौंदर्यप्रसाधनांचं दुकान! बाजूचे लोक ते चालू देईनात म्हणून या बाईने केला भन्नाट प्रयोग!!

"If you think you're too small to have an impact, try going to bed with a mosquito."-Anita Roddick..
शुद्ध मराठीत सांगायचं तर जेव्हा तुम्ही स्वतःला फार लहान समजता, तेव्हा डास असलेल्या खोलीत झोपून पाहा; किरकोळ दिसणारी गोष्टही किती परिणाम घडवून आणू शकते याचं तुम्हाला प्रात्यक्षिक मिळेल. हे विधान केलंय अनिता रॉडीक नावाच्या एका उद्योजिकेने.
आता ही अनिता रॉडीक कोण हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर ती आहे द बॉडी शॉप या सौंदर्य प्रसाधनांच्या ब्रँडची संस्थापक. तिने हा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यातून फार पैसेबिसे कमावण्याची तिची मनीषा नव्हती. तिची स्वप्नंही साधीच होती. तिला फक्त घर चालवण्यासाठी पैसे मिळवायचे होते. उद्योजक किंवा व्यावसायिक म्हटलं की पैशाची भूक असलेली, अति महत्त्वाकांक्षी अशी व्यक्ती समोर येते. अनिताचं मात्र तसं नव्हतं. मोठा उद्योग, भरपूर पैसा, तारांकित लाईफस्टाईल असलं काहीही तिच्या डोक्यात नव्हतं. संपूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून बनवलेली सौंदर्यप्रसाधनं तिला बनवायची होती आणि ती विकून मोठ्या प्रमाणावर पैसे कमावण्यापेक्षा पर्यावरण विषयक प्रश्नांकडे लोकांचं लक्ष वेधण्यात तिला जास्त रस होता.
फार मार्केटिंग न करताही अनिताने एक वेगळंच तंत्र अवलंबून आपला व्यवसाय १६०० कोटी डॉलर्सपर्यंत नेऊन ठेवला. ती स्वतः इंग्लंडमधल्या श्रीमंत स्त्रियांपैकी एक म्हणून गणली जाऊ लागली. हे सगळं कसं घडून आलं? त्यासाठी तिची संपूर्ण गोष्ट वाचा.
अनिताचा जन्म एका इटालियन कुटुंबात झाला. हे कुटुंब इंग्लंडमध्ये स्थलांतरित झालं होतं. तिने भविष्यात शिक्षिका व्हावं म्हणून तिच्या आईने बरेच प्रयत्न केले. पण अनिता मुळातच धाडसी आणि वेगळ्या वाटेने चालणारी होती. वर्गाच्या चार भिंतींच्या आत राहणं तिला जमण्यासारखं नव्हतं. आणि शेवटी तिच्या मनाने बंड केलंच. युरोप, साऊथ पॅसिफिक, आफ्रिका अशा बऱ्याच ठिकाणी तिने प्रवास केला. हिप्पींप्रमाणे मन मानेल तिकडे जायचं, हवं तसं मुक्त स्वच्छंदी जगायचं हाच तिचा कार्यक्रम होता. पण या निमित्ताने तिला एका वेगळ्या जगाची ओळख झाली. ते म्हणजे तिने पाहिलेल्या, अनुभवलेल्या शहरी संस्कृती पलीकडचं तिसरं जग. प्रवासादरम्यानच तिसऱ्या जगाच्या चालीरीती, आचार विचार, संस्कृती, परंपरा, श्रद्धा, जीवनशैली, आरोग्य विषयक संकल्पना यांच्याशी तिची ओळख झाली.
पुढे इंग्लंडला परतल्यानंतर १९७० मध्ये तिचं लग्न झालं. लग्नानंतर तिने आणि तिच्या नवऱ्याने मिळून एक छोटं रेस्टॉरंट सुरू केलं. पाच-सहा वर्ष त्यांनी अशा प्रकारे काढली. १९७६ मध्ये तिच्या नवऱ्याने तिच्यापुढे एक प्रस्ताव ठेवला. खूप दिवसांपासूनचं त्याचं एक स्वप्न होतं : अर्जेंटिनामधल्या ब्यूनॉसआयरेस शहरापासून न्यूयॉर्कपर्यंत घोड्यावरून प्रवास करायचा. त्याला आता ते पूर्ण करण्याचे वेध लागले होते. विशेष म्हणजे अनिताने त्याला पूर्ण पाठिंबा दर्शवला. त्याच्या या प्रवासासाठी पैशाची तजवीज करण्यासाठी तिने रेस्टॉरंट विकण्याचीही तयारी दाखवली. तो असं काही स्वप्न बघत होता हेच अनितासाठी खूप मोलाचं होतं.
पण नवऱ्याच्या अनुपस्थितीत तिला स्वतःसाठी आणि दोन मुलींसाठी पैसे मिळवणं भाग होतं. मग तिने एक दुकान सुरू करायचं ठरवलं. आधी केलेल्या प्रवासादरम्यान तिने नैसर्गिक सौंदर्यप्रसाधनांबद्दल जे ज्ञान मिळवलं होतं त्याचाच तिने आता उपयोग करून घ्यायचं ठरवलं.
सगळ्यात पहिली पायरी होती कर्ज मिळवण्याची. ते वाटलं तितकं सोपं नव्हतं. केवळ तिचा पेहराव साधा असल्याच्या कारणावरून बँक मॅनेजर तिला कर्ज द्यायला तयार होईना. शेवटी नवऱ्याच्या मदतीने खटपटी लटपटी करून तिने साडेसहा हजार डॉलर्सचं कर्ज मिळवलं. मग तिने आपली नैसर्गिक सौंदर्यप्रसाधनं बनवण्यासाठी एका स्थानिक जडीबुटीवाल्याला हाताशी धरलं. नंतर ब्राईटन येथे तिने आपलं 'द बॉडी शॉप' हे दुकान उघडलं. पण यातही बऱ्याच अडचणी होत्या. तिच्या शेजारी दोन्ही बाजूंना असलेली दोन दुकानं म्हणजे फ्यूनरल पार्लर्स होती. त्यांच्याकडूनही तिला बऱ्याचदा आडकाठी निर्माण व्हायची. तिच्या दुकानाच्या दोन्ही बाजूंना शवपेटीचं चित्र असलेले डिस्प्ले होते, जे दिसायला फारच विचित्र दिसायचं. अर्थात अनिताची त्याबद्दल तक्रार नव्हती. तिला जे काही मिळालं होतं त्यात ती समाधानी होती. पण तिच्या शेजारचे दुकानदार मात्र चांगलेच नाराज होते. त्यांना आपल्या दुकानाच्या शेजारी 'द बॉडी शॉप' अशी अक्षरं मिरवणारं दुकान नको होतं. त्यांच्या मते असं दुकान त्यांच्या दुकानाशेजारी असणं म्हणजे त्या मृत आत्म्यांचा एक प्रकारे अवमान करण्यासारखं होतं. शेवटी त्यांनी तिला सांगितलं, एक तर तुमचं दुकान बंद करा किंवा दुकानाचं नाव तरी बदला. अनिता दोन्हीसाठी तयार नव्हती. नाव बदलायला तिची तयारी नव्हती. कारण नावाची पाटी बनवून घेण्यासाठी तिने नुकतेच ७०० पौंड खर्च केले होते. दोघांमधला वाद सुरूच राहिला.
दुसऱ्या बाजूला प्रत्येक आघाडीवर अनिताला काटकसर करावी लागत होती. दुकानात मूलभूत सोयीसुविधा, त्यातल्या त्यात आकर्षक रीतीने कशा उपलब्ध करून देता येतील याचं गणित जमवावं लागत होतं. भिंतीला आलेली ओल आणि डाग लपवण्यासाठी तिने दुकानाला हिरवा रंग दिला. सौंदर्यप्रसाधनांच्या रिकाम्या बाटल्या घेऊन येणाऱ्या ग्राहकांना तिने सूट द्यायला सुरुवात केली. पॅकेजिंगवरचा अनावश्यक खर्च कमी केला. ही सौंदर्य प्रसाधनं सुगंधी बनवण्यासाठी तिने एक वेगळाच उपाय शोधला: परफ्युम ऑइलचा वापर. पारंपरिक परफ्युमपेक्षा परफ्युम ऑइल तुलनेने स्वस्त. त्यामुळे आलेल्या गिऱ्हाईकांना ती अनेक बाटल्यांमधून त्यांच्या पसंतीचे ऑइल निवडू द्यायची आणि त्याच्या साहाय्याने शाम्पू किंवा वेगवेगळी लोशन्स यासारखी प्रसाधनं सुगंधित बनवायची.
तिने बनवलेली उत्पादनं संपूर्णतः नैसर्गिक आणि हटके होती. जोडीला उत्तम जनसंपर्क, प्रशिक्षित स्टाफ यांच्या साह्याने तिने या कंपनीला तिच्याही नकळत एक वेगळी उंची प्राप्त करून दिली. अल्पावधीत तिचं नाव झालं. 'द बॉडी शॉप'च्या शाखा वाढू लागल्या. कंपनीची वेगाने घोडदौड सुरू झाली. यात अर्थातच तिच्या सोशल ऍक्टिव्हिटीजचा भाग मोठा होता. पर्यावरणपूरक उत्पादन, पॅकेजिंगचा कमीत कमी वापर करून जंगलतोडीला आळा, आपल्या उत्पादनांच्या चाचण्या प्राण्यांवर न करणं यासारख्या अनेक गोष्टींमधून तिला प्रसिद्धी मिळत गेली. याचाही फायदा त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होण्यासाठी झाला.
जाहिराती आणि पब्लिसिटी यांच्यावरचा खर्च तिच्या स्टोरी टेलिंग माध्यमाच्या उपयोगामुळे बराच कमी झाला. त्याची सुरुवात कशी झाली त्याचा किस्सापण मनोरंजक आहे. शेजारच्या दुकानदारांशी तिचे कायम खटके उडत आणि कोणीच माघार घ्यायला तयार नसे. तेव्हा शेवटी अनिताने एक युक्ती शोधून काढली. थोडीशी धोकादायक, पण तरीही परिणामकारक. तिने एका स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यालयात निनावी कॉल केला आणि एक गोष्ट सांगितली.
तिने सांगितले, की ती स्वतः 'द बॉडी शॉप' नावाच्या एका दुकानाची मालकीण आहे. लोकांना ते शहरातलं सेक्स शॉप वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते एक सौंदर्यप्रसाधनांचं दुकान आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तिला काही माफियांकडून धमक्या येत आहेत. तिचा स्वतःचा नवरा बाहेरगावी गेला असून दोन मुलांसह ती सध्या एकटीच राहते. या स्टोरीने चांगलीच खळबळ उडवून दिली. गंमत म्हणजे त्यानंतर तिच्या शेजाऱ्यांनी तिला फोन करून त्रास देणंही बंद केलं.
पण यातून तिला एक नवीनच गोष्ट समजली. ती म्हणजे तिला स्टोरी टेलिंग किंवा कथाकथन या विषयात गती आहे. त्याचाच उपयोग तिने आपल्या दुकानासाठी करून घ्यायचं ठरवलं. तेव्हापासूनच 'द बॉडी शॉप'ची जाहिरात म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी हे समीकरण बनवून गेलं. प्रत्येक वस्तूचं उत्पादन म्हणजे एक स्वतंत्र गोष्ट होती. ते कसं बनलं, त्याच्या निर्मिती प्रक्रियेत तिने काय काय चुका केल्या यांचे मनोवेधक किस्से. तिचं स्टोरी टेलिंग इतकं प्रभावी होतं की संपर्कात आलेल्या प्रत्येकाला ती आपल्या उत्पादनांबद्दलची खात्री पटवून देऊ शकत असे.
'द बॉडी शॉप'च्या यशात त्यांची उत्पादनं, सामाजिक बांधिलकी, नैतिक मूल्यं यांचा महत्त्वाचा वाटा असला तरी त्यापेक्षाही जास्त मोठा वाटा अनिताच्या स्टोरी टेलिंग च्या कौशल्याचा आहे. कुठल्याही गोष्टीची विक्री करणं हे खूप कौशल्याचं काम आहे आणि अनेकदा विक्रेते त्या वस्तूलाच केंद्रस्थानी मानतात. पण त्यापलीकडे जाऊन तिच्याशी संबंधित छोट्या छोट्या स्टोरीज किंवा किस्से सांगून तुम्ही समोरच्याच्या मनाचा ठाव घेऊ शकलात, तर नक्कीच त्याचा उत्तम परिणाम दिसतो. 'द बॉडी शॉप'ने हेच दाखवून दिलं आहे.
स्मिता जोगळेकर