computer

मटणाच्या रश्श्यात रोगजंतू मिसळून तो पिऊन या डॉक्टरने एक महत्त्वाचा वैद्यकीय शोध लावला...

ऑस्ट्रेलियाच्या त्या डॉक्टरसाठी गेल्या अनेक वर्षांपासून एक कोडं सुटलं नव्हतं. ते म्हणजे अल्सरचे गंभीर अवस्थेतले  पेशंट्स. इतके गंभीर, की काहींचं आतड्याचं थेट ऑपरेशनच करावं लागायचं तर काहींना मरेस्तोवर रक्तस्त्राव व्हायचा. त्या डॉक्टरचं नाव होतं बॅरी मार्शल. तो साधा इंटर्नशिप करणारा डॉक्टर होता. आता अल्सर हे काही फार गंभीर दुखणं समजलं जात नाही, त्याच्यावर सहजसोपे उपचार आहेत.पण त्या काळी तसं नव्हतं.
 
१९८१ मध्ये मार्शलने रॉबिन वॉरेन नावाच्या पॅथॉलॉजिस्टसोबत काम करायला सुरुवात केली.सर्पिलाकार आणि मजबूत असे हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाचे जिवाणू आतड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वस्ती करून असतात असं या रॉबिनने शोधून काढलं होतं. अल्सरच्या रुग्णांची बायोप्सी करून आणि प्रयोगशाळेत त्यातील सूक्ष्मजीवांचं कल्चर तयार करून मार्शलने फक्त अल्सरच नाही तर आतड्याच्या इन्फेक्शनसह पोटाच्या कर्करोगा साठीही हे जिवाणू जबाबदार असल्याचा  शोध लावला. त्याच्या लक्षात आलं, की प्रतिजैविकं हा यासाठी सहजरीत्या उपलब्ध होऊ शकणारा उपचार आहे. पण बाकीची तज्ञ मंडळी मात्र जुन्या गोष्टींना सोडण्यास तयार नव्हती कारण त्यांच्या मते अल्सर हा तणावामुळे उद्भवणारा आजार होता. 

 

संशोधनाला दिशा मिळाली तरी त्यात अडथळे फार होते. एक तर त्याला प्रयोगशाळेतल्या उंदरांचा अभ्यास करणं शक्य नव्हतं आणि इतर माणसांवर प्रयोग करण्यास मनाई होती. मार्शल मनोमन हताश झाला, पण शेवटी त्याने या हताशेवर मात करायचं ठरवलं. या प्रयोगासाठी माणूस म्हणून तो केवळ एकाचीच निवड करू शकत होता... त्याची स्वतःची. 
आता त्याचा प्रयोग सुरू झाला. यात त्याने एका आजारी रुग्णाच्या आतड्यातून हेलिकोबॅक्टर पायलोरीचे जिवाणू काढून घेतले. मटणाच्या रश्श्यामध्ये ते मिसळले आणि तो तो रस्सा प्यायला. काही दिवसांनंतर त्याला गॅस्ट्राइटीस झाला. याला 'अल्सरचा अग्रदूत' असंही म्हणतात. या काळात सततच्या उलट्या, श्वासाला दुर्गंधी येणं, थकवा ही लक्षणं त्याला आढळून आली. या शारीरिक बदलानंतर त्याने स्वतःच्या आतड्याची बायोप्सी केली. जिवाणूंचं संवर्धन केलं. बायोप्सीमध्ये हे जिवाणू सर्वत्र असल्याचं आढळून आलं आणि अल्सरचं मूळ कारण बॅक्टेरिया असल्याचंही सिद्ध झालं. त्यांच्या या संशोधनासाठी मार्शल आणि वॉरेन यांना २००५ चं नोबेल पारितोषिक मिळालं. प्रतिजैविकं हे अल्सरची काळजी घेण्याचं प्रमुख साधन मानलं जातं. 

पण मुळात ते अल्सरच्या शोधाकडे कसे वळले? विसाव्या शतकापूर्वी अल्सर झाला की त्या रुग्णांना डॉक्टर तुम्ही तणावाखाली आहात असंच सांगायचे. एकोणिसाव्या शतकात युरोप आणि अमेरिकेत अशा लोकांवर केले जाणारे उपचारही फार बरे नव्हते. नंतर मात्र परिस्थिती थोडीशी सुधारली. ऐंशीच्या दशकापर्यंत डॉक्टरांनी अल्सरसाठी शस्त्रक्रिया विकसित केली होती. 

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सगळ्या मानवजातीलाच हेलिकोबॅक्टर पायलोरीची लागण झाली होती. या आजारात सामान्य परिस्थितीत बाधित व्यक्ती आयुष्य नेहमीप्रमाणे जगू शकते, तेही कुठलीही लक्षणे न दिसता. पण पोटात एक व्रण तयार होतो. हाच अल्सर. जठरामध्ये असलेल्या आम्लामुळे अल्सर अत्यंत वेदनादायी बनतो. जेवल्यावर पोटात गेलेले अन्न या आम्लाला तात्पुरतं बाजूला सारतं. पण अन्नपचन आल्यावर हे आम्ल परत येतं आणि अल्सर च्या मुळापाशी जाऊन तो भाग आच्छादून टाकतं. परिणामी परत वेदना सुरू होतात.  शस्त्रक्रियेनंतर काही लोकांना बरं वाटतं, पण अंदाजे २५ टक्के लोक पोटाच्या इतर तक्रारींनी त्रस्त होतात. 

जसं विज्ञानाने प्रगती केली तसं अल्सर एक्स-रे मशीनद्वारेही पाहता येतो, हे डॉक्टरांच्या लक्षात आलं. पण अशी मशीन फक्त न्यू यॉर्क, लंडन अशा मोठ्या शहरांतच होती. इथल्या डॉक्टरांनी, त्यांच्या काही निरीक्षणांवरून, कामाचा ताण जास्त असलेल्या आणि मोठ्या प्रमाणावर धूम्रपान करणाऱ्या व्यावसायिकांना अल्सरचा त्रास होतो असा शोध लावला. 

नंतर शास्त्रज्ञांनी उंदरांमध्ये अल्सर 'घुसवायला' सुरुवात केली, तेव्हा उंदरांना अँटासिड दिल्यास ताणामुळे होणाऱ्या अल्सरपासून ते वाचू शकतात हे त्यांच्या लक्षात आलं. यावरून डॉक्टर लोकांनी आंधळेपणाने ताण, अल्सर, आणि ॲसिड यांचा परस्परसंबंध जोडून टाकला. वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यांनी अल्सर आणि पोटाच्या कर्करोगाच्या रुग्णांच्या बायोप्सीमध्ये हा जिवाणू पाहिला होता. त्याची रचना एकसारखी होती. 

हेलिकोबॅक्टर हा जिवाणू तसा महाप्रतापी. तो शरीरात शिरल्यानंतर थेट माणसाच्या रोगप्रतिकारशक्तीचाच ताबा घेतो. त्यामुळे त्याच्याविरुद्ध लस विकसित करणं खूप अवघड आहे. मग त्याच्यावर पर्याय म्हणून हेलिकोबॅक्टरवर इतर एखाद्या रोगावरची लस लोड करून ते डिलिव्हरी सिस्टीम म्हणून वापरता येऊ शकते का हे संशोधन झालं.

सध्या इन्फ्ल्यूएंझा विषाणूच्या पृष्ठभागावर असणारी प्रथिनं आणि हेलिकोबॅक्टर यांचं क्लोन तयार करून ते दह्यासारख्या उत्पादनांमध्ये मिसळून त्यापासून औषध बनवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. हे औषध घेतल्यानंतर तीन दिवसात जठराचा संपूर्ण पृष्ठभाग हेलिकोबॅक्टरच्या विकसित रूपाने व्यापलेला असेल आणि त्यातून हवी असलेली प्रतिकारशक्ती मिळेल असा प्रयत्न आहे.
बघूयात हा प्रयत्न यशस्वी होतो का ते...

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required