computer

अपयशांसोबत सामना केलेला ई-काॅमर्सचा शहेनशहा - जेफ बेझोस!! याचे यश माहित असेल, पण फसलेले प्रोजेक्ट्स माहित आहेत का?

आज आम्ही ज्याच्याबद्दल तुम्हांला सांगणार आहोत, तो एक अब्जाधीश आहे, एका बलाढ्य ई-काॅमर्स कंपनीचा माजी अध्यक्ष आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारीही आहे. बरेच वर्षांपूर्वी हायस्कूल ग्रॅज्युएशनच्या समारंभामध्ये त्याने एक छोटसं भाषण दिलं होतं. त्यात तो म्हणला होता की "मी पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या दोन किंवा तीन लाख लोकांसाठी अंतराळातील हॉटेल्स, मनोरंजन पार्क, नौका विहार आणि वसाहती तयार करू इच्छितो. माझे अंतिम उद्दिष्ट हे आहे की पृथ्वीचे जतन करण्यासाठी इथल्या सर्व लोकांना अंतराळात वसवणे आणि पृथ्वीचे रूपांतर एका मोठ्या राष्ट्रीय उद्यानात करणे".

१९८२च्या हायस्कूल ग्रॅज्युएशनमध्ये त्याने दिलेल्या भाषणाचा विचार केला, तर हा त्याचा खरा पॅशन प्रोजेक्ट असू शकतो. प्रत्यक्षात ब्लू ओरिजिन ह्या त्याच्या एरोस्पेस कंपनीमार्फत आपले स्वप्न पूर्ण करण्याचा त्याचा प्रवास सुरू झाला आहे.

ज्या काळात कित्येक देशांमध्ये मुळातच काॅम्प्युटरचा प्रसार झाला नव्हता, तेव्हा न्यूयॉर्कच्या हेज फंड कंपनीतील नोकरी सोडून ह्या युवकाने अमेरिकेतील सिॲटल इथल्या एका घराच्या गॅरेजमध्ये आपली कंपनी स्थापन केली. वर्ष होतं १९९५. खरं तर त्या वेळी इंटरनेटचा प्रसार सर्वदूर झाला नव्हता, अशा वेळी ई-काॅमर्स वेबसाईट सुरू करण्याचा निर्णय धाडसीच म्हणायचा.

ती ई-काॅमर्स वेबसाईट म्हणजे ॲमेझॉन. आणि तो युवक होता जेफ्री प्रेस्टन बेझोस उर्फ जेफ बेझोस.

१६ जुलै १९९५ रोजी ॲमेझॉन वेबसाईटने ऑनलाइन बुकस्टोअर म्हणून पदार्पण केले. इंटरनेटच्या भविष्याविषयीचा अहवाल वाचल्यानंतर बेझोसने काही उत्पादनांची यादी तयार केली. या उत्पादनांत ऑनलाइन विक्री केली जाऊ शकते अशा कॉम्पॅक्ट डिस्क, संगणक हार्डवेअर, संगणक सॉफ्टवेअर, व्हिडिओ आणि पुस्तके यांचा समावेश होता. काही वर्षांतच ह्या अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीने ई-कॉमर्स, क्लाउड कॉम्प्युटिंग, डिजिटल स्ट्रीमिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (अर्टिफिशियल इंटेलिजन्स) यावर लक्ष केंद्रित केले आणि जगातील सर्वात मौल्यवान ब्रँडपैकी एक झाली.

१९९८ मध्ये ॲमेझाॅनने संगीत आणि व्हिडिओंची विक्री करण्यास सुरुवात केली आणि युनायटेड किंगडम आणि जर्मनीमधील पुस्तकांच्या ऑनलाइन विक्रेत्यांसह आंतरराष्ट्रीय व्यवहार सुरू केले. पुढच्या वर्षी व्हिडीओ गेम्स, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती वस्तू, सॉफ्टवेअर, गेम्स आणि खेळणी विकायला सुरुवात केली. डिसेंबर २०१० मध्ये ॲमेझॉनने ग्रृपाॅन ह्या आणखी एका अमेरिकन ई-काॅमर्स कंपनीचा प्रतिस्पर्धी लिव्हिंग सोशल या कंपनीमध्ये $१७५ दशलक्ष इतकी गुंतवणूक केली. पण दैनंदिन व्यवहार कमी होत गेल्यामुळे कंपनीचा वेगवान विस्तार अचानक थांबला.

लिव्हिंग सोशलने स्थानिक कार्यक्रमांची तिकिटे विकून आणि स्वतःचे कार्यक्रम सादर करून आपले व्यावसायिक मॉडेल बनवण्याचा प्रयत्न केला, ज्यासाठी वॉशिंग्टन डी.सी. मधील ऐतिहासिक इमारतीचे नूतनीकरण करण्यासाठी सुमारे $४ दशलक्ष इतके खर्च केले. परंतु हे सगळे प्रयत्न अयशस्वी झाले आणि शेवटी लिव्हिंग सोशल ही कंपनी ग्रृपाॅन मध्ये विलीन झाली.

२०१२ मध्ये ॲमेझाॅनने त्याचा इन्व्हेंटरी मॅनेजमेंट व्यवसाय स्वयंचलित करण्यासाठी किव्हा सिस्टिम्स ही कंपनी विकत घेतली, आणि २०१७ मध्ये होल फूड्स मार्केट ही सुपरमार्केट चेन असलेली कंपनी देखील खरेदी केली.

२०१४ मध्ये ॲमेझाॅनने फायर हा स्मार्टफोन सादर केला, पण तो अक्षरशः फ्लॉप झाला. काही महिन्यांतच फोनची किंमत $१९९ वरून ९९ सेंटवर घसरली आणि बेझोसला $१७० दशलक्ष इतके नुकसान सोसावे लागले.

वॉशिंग्टन पोस्टचे कार्यकारी संपादक मार्टिन बॅरन यांनी २०१६ मध्ये फोनच्या अपयशाबद्दल बेझोस याला विचारले असता "तुम्हांला हे एक मोठे अपयश वाटत असल्यास, आम्ही सध्या याहून मोठ्या अपयशी योजनांवर काम करत आहोत", असे हसत हसत सांगितले.

ॲमेझाॅनने २०२० मध्ये “क्रूसिबल” हा पहिला व्हिडिओ गेम लाँच केला, परंतु केवळ एका महिन्यानंतर हा गेम केवळ निमंत्रितांसाठी या स्वरूपात बदलला. ऑक्टोबर महिन्यात तर ॲमेझॉन गेम्स साइटवर "क्रूसिबल" बंद करत आहोत, कारण डेव्हलपमेंट टीम "न्यू वर्ल्ड आणि इतर ॲमेझॉन गेम्स प्रोजेक्ट्स" वर काम करत आहे असं नमूद केलं आहे. ॲमेझॉनने "क्रूसिबल" मुळे गमावलेल्या पैशाची रक्कम गुलदस्त्यात आहे, परंतु ती रक्कम अंदाजे $६० ते $८० दशलक्ष इतकी असण्याची शक्यता आहे.

ॲमेझाॅनने केवळ ई-काॅमर्स क्षेत्रावर अवलंबून न राहता अनेक नवकल्पना अंमलात आणल्या, पण त्यांना म्हणावे तसे यश लाभले नाही; बहुतेक वेळा तर खूप मोठा तोटा सहन करावा लागला.

ॲमेझाॅनला काही खटल्यांना देखील तोंड द्यावे लागले. बार्न्स ॲंड नोबल यांनी ॲमेझॉनवर आरोप केला की "जगातील सर्वात मोठे पुस्तकांचे दुकान" असल्याचा ॲमेझॉनचा दावा खोटा आहे. कारण "खरं तर ते पुस्तकांचे दलाल आहेत". नंतर खटला न्यायालयाबाहेर निकाली काढण्यात आला. वॉलमार्टने आरोप केला की ॲमेझॉनने वॉलमार्टच्या माजी अधिकाऱ्यांना कामावर घेऊन त्यांचे व्यापार रहस्य चोरले आहे. हा खटला देखील न्यायालयाबाहेर निकाली काढण्यात आला.

जेफ बेझोसने आपलं अपयश लपवण्याऐवजी त्याची प्रामाणिक कबुली दिली आहे. त्याचा कोणताही व्यवसाय परिपूर्ण नाही हे तो मान्य करतो. "आम्ही केलेल्या चुकांची आमच्याकडे एक लांबलचक यादी आहे, आणि चुकांपासून शिकण्याची आमची तयारी आहे. अपयशाने निराश न होता आव्हानांचा सामना करणं मी पसंत करेन", तो दिलखुलासपणे म्हणतो. म्हणूनच जेफ बेझोस हा खराखुरा लढवय्या वाटतो.

सबस्क्राईब करा

* indicates required