वारंवार सर्दी होते? मग हे उपाय करून पाहाच...
हल्ली सर्दीचा त्रास वर्षभर असणार्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय. वातावरणातले बदल तर याला कारणीभूत तर आहेतच पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्या बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि अयोग्य दिनचर्याही तितक्याच कारणीभूत आहेत.
कॉंप्युटर, मोबाईल आणि एकूणच आयटी-टेलिकॉम क्षेत्रात इतकी क्रांती झालीय की आपण जगातल्या कुणाशीही, कधीही आणि कसाही संपर्क साधू शकतो. यामुळं झालंय काय, आपल्या कामाच्या वेळा पूर्वीसारख्या ठराविक राहिल्या नाहीत. वेळी-अवेळी, कोणत्याही वेळी काम करणं गरजेचं झालंय. युके टाईम, यूएस टाईमवर काम करावं लागत आहे. यामुळे दिनचर्या जराही नियमित राहिली नाहीय. शिवाय कामाच्या जागी आजकाल एसी असतोच असतो. त्यामुळेही लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. या सार्याचा परिणाम असा झालाय की लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालीय. याच कारणामुळं वारंवार सर्दी होणार्या लोकांची संख्या आताशा वाढतेय.
तुमच्या कामाचं स्वरूप आणि कामाची जागा वर म्हटल्याप्रमाणं असेल आणि तुम्हाला वारंवार सर्दीचा त्रास होत असेल तर खालील उपाय केल्यास तुम्हाला यावर नक्कीच काबू मिळवता येईल..
१. ऑफीसमध्ये एसी असल्यास आणि तुम्हाला एसीमुळे सर्दीचा त्रास होत असल्यास शाल, पोंचू किंवा स्वेटर वापरावा. फिरतीचे काम नसेल तर थर्मल्सचा पर्यायही उत्तम आहे.
२. जेवणापूर्वी आणि नंतर हात स्वच्छ धुवावेत म्हणजे इन्फेक्शनचा त्रास होत नाही. वेळोवेळी सॅनिटायजरचा वापर करावा.
३. सर्दीपासून बचावासाठी ऑफीसमध्ये आलं किंवा मसाला घातलेला गरम गरम चहा प्यावा.
४. आलं घातलेलं गरम दूध किंवा गरम केशरी उकाळा यामुळेही सर्दीचा त्रास कमी होतो.
५. सुंठवडा किंवा लवंग चघळल्याने सर्दी बरी होते.
६. चिप्स, कुरकुरे, फास्ट फूड खाऊ नये कारण त्यातल्या तेल, अतिरिक्त मीठ, बटर, चिज, मेयोनिज असे पदार्थ सर्दी उत्पन्न करतात, ते टाळावेत.
७. बद्धकोष्ठ म्हणजेच पोट साफ न होण्याचा त्रास असल्यास त्याचा उपाय करावा. कारण वारंवार सर्दी होण्यामागं हे एक महत्त्वाचे कारण असते.
८. पाणी योग्य प्रमाणात प्यावं कारण अशा थंड वातावरणात अतिरिक्त पाणी पिण्याने वारंवार सर्दी होते.
९. वातावरणातील धूळ, धूर आणि प्रदूषणापासून वाचण्यासाठी योग्य ते मास्क्स, स्कार्फ वापरावेत.
कामाचं स्वरूप आणि ऑफीसची जागा या दोन्ही गोष्टींवर कुणाचा कंट्रोल असणार नाही पण आहे ती परिस्थिती तुम्ही नक्कीच तुमच्या सोय़ीची बनवू शकता आणि त्यापासून फायदा करून घेऊ शकता हे नेहमी लक्षात ठेवावं.