गुडघे, पाठ,चवडे यांना त्रास न होता कमी पाणी लागणारे squatease - देशी, स्वस्त आणि आरामदायी टॉयलेट!!
वेस्टर्न टॉयलेट किंवा कमोड आणि इंडियन टॉयलेट याबद्दल अनेक ठिकाणी बोलले जाते. सहसा आता लोकांचे प्राधान्य वेस्टर्न टॉयलेटलाच असते. कारण म्हणजे कम्फर्ट अर्थात आराम! आता लोक प्रत्येक ठिकाणी आराम शोधतात, तर या महत्वाच्या कामासाठी आरामदायी बैठक शोधणे कसे सुटू शकेल? वयस्कर लोकांना तर हे वेस्टर्न टॉयलेट खूप सोयीचे आहेत. जास्त वेळ बसले तरी त्रास होत नाही. मात्र वयस्कर नागरिकांच्या समस्येचा विचार करून सत्यजित मित्तल या एमआयटीच्या विद्यार्थ्याने एक आगळावेगळा टॉयलेट डिझाइन केला आहे, ज्यामुळे आरामदायी बैठक पण मिळेल आणि पाण्याची पण बचत होईल.
Squatease या नावाने सत्यजितने हे टॉयलेट डिझाइन केले आहे. २०१६ साली त्याच्या मनात ही आयडिया आली आणि त्याने यावर काम सुरू केले होते. यासाठी भारत सरकारनेही त्याला प्रोटोटाइप अनुदान दिले ज्यामुळे त्याला यावर काम करणे सोपे झाले. लोकांच्या गुडघे आणि पायांवर जास्त दाब पडायला नको अशा पद्धतीने त्याने देशी टॉयलेटमध्ये बदल करून हे नवे टॉयलेट डिझाइन केले आहे.
या नव्या डिझाइनमुळे लोकांना टाच व्यवस्थित ठेवता येईल. त्याचप्रमाणे पृष्ठभाग मोठा असल्याने लोक आरामात आपली पाठ, पायाचे बोटं, गुडघे ऍडजस्ट करून बसू शकतात. सत्यजितने निरीक्षण केले की जास्त प्रमाणात लोक आपल्या टाचेवर बसतात आणि पायाचे बोट संतुलित करतात कारण त्यांना चवड्यावर बसायला अडचण येते.
पायाच्या बोटांवर पूर्ण वजन टाकले तर पडण्याची भीती असते. तसेच गुडघ्यालाही त्याचा त्रास होऊ शकतो. टॉयलेटचा पायटा थोडा उंच असला तर माणूस दुसऱ्या पद्धतीने बसायचा प्रयत्नही करत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून मग हे टॉयलेट डिझाइन करण्यात आले. दृष्टिहीन लोकांना या टॉयलेटचा वापर करणे सोपे जाईल असेही सत्यजित सांगतो.
सत्यजितने यासाठी बरेच संशोधन केले आहे. त्याने orthopedic विभागातील गुडघ्याचा त्रास असणाऱ्या लोकांना घेऊन या प्रॉडक्टचे टेस्टिंग केली आहे. तसेच जे लोक काहीतरी आधार घेऊन बसत होते, त्यांनाही हे टॉयलेट चांगले वाटले. रिझल्ट सकारात्मक आला आणि मग त्याला अजून हुरूप चढला.
हे टॉयलेट डिझाइन करण्यासाठी सत्यजितला २ वर्ष आणि १० लाख रुपये गुंतवणूक करावी लागली आहे. हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणण्यासाठी सत्यजितने सिंगापूर येथील वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशनला सोबत घेऊन मग ते बाजारात आणले. २०१९ साली प्रयागराज येथील कुंभमेळ्यात ५००० squatease लावण्यात आले होते.
या भन्नाट टॉयलेटला २०१८ साली स्वच्छ इनोव्हेशनचा पुरस्कार मिळाला होता. विशेष म्हणजे याची किंमत ही अवघी ९९९ रुपये एवढी आहे. या टॉयलेटबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा.
उदय पाटील