computer

पत्त्यांच्या खेळ कुठे सुरू झाला? त्यात जोकर का आणि कधी आला? पत्ते खेळता-खेळता हे वाचून घ्या..

कुठलही वय असो, पत्ते खेळणे हा सगळ्यांचा अतिशय आवडता खेळ असतो. अगदी लहानपणी शाळेची सुट्टी सुरु झाली की मित्रमैत्रिणींसोबत मस्त पत्ते खेळणे असो किंवा मोठे झाल्यावर नातवंडांबरोबर मांडलेला डाव असो, पत्ते हे हवेतच. ५२ पानांचा सेट! पण त्यात आणखी दोन पानं लक्ष् वेधून घेतात. ती असतात जोकरची पानं. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की हे पान पत्त्यांमध्ये असण्याचे कारण काय असेल? त्या जोकरचा इतिहास काय आहे, आज आपण त्याविषयीच या लेखात जाणून घेणार आहोत.

या खेळाचा थोडासा इतिहास तर आधी जाणून घेऊ...

पत्ते खेळण्याचा प्रथम शोध इसवी सन ९ व्या शतकात चीनमध्ये लागला. मात्र आधुनिक ५२ पत्त्याचा संचाचा शोध साधारण १४५० च्या आसपास फ्रान्समध्ये लागला. त्यावेळी संपूर्ण युरोपमध्ये अनेक वेगवेगळे पत्त्यांचे संच होते. स्पँनिश,इटालियन, जर्मन आणि स्वीस असे वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे पत्ते!! आपण जे चार प्रकारचे पत्ते खेळतो ज्यात बदाम, इस्पिक,किल्वर, चौकट असतात. ते सर्व फ्रेंच कार्ड्स आहेत. फ्रेंच पत्त्याच्या संच खूप लोकप्रिय झाला. हेच पत्ते जगभरात प्रसिद्ध झाले आणि एक प्रमाण म्हणून वापरले गेले. याचे कारण नक्की काय हे सांगता येणार नाही. पण त्या शतकात फ्रान्स व युरोपचा सांस्कृतिक प्रभाव सर्वात जास्त होता. आधी जोकरची पानं या पत्त्यांच्या संचात नव्हती. साधारण १८६० च्या सुमारास पत्त्याच्या संचामध्ये जोकरचे प्रथम आगमन झाले. या नवीन पत्त्याची संकल्पना युक्रे या लोकप्रिय ट्रिक-टेकिंग पत्त्याच्या खेळावर आधारित होती. १९ व्या शतकाच्या मध्यवर्ती काळात अमेरिकन युक्रे खेळाडूंनी काही नवीन नियम करुन पत्त्याच्या खेळाचे स्वरूप बदलून टाकले. या नवीन नियमांसह खेळ खेळण्यासाठी 'ट्रम्प कार्ड'(हुकूम) म्हणून एका अतिरिक्त पत्त्याची गरज होती. त्यावेळी या नवीन कार्डाचे आगमन झाले. या नव्या पत्त्याचे नाव होते 'बेस्ट बोवर'. युक्रे खेळाच्या लोकप्रियतेमुळे अमेरिकेतील पत्ते छापणाऱ्यांनी लगेच या बदलत्या प्रवाहात उड्या मारल्या व हे जादा 'ट्रम्प कार्ड' असणाऱ्या पत्त्याच्या संचाची निर्मिती करायला सुरुवात केली. त्याचे नाव त्यांनी 'जाँली जोकर' असे ठेवले. कारण या पत्याचा वापर करून एखादाला धक्का देऊ किंवा आश्चर्यचकित करू शकतो. काही काळातच जागतिक पातळीवर 'जोकर' नाव स्वीकारले गेले. त्यावर असलेली विदुषकाची रचनाही खूप लोकप्रिय झाली.

तर वाचकहो, असा आहे जोकरचा इतिहास! या सुट्टीत पत्ते खेळताना ही माहिती इतरांना नक्की सांगा आणि शेयर करा .

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required