computer

कॉम्प्युटरवर सॉलीटेयर खूपदा खेळला असाल, पण त्याच्या निर्मात्याला एक रुपयाचाही मोबदला मिळाला नाही हे माहित आहे?

कॉम्पुटरसमोर बसल्यावर अनेकांचा आवडीचा गेम म्हणजे सॉलीटेयर!! हा गेम भलभल्या बहाद्दरांना संयम शिकवून गेला आहे. खरं सांगायचे झाले तर या गेमची निर्मिती याच कामासाठी झाली होती. कॉम्प्युटरवर बसल्यावर ज्यांना धीर निघत नाही अशा लोकांना शांत करण्यासाठी आणि नवीन कॉम्प्युटर वापरणारांसाठीमाऊस हाताळायची प्रॅक्टिस करण्यासाठी हा गेम होता. माऊस कर्सर हव्या त्या कार्डवर नेणे, लेफ्ट, राईट किंवा एकाचवेळी दोन्ही क्लिक करणे, तो इकडे तिकडे हलवणे यात संयमाची किती परीक्षा घेतली जाते हे सारेच जाणून आहेत.

सॉलीटेयर नावाचा गेम हा आजवरच्या इतिहासात सर्वाधिक खेळण्यात आलेला गेम असावा. जरी अधिकृत अशी आकडेवारी उपलब्ध नसली तरी अधिकांश लोक गेली ३२ वर्षं तासनतास हा गेम खेळतात एवढी गोष्ट पुरेशी आहे. मे १९९० मध्ये ज्यावेळेस विंडोज ३.० होते. तेव्हापासून कॉम्प्युटरमध्ये शिरलेला गेम आजही लोकांच्या आवडीचा आहे.

या गेमला मिळत असणारी प्रसिद्धी बघून या गेमचा खरा निर्माता समोर आला. त्याने सांगितलेल्या काही गोष्टी सॉलीटेयरप्रेमींना रंजक वाटतील. वेस चेरी नावाच्या इंजिनियरने हा गेम तयार केला होता. हा भाऊ १९८८ साली इंटर्न म्हणून मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाला. त्याची इंटर्नशिप तिथे बरेच दिवस चालली. या काळात त्याने केलेल्या कामांपैकी सर्वाधिक भन्नाट गोष्ट म्हणजे हा गेम!! त्यातुनही विशेष बाब म्हणजे बिचाऱ्या चेरीला हा कामासाठी एक रुपयादेखील मिळाला नाही. तो सांगतो की आपल्याला मात्र आजही या गेमसाठी पैसे मिळाले नाहीत याचे वाईट वाटत नाही. त्याकाळी आता इतके सर्व सोपे नव्हते. म्हणून त्याला हा गेम तयार करताना अनेक अडचणी आल्या. कार्ड पकडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे हेच त्यावेळी जिकिरीचे काम होते.

पण गडी हिमती होता. करायचे म्हणजे करायचे म्हणून एकदा कामाला लागला आणि गेम तयार करूनच थांबला. आपल्याला दिसणारी प्रसिद्ध व्हिक्टरी स्क्रीन डिझाइन करण्यासाठी त्याला २० कोड लाईन्स लागले होते. तसेच कार्ड बॉक्सची पुण्याई त्याची त्यावेळी असलेली गर्लफ्रेंड लेस्ली कुय हिच्यावर नावावर आहे.

तो सांगतो की, एके दिवशी मॅकवर असाच गेम खेळत असताना मायक्रोसॉफ्टसाठी पण असा गेम तयार करण्याची इच्छा निर्माण झाली. मग त्याने विंडोज २.१ साठी हा गेम तयार केला. एका प्रोग्राम मॅनेजरला गेम आवडला आणि त्याने त्याला विंडोज ३.० मध्ये टाकला. अशाप्रकारे या ऐतिहासिक गेमची आपल्या आयुष्यात एंट्री झाली.

तो असेही सांगतो की त्यावेळीच आपल्याला ठाऊक होते की, या कामाचे आपल्याला पैसे मिळणार नाहीत हे माहीत होते. पण तरीही मी समाधानी होतो. आताही त्याचे तसे चांगलेच सुरू आहे. पण मायक्रोसॉफ्टने जर त्यावेळी त्याला कौतुकाची थाप दिली असती तर हा पठ्ठ्या अजून काही चांगले करू शकला असता.

२०१० साली त्याने सायडरचा बिजनेस सुरू केला. अधूनमधून थोडीफार प्रोग्रामिंग सोडली तर तो काही आता जास्त प्रोग्रामिंग करत नाही. एकेकाळी हा प्रसिध्द असलेला कोडर आजजरी कुणाच्या विशेष लक्षात नसला तरी त्याने एक मोठी गोष्ट स्वतःच्या नावावर कोरून ठेवली आहे हेही तितकेच खरे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required