जय हो- सलूनचे दरवाजे ठोठावणारा 'जॉन पॉल डी-जोरिया' अब्जाधीश कसा बनला हे खरंच वाचण्यासारखं आहे.
'जय हो' मालिकेतली आजची व्यक्ती आहे जॉन पॉल डी-जोरिया. त्याची पटकन लक्षात येण्यासारखी ओळख म्हणजे पॅट्रन टकीला बनवणारी कंपनी एकेकाळी त्याची होती, नंतर ती त्याने बकार्डीला विकली. अर्थातच आज तो अब्जाधीश आहे. पण त्याचा इथपर्यंत पोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. आज वाचूया त्याच्या हाल-अपेष्टांची आणि त्यातून उमेदीने उभारलेल्या साम्राज्याची गोष्ट!! यातून बोभाटाच्या वाचकांनीही प्रेरणा घ्यावी आणि वाईट दिवस एक ना एक दिवस जातात हा आशावाद बाळगावा हीच मनीषा!!
कधी रखवालदार, कधी एन्सायक्लोपिडिया विकणारा सेल्समन, कधी इन्शुरन्स पॉलिसी विकणारा, तर कधी पेट्रोल पंपावर असिस्टंट!! पोट भरण्यासाठी त्याने मिळेल ती नोकरी केली. हे तर काहीच नाही, रहायला घर नसल्यामुळे बरेच महिने तो चक्क गाडीमध्ये झोपत असे. त्याने कठोर परिश्रम केले आणि कधीही हार मानली नाही. त्याला नकार मिळाला, तेव्हाही तो नाराज झाला नाही. तो म्हणतो, "आपण आपल्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नेहमी सर्वोत्कृष्ट बनण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या ध्येयापासून लांब जाऊ नका. इतरांना काय म्हणायचं आहे यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचं मन तुम्हांला काय सांगत आहे ते ऐका."
जॉन पॉल डी-जोरिया हा एक अब्जाधीश अमेरिकन व्यावसायिक आहे. तो जॉन पॉल मिशेल सिस्टिम्सचा सह-संस्थापक आहे. ही कंपनी केसांची निगा राखणारी उत्पादने आणि स्टाइलिंग टूल्स बनवते. इतकेच नाही तर तो टकीला, म्हणजे एगेव्ह ह्या वनस्पतीपासून बनविलेल्या अल्कोहोलिक पेय बनवणाऱ्या पेट्रन स्पिरिटस या कंपनीचा संस्थापक-मालक होता. आज डी-जोरियाची एकूण संपत्ती अंदाजे $३ अब्ज इतकी आहे.
जॉन पॉल डी-जोरिया याचा जन्म १३ एप्रिल १९४४ रोजी लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया शहरात झाला. तो दोन वर्षांचा असताना त्याच्या पालकांचा घटस्फोट झाला आणि तो त्याच्या आईसोबत राहू लागला. आपल्या मुलांचा संभाळ करण्यास त्यांची आई सक्षम नसल्याने त्याला आणि त्याच्या भावंडांना एका पालनपोषण गृहात पाठवण्यात आले. डी-जोरिया वयाच्या नवव्या वर्षांपर्यंत तिथेच रहात असे. वयाच्या नवव्या वर्षी त्याने कुटुंबाला हातभार लावण्यासाठी भावासोबत ख्रिसमस कार्ड आणि वर्तमानपत्रे विकण्यास सुरुवात केली. डी-जोरिया हा हायस्कूलमध्ये वाईट संगतीला लागला होता, पण एका शिक्षकाने त्याला हिताच्या चार गोष्टी सांगितल्यानंतर त्याला आपली चूक उमगली.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्षे तो युनायटेड स्टेट्स नेव्हीमध्ये होता. डी-जोरियाला कॉलेजमध्ये जायचे होते परंतु त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. पैसे कमावण्यासाठी त्याने अनेक वेगवेगळ्या नोकऱ्या करायला सुरुवात केली. तो कधीही दुसऱ्यावर अवलंबून राहिला नाही आणि सतत काही ना काही काम करत राहिला.
काही वर्षांनी त्याने रेडकेन लॅबोरेटरीज या हेअर-केअर कंपनीमध्ये आणि नंतर फर्मोडिल हेअर केअरमध्ये नोकरी केली, जिथे त्याने केसांची निगा राखण्याच्या व्यवसायाबद्दल जाणून घेतलं. काही व्यावसायिक धोरणांवरून मतभेद झाल्यामुळे अखेरीस त्याला दोन्ही कंपन्यांमधून काढून टाकण्यात आले. १९८० मध्ये त्याने ७०० डॉलर्सचे कर्ज घेतले आणि पॉल मिशेल या केशभूषाकारासह जॉन पॉल मिशेल सिस्टिम्स ही कंपनी स्थापन केली. त्या वेळी डी-जोरिया कारमध्येच रहात होता. दोघांनी त्यांच्या शॅम्पू आणि कंडिशनरच्या विक्रीसाठी अनेक सलून्सचे दरवाजे ठोठावले.
रंगीत छपाई परवडत नसल्यामुळे डी-जोरियाने काळी अक्षरे असलेल्या साध्या पांढऱ्या बाटल्यांमधील आपली उत्पादने लॉस एंजेलिसमधील सलून्समध्ये विकली. हळूहळू काही सलून्सनी त्याच्याकडून शॅम्पू आणि कंडिशनरच्या बाटल्या खरेदी करण्यास सुरुवात केली. १९८९ मध्ये पॉल मिशेल यांचे निधन झाले तेव्हा डी-जोरिया कंपनीचा प्रमुख बनला. आज जॉन पॉल मिशेल सिस्टिम्स ही कंपनी ८७ देशांमधील सलूनमध्ये १००हून अधिक उत्पादने विकते. शिवाय त्याची टकीला बनवणारी कंपनी दरवर्षी वीस लाखांहून अधिक बाॅक्सेसची विक्री करते. त्याने त्याचा कंपनीतला फक्त ७०% भाग बकार्डीला विकला होता, त्यामुळे हा फायदाही त्याला होतोच.
जॉन पॉल मिशेल सिस्टिम्स ही प्राणी क्रूरता चाचणीच्या विरोधात बोलणाऱ्या पहिल्या कंपन्यांपैकी एक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने आपलं यश स्वतःपुरतं न ठेवता समाजातील कमनशिबी लोकांपर्यंत पोहचवलं. "तुम्हांला मिळालेलं यश जर तुम्ही इतरांसह वाटून घेतलं नाही, तर त्याला मी तुमचं अपयश म्हणेन.", तो आपलं स्पष्ट मत मांडतो. २०११ मध्ये त्याने गिव्हिंग प्लेज ह्या धर्मादाय संस्थेला त्याची अर्धी संपत्ती दान करण्याचे वचन दिले आहे.
जॉन पॉल डी-जोरिया म्हणजे प्रचंड कष्ट, कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची प्रवृत्ती आणि आपल्या ध्येयापासून तसूभरही न हलता ते प्राप्त करण्यासाठी झटणारा बेफाट माणूस आहे ह्यात शंका नाही.