computer

जय हो- लोहारघरी जन्म, कंपनीचे अध्यक्षपद आणि बाँबहल्ल्यात कारखानाही गेला, पण त्यातूनही होंडा मोटर्स उभी करणारे सोइचिरो होंडा!!

यशस्वी लोकांचं यश, मान, मरातब, प्रसिद्धी सगळ्यांनाच दिसते. पण यामागे त्यांचे किती हाल-अपेष्टा आणि कष्ट असतील याची कल्पना सर्वांनाच असते असे नाही. त्याचसोबत आपल्यापैकी काहीजणांची सध्याची परिस्थिती अनुकूल नसू शकते आणि परिस्थिती-अपयशामुळे ते खचूनही जात असतील. अशाच मनांना उभारी देण्यासाठी आम्ही ही 'जय हो' लेखमालिका चालू केली आहे. आजचा लेख आहे होंडा मोटर्स या कंपनीला यशस्वी करण्याचा सोइचिरो होंडा यांच्याबद्दल!!

सोईचिरोंचा जन्म १९०६चा. त्यांचे वडील लोहार होते आणि आणि आई लोकरीचे कपडे विणत असे. सोइचिरोंना मात्र यंत्रसामग्रीची जन्मजात आवड होती. ते अगदी लहान असताना त्यांच्या गावाजवळून जाणार्‍या कारचा पाठलाग करत असल्याची कथा त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. ते म्हणाले की पेट्रोलचा वास त्यांना रोमांचक वाटत असे. त्यांच्या वडिलांच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानामुळे सोइचिरो यांना यांत्रिक भागांबद्दल लहानपणीच कुतूहल निर्माण झाले. त्या काळात जपान देशाचे कृषी क्षेत्रातून उत्पादनाकडे स्थित्यंतर झाल्यामुळे तंत्रज्ञानामधील त्यांच्या आवडीला चालना मिळाली.

१६व्या वर्षी यंत्रांबद्दलचे त्यांचे ज्ञान आणि त्यांना हाताळण्याचे अफाट कौशल्य होते. शाळेने त्यांना व्यावहारिक शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. त्यांनी औपचारिक प्रशिक्षण थांबवले आणि टोकियोमधील आर्ट शोकाई कंपनीसाठी शिकाऊ मेकॅनिक म्हणून काम केले. कंपनी गाड्यांची दुरुस्ती आणि देखभाल करत असे. तिथे शिकाऊ उमेदवारांना वेतन दिले जात नव्हते; फक्त झोपण्यासाठी पलंग आणि जेवण देत. यामुळे त्यांची शिकण्याची तळमळ मात्र कमी झाली नाही. त्यांच्याकडे सोपवण्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. देखभाल आणि दुरुस्तीमध्ये ते अत्यंत कुशल होते, आणि दुरुस्तीची क्लिष्ट प्रक्रिया सुलभ करण्यात वाकबगार होते. त्यांनी ऑटोमोटिव्ह टूल्स आणि पार्ट्सचा वापर स्वतःच्या पद्धतीने केला. प्रशिक्षण सुरू केल्यानंतर काही महिने लोटले नाहीत, तर ते या क्षेत्रात स्थिरस्थावर झाले होते.

आर्ट शोकाईच्या व्यवस्थापनाने त्यांच्या क्षमतेची दखल घेतल्यावर कंपनीच्या मालकाने सोइचिरोला केवळ यंत्रसामग्रीबद्दलच नाही तर गाड्यांच्या व्यवसायाबद्दल शिकवले. पुढे कंपनीने स्वत:ची कार बनवताना त्याच्या क्षमतेचा वापर केला. सोइचिरो अपारंपरिक स्त्रोतांमधून आणि माध्यमांद्वारे दर्जेदार सुटे भाग तयार करण्यास सक्षम होते. आर्ट शोकाईने रेसिंगमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना अभियंता म्हणून नेमण्यात आले आणि नंतर त्यांच्या घराजवळील आर्ट शोकाईच्या शाखेचे व्यवस्थापन सोपवण्यात‌ आले; त्यावेळी ते केवळ २२ वर्षांचे होते.

सोइचिरो होंडा यांना कंपनीसाठी पिस्टन रिंग्जचे उत्पादन करायचे होते, पण व्यवस्थापनाने त्यांची कल्पना नाकारली. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी आर्ट शोकाई सोडली आणि पिस्टन रिंग तयार करण्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मात्र धातूंचे सखोल ज्ञान घेण्यासाठी सोइचिरो यांना पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागले. दिवस-रात्रीचा दीर्घ अभ्यास आणि बरीच जुळवाजुळव केल्यानंतर दर्जेदार पिस्टन रिंग बनवण्यात आणि टोयोटासह जपानच्या ऑटोमोटिव्ह दिग्गजांना पुरवठा करण्यात ते यशस्वी झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांची कंपनी ताब्यात घेण्यात आली आणि अध्यक्षपदावरून त्यांचे स्थान ऑपरेशन मॅनेजर इतके कमी केले गेले. बहुतेक पुरुष कर्मचार्‍यांना सैन्यात भरती करण्यात आले, त्यामुळे सोइचिरो यांच्या हाताखाली फक्त महिला कर्मचारी राहिल्या. स्त्रियांना काम पार पाडणे सोपे व्हावे म्हणून त्यांनी उत्पादन प्रक्रियेत काही यशस्वी फेरबदल केले.

एक दिवस पिस्टन रिंग आणि तिची सर्व यंत्रसामग्री असलेली इमारतच अमेरिकन विमानांच्या बॉम्ब हल्ल्यात नष्ट झाली. आपल्या पायावर पुन्हा उभं रहाता यावं, यासाठी बॉम्ब हल्ल्यात वाचलेले यंत्रसामग्रीचे काही भाग त्यांनी जपानच्या मोठ्या कंपन्यांना विकले. महायुद्धात जपान देश कोलमडून पडला, पण सोइचिरो यांचे ऑटोमोटिव्ह उद्योगावरील प्रेम कमी झाले नाही, किंवा त्यांचा कणा देखील मोडला नाही. सोइचिरो यांनी मोटारसायकल बनवण्याच्या त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा केला.

१९४८ मध्ये बनवलेली पहिली होंडा मोटारसायकल म्हणजे अक्षरशः सायकलला जोडलेले इंजिन होते. एका दशकात अमेरिकन लोकांनी होंडा मोटारसायकलचा स्वीकार केला आणि काही काळानंतर सोइचिरो होंडा यांच्या मोटारसायकल्सने आंतरराष्ट्रीय शर्यती जिंकल्या. नंतर होंडा कंपनीने गाड्यांचे उत्पादन करण्याचे ठरवले, पण त्या वेळी व्यापार विभागाने सोइचिरो यांना तसे करण्यापासून परावृत्त केले, कारण अनेक कंपन्यांच्या गाड्या रस्त्यावर यशस्वीपणे धावत होत्या. तरीही त्यांनी प्रोटोटाइपवर काम करणे सुरू ठेवले आणि एक लहान, परंतु कार्यक्षम आणि दणकट मॉडेल तयार केले. आज होंडा मोटर कंपनी मोटारसायकल, कार, सागरी वाहने, आणि एरोस्पेस क्षेत्रात कार्यरत आहे. होंडा कंपनी आता आघाडीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादकांपैकी एक आहे आणि कंपनीच्या मोटारसायकली आजही जगभरातील शर्यती जिंकत आहेत.

सोईचिरो यांचा प्रवास कठीण होता, आणि त्यांचे जीवन आव्हानांनी भरलेले होते. कोणत्याही क्षणी अपयशाने त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यापासून रोखले नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक कामाला अंतिम स्वरूप येईपर्यंत त्यांनी चिकाटीने प्रयत्न केले. ऑटोमोबाईल्सवरील आपले प्रेम, ज्ञान आणि कौशल्ये आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी वापरली आणि अडथळे असूनही ती स्वप्ने साध्य करण्यासाठी संघर्ष केला.

सोइचिरो होंडा आपल्या यशाचे गमक एका वाक्यात सांगतात. ते म्हणतात, "वारंवार अपयश आले तरी आत्मनिरीक्षण करूनच यश मिळू शकते."

सबस्क्राईब करा

* indicates required