मर्लिन मन्रो: अफाट पैसा, प्रसिद्धी, अनुपम सौंदर्य आणि दीर्घ शोकांतिकांची मालिका.. तिने आत्महत्या का केली?
घी देखा लेकिन बडगा नही देखा अशी आपल्याकडे म्हण आहे. चंदेरी दुनियेतल्या चमचमत्या तारे तारकांना ही म्हण बहुतांश लागू पडते. त्यांचा पैसा, ग्लॅमर, चकचकीत लाइफस्टाइल हे तर सगळं दिसतं, पण त्या पलीकडे त्यांच्या खाजगी आयुष्यात त्यांना काय समस्या आहेत किंवा हे सगळं मिळवण्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागले आहेत याकडे फारसं कोणी बघत नाही. हॉलीवूडची सौंदर्यसम्राज्ञी मर्लिन मन्रो हे असंच एक शापित व्यक्तिमत्व.
मर्लिन मन्रो म्हटल्यानंतर डोळ्यासमोर काय येतं? अफाट पैसा, अमाप प्रसिद्धी आणि अनुपम सौंदर्य. तिच्या सौंदर्याने त्यावेळेला अख्ख्या अमेरिकेला वेड लावलं होतं. प्रत्येक तरुणीला तिच्यासारखं दिसायचं होतं. एकीकडे उडत्या स्कर्टला सांभाळताना दुसरीकडे चेहऱ्यावर दिलखुलास हसू खेळवणारी सौंदर्यवती हे मन्रोचं त्या काळातलं प्रसिद्ध रूप. पण तिची ही अदा त्यावेळी जेवढी लोकप्रिय झाली तेवढीच वादग्रस्तही ठरली. मुळात तिच्या वैयक्तिक आयुष्यात इतके चढउतार आले की मिळालेल्या यशाचा आणि प्रसिद्धीचा आनंद कधीही फार काळ टिकला नाही.
मर्लिन मन्रो हिचं मूळ नाव मर्लिन मन्रो नाहीच, तर ते होतं नॉर्मा जिन बेकर. तिचं लहानपण तसं हलाखीतच गेलं. तिच्या आईने एकटीने तिला लहानाचं मोठं केलं. आई एकटी असल्याने ओळखीच्यांच्या, नातेवाईकांच्या आधाराने तिने नॉर्माला लहानाचं मोठं केलं. तिच्या लहानपणी त्यांनी अनेकदा घरं बदलली. पण मुळात स्वभाव धडाडीचा नसल्याने आणि मनात सतत एक असुरक्षिततेची भावना असल्याने तिची आई कायम कुठल्याशा दडपणाखाली असायची. त्यातच तिचा नर्व्हस ब्रेकडाऊन झाला. आधी आईचा नर्व्हस ब्रेकडाऊन मग तिला मनोरुग्णालयात दाखल करावं लागणं, आणि भरीत भर म्हणजे नॉर्माच्या एकटेपणाचा फायदा घेऊन एकाने तिचा गैरफायदा घेणं या सगळ्यामुळे नॉर्मा जिन बेकर पार हबकून गेली. आईच्या बाबतीत काय घडलंय हेही तिला कोणी सांगेना. नंतर तर आई मरण पावल्याची तिची समजूत करून देण्यात आली.
पुढे काही महिने एका अनाथालयात, काही महिने असेच कुणाच्या तरी घरी अशाप्रकारे नॉर्माचं आयुष्य पुढे सरकत राहिलं.
अनाथालयात असतानाच तिने जिम नावाच्या माणसाशी लग्न केलं. काहीसं मनाविरुद्ध, पण केलं. हे लग्न जेमतेम चार वर्ष टिकलं. लग्नानंतर काही काळाने जिमला युद्धात भाग घेण्यासाठी जावं लागलं. त्यावेळी तिने वेळ घालवण्यासाठी म्हणून नोकरी करायला सुरुवात केली. इथेच ती एका फोटोग्राफरच्या नजरेत भरली आणि तिला चक्क मॉडेलिंगच्या ऑफर्स येऊ लागल्या. तेवढ्यात तिला एक अनपेक्षित धक्का बसला. जिमने तिला स्पष्ट सांगितलं, "मी युद्धावरून तिकडे परत येत नाही तोपर्यंत हे सगळं चालू दे. नंतर मात्र मी तुला हे काहीही करू देणार नाही." झालं! नॉर्माने ताबडतोब घटस्फोटाचा अर्ज केला. याने जिम चांगलाच हादरला. पण नॉर्मा मात्र आयुष्य तिच्या पसंतीने जगायला मोकळी झाली. दरम्यानच्या काळात तिला बऱ्याच ऑफर्स आल्या. मात्र ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स या स्टुडिओने तिला तिचं नाव बदलून मर्लिन मन्रो करायला भाग पाडलं. काहीशा नाखुशीनेच तिने ते स्वीकारलं. तिची स्वतःची आधीची ओळख विसरून एका नव्या भूमिकेत जणू परकाया प्रवेश केला. मर्लिन हा शब्द तिला लिहितादेखील यायचा नाही, असं तिनेच पुढे एकदा सांगितलं होतं.
पुढे तिच्या चित्रपटातील कारकिर्दीमध्येही अनेक चढउतार आले. जेव्हा ती प्रसिद्धीच्या शिखरावर होती तेव्हा केलेल्या एका न्यूड फोटोशूटमुळे ती चांगलीच गोत्यात आली. शिवाय याच काळात आपली आई जिवंत आहे आणि ती एका मेंटल इन्स्टिट्यूशन मध्ये दाखल आहे हेही तिला समजलं. या दोन गोष्टींनी तिच्या आयुष्यात चांगलीच उलथापालथ झाली. एका क्षणी तर तिचं करिअर संपतं की काय अशीही तिला भीती वाटायला लागली.
पण यावर मात करून तिने धाडस दाखवलं. लोकांच्या समोर येण्याचं... त्यांना सत्य काय ते सांगण्याचं... केवळ पैशाची नड भागवण्यासाठी ते फोटो शूट तिने केलं. शिवाय आई जिवंत असल्याचं रहस्य आईच्या सुरक्षिततेच्या हेतूने लोकांपासून लपवलं हेही तिने मान्य केलं. लोकांनीही हे स्वीकारलं. विशेष म्हणजे, यामुळे मर्लिनला लोकांच्या हृदयात खास जागा प्राप्त झाली.
पुढे तिने दुसरे लग्न केलं. आपलं सिनेमांमध्ये काम करणंही सुरू ठेवलं. सेवन इयर्स ईच नावाच्या सिनेमासाठी शूट करत असताना तिचा 'तो' बोल्ड सीन आला.. एक प्रसन्न तरुणी. तिचा स्कर्ट हवेत वर उडतोय. ती तो कसाबसा सावरतीये आणि त्याचवेळी दिलखुलास हसतीये. या सीनचं शूटिंग सुरू असताना समोर तिचा नवराही होता. त्याला हा सीन आणि आपल्या बायकोला अशा प्रकारे लोकांनी बघणं बिलकुल पसंत पडलं नाही. आपल्या रागावर ताबा न मिळवता त्याने मर्लिनलाच शिवीगाळ करायला सुरुवात केली. यामुळे तिचं दुसरं लग्नही तुटलं.
नंतर केलेलं तिसरं लग्नही असंच अल्पायुषी ठरलं.
यातून तिला डिप्रेशनचा विकार जडला. आयुष्यात बरंच काही कमावलं पण त्याचबरोबर बरंच काही गमावलंही या भावनेने तिला घेरलं.
तिची लग्नं टिकली नाहीत, मूल-बाळही नाही. तिचं वैयक्तिक आयुष्य म्हणजे दीर्घ मालिकांची एक शोकांतिका होती. त्याला अनेक पदर होते. प्रसिद्धीचा, पैशाचा, हव्याहव्याशा ग्लॅमरचा तसंच दुःखाचा, विश्वासघाताचा, आणि अपेक्षाभंगाचाही. याच शोकांतिकेने तिचा जीव घेतला.
४ ऑगस्ट १९६२ रोजी रात्री ती घरी मृतावस्थेत आढळली. गोळ्यांचा ओव्हरडोस हे कारण सांगितलं गेलं. आपल्या दुःखांचा तिने अशा प्रकारे कायमस्वरूपी इलाज करून टाकला.
मात्र आजही ती सिने रसिकांच्या मनातून गेलेली नाही. तिचं मादक सौंदर्य, दिलखेचक अदा आणि अख्ख्या अमेरिकेवर केलेल्या गारुडाची मोहिनी इतक्या सहजासहजी पुसून टाकता येण्यासारखी नाही.
स्मिता जोगळेकर