जय हो- जे.के. रॉलिंग! अपयशाचा कडेलोट पाहिलेली मिलियन डॉलर लेखिका!!
हॅरी पाॅटर हे नांव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच परिचित आहे, आणि त्याच्या सेलिब्रिटी लेखिकेने हॅरी पाॅटर मालिका लिहून किती मिलियन डॉलर्स कमावले हे देखील. परंतु हॅरी पाॅटर हे पात्र आणि त्याचे असंख्य मनोरंजक कारनामे लिहिण्याआधी त्याची लेखिका घटस्फोटाचे दुःख पचवत होती, तिला नोकरी नव्हती, आणि ती सरकारी अनुदानावर जगत होती हे ऐकून तुम्हांला आश्चर्य वाटेल.
प्रत्येक श्यामल ढगाला चंदेरी किनार असते, ह्या उक्तीनुसार तिच्या आयुष्यात घडत असलेल्या प्रत्येक घटनेला रुपेरी कडा, किंवा सकारात्मक बाजू होती, पण ती प्रकाशात येत नव्हती.
त्या सुप्रसिद्ध लेखिकेचं नांव आहे जे. के. रॉलिंग. ही लेखिका एकदां मॅंचेस्टर ते लंडन असा ट्रेन प्रवास करत असताना सोबतच्या टिश्यू पेपरवर काही खरडत होती. लेखिकाच ती! कागद सदृश काही दिसलं आणि लागली की त्यावर लिहायला. होय. हॅरी पाॅटरचा जन्म ट्रेनमधील त्या प्रवासात एका टिश्यू पेपरवर झाला आणि ह्याच हॅरी पाॅटरच्या मालिकेमुळे तिचे कोट्यवधी रुपयांचे साहित्यिक साम्राज्य उभे राहिले.
पण हे यश तिला मिळालं प्रचंड संघर्षानंतर. हॅरी पॉटर मालिका लिहिण्यापूर्वी, जे. के. रॉलिंग निराशेच्या गर्तेत हेलकावे खात होती.
आपली बहिण जवळ असावी या हेतूने १९९० च्या सुरुवातीस ती स्कॉटलंडमध्ये स्थायिक होण्यासाठी यूकेला परतली. पोर्तुगालमधील तीन वर्षांच्या कालावधीत तिचा विवाह झाला, घटस्फोट झाला, ती एका मुलीची आई झाली आणि तिला देशही सोडावा लागला.
जे. के. रॉलिंगने पुढची काही वर्षे संघर्ष करण्यात घालवली. ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अस्थिर झाली. जगण्याचा संघर्ष तर होताच, पण काय करावं ह्याची दिशा सापडत नव्हती. ती बेरोजगार होती, सिंगल मदर अर्थात एकटी पालक होती आणि बेघर न होता आधुनिक ब्रिटनमध्ये राहणे जितके शक्य होते, तितकी गरीब होती.
या काळात तिच्या नैराश्याने धोकादायक वळण घेतलं आणि तिने स्वतःला अपयशी मानायला सुरुवात केली. तिने आत्महत्येचा विचारही केला होता. सुदैवाने तिने असे विचार प्रत्यक्षात आणण्यापासून स्वतःला रोखले. लेखन तिच्यासाठी व्यक्त होण्याचे, फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उठून भरारी घेण्याचे माध्यम बनले. हॅरी पॉटर मालिकेची कल्पना तिला काही वर्षांपूर्वी मँचेस्टर ते लंडन या ट्रेनमध्ये सुचली होती. तिने पोर्तुगालमध्ये काही एपिसोड्स वर काम देखील केले होते, परंतु ती जेव्हा यूकेमध्ये परतली, तेव्हा तिच्या लिखाणाने खरी गती घेतली.
रॉलिंगने पहिली दोन पुस्तके पूर्ण केली, पण तेव्हा ती सरकारी अनुदानावर अवलंबून होती. संपूर्ण जगाला आता हॅरी पॉटर, द बॉय हू लिव्हडची गोष्ट माहित आहे, परंतु त्याच्या निर्मितीमागील संघर्षाची बऱ्याच लोकांना कल्पना नाही.
आपल्या मुलीला चांगलं जीवन जगण्यासाठी जे काही आवश्यक आहे, ते तिला मिळावं यासाठी तिला यशाची वाट पहात बसणं शक्य नव्हतं. म्हणूनच तिने हॅरी पॉटरचे हस्तलिखित प्रकाशकांना पाठवण्यास सुरुवात केली. डझनाहून अधिक प्रकाशकांनी नकार दिला, पण शेवटी मात्र एका प्रकाशकांनी त्याचा स्वीकार केला.
जे. के. रॉलिंग आता जागतिक स्तरावर नावाजलेली लेखिका आहे. हॅरी पॉटर मालिकेतील पहिल्या पुस्तकाच्या १०० दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत आणि एकत्रित मालिका सुमारे ४०० दशलक्ष इतक्या विकल्या गेल्याचा अंदाज आहे. ही जगातील सर्वाधिक विकली जाणारी पुस्तक मालिका आहे.
२००८ च्या हार्वर्डच्या भाषणात ती म्हणाली की तिचे सुरुवातीच्या काळातील अपयश ही “भेट” आहे जी तिने “वेदनापूर्वक स्वीकारली” होती. तिच्या अपयशातून तिने स्वतःबद्दल आणि तिच्या इतरांशी असलेल्या नातेसंबंधांबद्दल ज्ञान, तसेच दुर्दैवी परिस्थितीला यशामध्ये बदलण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याचे धैर्य मिळवले. तिला माहीत होतं की ऊन असेल तर सावलीचे महत्त्व कळते, दुःख असेल तर आनंदाचे महत्त्व उमगते आणि अपयश आल्याशिवाय यशाचे महत्त्व कळत नाही.
अपयशाची परिसीमा झाल्यावरही यशासाठी झगडणारी जे. के. रौलिंग म्हणजे येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करणारी साहित्याच्या अवकाशातील चांदणीच.