कौतुकास्पद! कुर्डुवाडीतील टेनिस क्रिकेट स्टार कृष्णा सातपुतेची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड...

कुर्डुवाडीचा स्टार फलंदाज कृष्णा सातपुते(Krishna satpute) हे टेनिस क्रिकेटमधील खूप मोठं नाव आहे. गल्ली क्रिकेटपासून ते थेट आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट खेळण्याचा मान आता कृष्णा सातपुतेला मिळणार आहे. त्याची भारतीय टेनिस संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर त्याने अनेक गोलंदाजांची धुलाई केली आहे. टेनिस क्रिकेटची कुठलीही स्पर्धा असूद्या, कृष्णा सातपुते सारखा नावाजलेला खेळाडू जर आपल्या संघात असेल तर त्या संघाचा विजय हा निश्चित असतो. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडीत राहणारा हा खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना दिसून येणार आहे.
कुठलाही खेळाडू एका रात्रीत स्टार होत नाही. तर त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कृष्णा सातपुतेला देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याच्या आई वडिलांचे कॅन्सर सारख्या आजाराने निधन झाले होते. त्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी कृष्णा सातपुतेवर होती. त्याने क्रिकेटच्या जीवावर आपल्या कुटुंबाचा सांभाळ केला.
लेदर क्रिकेटप्रमाणेच असंख्य असे खेळाडू आहेत जे टेनिस क्रिकेट खेळत आहेत. मोठ मोठ्या स्पर्धांचे आयोजन होत असल्यामुळे खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये आपले करियर करू पाहत आहेत. त्यामुळे स्पर्धा ही टेनिस क्रिकेटमध्ये देखील कमी नाहीये. मात्र सतत चांगली कामगिरी करत, छोट्या गावात स्पर्धा खेळून हा स्टार फलंदाज आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. हेच कारण आहे की, केवळ सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर, मुंबई आणि महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात कोणालाही विचारलं की, टेनिस क्रिकेटमधील स्टार फलंदाज कोण? तर केवळ एक उत्तर मिळेल ते म्हणजे कृष्णा सातपुते.
दुबईत होणार टेनिस चॅम्पियंस ट्रॉफी स्पर्धा...
टेनिस क्रिकेटचा क्रेझ आता इतका वाढला आहे की, थेट दुबईच्या मैदानावर टेनिस चॅम्पियंस ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. एमएस धोनीप्रमाणेच शांत स्वभावाच्या असणाऱ्या कृष्णा सातपुतेला विश्वास आहे की, भारतीय संघ या स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घालणार. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, ओमान, यूएई, श्रीलंका आणि कॅनडा हे संघ सहभाग घेणार आहेत. कृष्णा सातपुते हा टेनिस क्रिकेटमधील किती आक्रमक फलंदाज आहे याचा अंदाज तुम्ही यावरून घेऊ शकता की,त्याने आतापर्यंत एकूण २३ शतके झळकावली आहेत. आता या स्पर्धेत देखील त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
टेनिस बॉल क्रिकेट हा टेनिस बॉलचा वापर करून खेळला जाणार खेळ आहे. हा खेळ प्रामुख्याने दक्षिण आशियाई देशांमध्ये खेळला जातो. यामध्ये भारत, पाकिस्तान,श्रीलंका , बांगलादेश आणि नेपाळ या देशांचा समावेश आहे. भारतात टेनिस बॉल क्रिकेटची लोकप्रियता वाढत चालली आहे. कारण राजकारणी मंडळी मोठ्या प्रमाणात क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करत आहे. या स्पर्धांमध्ये विजय मिळवणाऱ्या संघाला आकर्षक चषक आणि लाखो रुपयांची पारितोषिके दिली जातात.