राष्ट्रीय क्रीडा दिवस: भारतासाठी हिटलरच्या ऑफरला नकार देणारे मेजर ध्यानचंद ; वाचा त्यांच्या आयुष्यातील ५ खास गोष्टी...

आजचा दिवस (२९ ऑगस्ट ) हा भारतीय क्रीडा इतिहासातील सर्वात महत्वपूर्ण दिवसांपैकी एक आहे. यामागचे कारण असे की, आजच्याच दिवशी अशा खेळाडूचा जन्म झाला होता ज्याने आपल्या खेळाने अक्षरशः सर्वांना वेड लावून सोडले होते. आम्ही बोलतोय हॉकीचा जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद बद्दल. मेजर ध्यानचंद यांची आज ११७ वी जयंती आहे. मेजर ध्यानचंद (Major Dhyanachand) यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी झाला होता. त्यांनी १९२८,१९३२ आणि १९३६ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील ५ खास गोष्टी.

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मेजर ध्यानचंद यांनी लष्करात देखील नोकरी केली होती. त्यांनी भारतीय हॉकीला मोलाचे योगदान दिले आहे. हेच कारण आहे की, त्यांचा वाढदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिवस (National sports day) म्हणून ओळखला जातो.

१) मेजर ध्यानचंद यांनी आपल्या कारकीर्दीत एकूण ४०० गोल केले होते. त्यांनी १९२६ पासून ते १९४८ पर्यंत भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यादरम्यान त्यांनी ३ वेळेस भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.

२) १९३५ मध्ये मेलबर्नच्या मैदानावर दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांनी मेजर ध्यानचंद यांची भेट घेतली होती. मेजर ध्यानचंद यांची हॉकी खेळण्याची शैली पाहून डॉन ब्रॅडमन देखील आश्चर्यचकित झाले होते. त्यांचे म्हणणे होते की, क्रिकेटमध्ये जशा धावा करतात तसे मेजर ध्यानचंद हॉकीमध्ये गोल करतात.

३) मेजर ध्यानचंद वयाच्या १६ व्या वर्षी सैन्यात दाखल झाले होते. सैन्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी हॉकी खेळायला सुरुवात केली होती. त्यांना हॉकी खेळायची इतकी आवड होती की, ते रात्री उशिरापर्यंत हॉकीचा सराव करायचे. हेच कारण होते की, त्यांच्या मित्रांनी त्यांना चांद म्हणायला सुरुवात केली होती.

४) बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर हिटलरने मेजर ध्यानचंद यांना जर्मनीच्या नागरिकत्वाची ऑफर दिली होती. मेजर ध्यानचंद यांचा खेळ पाहून हिटलर खूप खुश झाला होता. हिटलरची इच्छा होती की, मेजर ध्यानचंद यांनी जर्मनीच्या लष्करात भरती व्हावे.मात्र मेजर ध्यानचंद यांनी हिटलरला नकार दिला होता. 

५) मेजर ध्यानचंदला उगाच हॉकीचा जादूगार म्हणत नव्हते. क्रिकेटमध्ये फलंदाज जसे धावा करतात तसेच मेजर ध्यानचंद हॉकी स्टिकने गोल करायचे. नेदरलँडमध्ये त्यांच्या हॉकी स्टिकची चौकशी करण्यात आली होती. असा दावा करण्यात आला होता की, मेजर ध्यानचंद यांच्या हॉकी स्टिकमध्ये चुंबक आहे. मात्र असे काहीच नव्हते त्यांच्या हॉकी स्टिकमध्ये नव्हे तर त्यांच्या खेळात एक वेगळीच जादू होती.

मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. २०१२ मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला होता.

सबस्क्राईब करा

* indicates required