कामोत्तेजना वाढवण्यासाठी विकले जाणारे 'सांड'चे तेल!! खरं काय आणि खोटं काय?
देशात अनेक वनस्पती या आयुर्वेदिक समजल्या जातात आणि त्यांचा वापर करून उपचार केले जातात. तसेच काही पशु पक्षी देखील काही आजारांवर प्रभावी समजले जाऊन त्यांचा उपचार केला जात असतो. याकामासाठी मात्र अनेकवेळेस या पशु-पक्षांचा जीव घेतला गेल्याची उदाहरणेही आपण पाहिली असतील. काही वेळेस काही पशूंचा आणि ज्या उपचारांसाठी त्यांचा वापर होत असतो, त्यांचा काही संबंध नसतो. तरीही सर्रास अर्धवट माहिती असलेल्या लोकांकडून पशुपक्षांचा जीव घेतला जात असतो.
गेल्या काही वर्षात कामोत्तेजना वाढविण्यासाठी लोकांकडून चित्रविचित्र मार्ग योजले गेल्याचे दिसून येत आहे. यातच जडीबुटी देणाऱ्या लोकांच्या बोलण्याला भुलूनही आपल्या देण्यात येणारे औषध खरेच प्रभावी आहे का याची कुठलीही चौकशी न करता घेतले जाते.
रस्त्यांवर बसलेल्या या जडीबुटी बाबांकडून विकले जाणारे एक महत्वाचे कामोत्तेजक औषध म्हणजे सांडेचे तेल. या तेलाचा महिमा सांगण्याची गरज नाही. रस्त्याच्या कडेला तंबू मांडून बसलेले अनेक हकीम, वैद्य म्हणवून घेणारे लोक या तेलाचे महत्व पटवून देतात. ऐकणाऱ्यालाही घरी गेल्याबरोबर वळूसारखी शक्ती येईल का काय असा विचार मनात येत असतो.
या सांड तेलाचा आणि सांड किंवा वळू नावाच्या प्राण्याचा काही संबंध नाही. या शब्दाचा उगम हा सारा हार्डविकी नावाच्या पालीपासून झाला आहे. या पालीची चरबी काढून ते औषध रुपात कामोत्तेजना वाढावी यासाठी दिले जात असते. सारा हार्डविकी नावाची पाल ही थारच्या वाळवंटात सापडते. पाकिस्तानचा काही भाग आणि भारतातील कच्छ भागात तसेच राजस्थानात काही भागात ही पाल सापडते. शुष्क वाळवंटात जमिनीवर खड्डे करून जमिनीच्या आत या पाली राहत असतात.
वाळवंटी परिसरातील लोकांना या पालींची पुरेशी माहिती असल्याने ते बरोबर जमिनीच्या आतील पालीला हुडकून काढत असतात. पाकिस्तानातील खलाशी या पालीचा उपयोग हा शीघ्रपतनावर उपाय म्हणून करताना दिसतात. मेडिकल सायन्स मात्र ही गोष्ट सपशेल नाकारते. सारा हार्डविकी पाल आणि कामोत्तेजना यांचा काहीही संबंध नाही असे सिद्ध करण्यात आले आहे. याचा जास्तीतजास्त फायदा म्हणजे यात पॉली अन्सेच्युरेटेड फॅटी ऍसिड असते. ज्यामुळे गुडघेदुखी आणि मांसपेशींच्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो. पण तरीही लोकांना यापासून इतर फायदा होईल असे पटवून देण्यात येते.
खलाशी या पद्धतीने या पालीचा उपयोग करतात. सारा हार्डविकी ही पालीची प्रजात ही लांब काटेरी शेपूट असलेली प्रजात म्हणून ओळखली जाते. ही पाल आणि कामोत्तेजना यांचा इतका संबंध लावला गेला आहे की दररोज कित्येक पाली मारल्या जातात. आधी तर हे खोटे वैद्य या पालीचा मणका मोडतात. यामुळे ती जिवंत तर राहते, पण तिला कायमस्वरूपी अपंगत्व येते. हे यासाठी केले जात असते की ती जोवर या भोंदू वैद्यांना गिऱ्हाईक मिळत नाही तोवर ती काहीही हालचाल करायला नको, तसेच ती जिवंत देखील असायला हवी. सांडेचे तेल ज्याला म्हणतात ते या पालीच्या शेपटीजवळ एक छोटीशी पिशवी असते. ही पिशवी गरम करून त्यातली चरबी काढली जात असते.
हा प्रकार भारतात देखील अनेक ठिकाणी होत असतो. रस्त्याच्या कडेला अनेक वेळा या पालीचा बाजार मांडलेला दिसून येतो. समोर निपचित पडलेली पाल ही अपंग करण्यात आली आहे हे पाहणाऱ्याच्या लगेच लक्षात येत नाही. लोकांना या पालीबद्दल ठाम विश्वास असल्याने लोक देखील या पालीच्या माध्यमातून आपली लैंगिक क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
भाजीपाला विकावा तसा या निष्पाप प्राण्याचा रस्तोरस्ती बाजार मांडलेला दिसतो. पण ही पाल मारणे हे बेकायदेशीर आहे. तसेच यांच्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या हत्यांमुळे सारा हार्डविकी नावाची पालीची प्रजात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पुढच्या वेळी जेव्हा कोणी सांडेचे तेल किती 'कामा'चे आहे हे पटवून द्यायचा प्रयत्न करेल तेव्हा हा लेख त्याच्या तोंडावर चिकटवून द्यावा. जेणेकरून या निष्पाप जीवाची अधिक हानी होणार नाही.