दिग्गजाच्या सन्मानार्थ क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय! शेन वॉर्नच्या नावाने दिला जाणार मानाचा पुरस्कार...
विश्व क्रिकेटमधील दिग्गज गोलंदाजांपैकी एक दिवंगत शेन वॉर्न याचा सन्मानार्थ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया दरवर्षी आपल्या खेळाडूंना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करत असते. यामध्ये दुसरा मानाचा पुरस्कार म्हणजे 'पुरुष टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर' वर्षभरात कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. मात्र आता हा पुरस्कार दिग्गज खेळाडू शेन वॉर्नच्या नावाने दिला जाणार असल्याची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली आहे.
शेन वॉर्नच्या नावाने दिला जाणार पुरुष टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार..
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा निर्णय दक्षिण आफ्रिका विरुध्द सुरू असलेला दुसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी घेतला आहे. शेन वॉर्न हा ऑस्ट्रेलिया संघातील दिग्गज गोलंदाज होता. त्याने आपल्या कारकीर्दीत एक वेळेस हा पुरस्कार पटकावला होता. त्याने २००५ मध्ये झालेल्या ॲशेस मालिकेत ४० गडी बाद केल्यानंतर २००६ मध्ये टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार पटकावला होता.
यावर्षी शेन वॉर्नने घेतला जगाचा निरोप..
वर्ष २०२२ हे क्रिकेट ऑस्ट्रेलिया कधीच विसरू शकणार नाही. कारण याच वर्षी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज गमावला आहे.४ मार्च २०२२ रोजी शेन वॉर्न आपल्या मित्रांसह सुट्ट्यांच्या आनंद घेण्यासाठी थायलंडच्या सामुई बेटांवर गेला होता. त्यावेळी त्याचा मृत्यू झाला. शेन वॉर्नच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात शोककळा पसरली होती. तो आपल्या फिरकी गोलंदाजीसाठी इतका प्रसिद्ध होता की, त्याला फिरकीचा जादूगार देखील म्हटले जायचे.
अशी राहिली कारकीर्द..
शेन वॉर्नने आपल्या कारकीर्दीत ऑस्ट्रेलिया संघासाठी एकूण १४५ कसोटी सामने खेळले ज्यामध्ये त्याला ७०८ गडी बाद करण्यात यश आले होते. यादरम्यान ७१ धावा खर्च करत ८ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. तर वनडे क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १९४ वनडे सामन्यांमध्ये २९३ गडी बाद केले होते. वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना ३३ धावा खर्च करत ५ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.