मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर - दर्पणकार
मला आठवते आम्ही लहान असताना सकाळीच घरी वर्तमान पत्र टाकणाऱ्या मुलाची वाट पाहत असु. जसे त्या मुलाने दरवाज्यासमोर येऊन वर्तमानपत्र घरात टाकले की आम्ही चारही भाऊ त्यावर अक्षरश: झडप घालीत असु . त्या वर्तमानपत्रातील अनेक पानामधुन हाताला लागेल ते पान घेऊन त्यातील लिखाण वाचून फडशा पाडत असु मग आम्ही हातातील पानांची अदलाबदल करत असु. कधी कधी अति उत्साहात बळ जबरी करताना आमच्यातील एका कडुन काही पाने फाटली जात असत मग आई अतिशय भडकायची व आम्हाला वेताच्या छडीचा मार देत असे.मग आम्ही सर्कशीत असलेल्या हिंस्र श्वापदे वीजेचा प्रवाह असलेल्या चाबकाला घाबरुन एका बाजुला रांगेत उभे राहतात तसे आम्ही गप्प उभे राहत असु. काही वेळातच ही आणीबाणी सदृश्य परिस्थिती निवळली की मग पुन्हा ती फाटलेली पाने भाताच्या शिताने चिकटवून वाचनास सुरवात करत असु. हे सगळेच आज कोणाला खरे वाटणार नाही कारण आज मी अनेकांच्या घरी सकाळी आलेले ताजे घडीतले वर्तमानपत्र दुसर्या दिवशी त्याच अवस्थेत दिवाणखान्याची शोभा वाढवत असताना पहातो तेव्हा मनाला अतिशय वेदना होतात.
आपल्या भारतात पहिले वर्तमानपत्र कोणी सुरु केले हे कदाचित आपणास माहित नसेल . सुरुवातीस जेव्हा ब्रिटिश आले तेव्हा त्यांनी २९ जानेवारी १७८० रोजी ' बेगांल गॅझेट ' नाव असलेले ईग्रंजीत साप्ताहिक सुरु केले. यात त्यांचा स्वार्थ असल्याने ठिकठिकाणी स्वतःची मुद्रणालये सुरु केली.समाज प्रबोधन करण्यासाठी वृतपत्र हे महत्त्वाचे साधन आहे हे जेव्हा भारतीयांना कळले तेव्हा मग आपल्या देशात कालांतराने आपले विचार प्रकट करण्यासाठी अनेक भारतीय भाषांतील वृत्तपत्र निघू लागली. जेम्स ऑगस्टस हिकीच्या इंग्रजी 'बेंगॉल गॅझेट'च्या आगमनानंतर तब्बल अर्ध्या दशकाने म्हणजेच ५२ वर्षांनी ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य जांभेकर या आपल्या महाराष्ट्रातील कोकणातील विद्वानानं 'दर्पण' च्या रुपाने पहिले मराठी वृत्तपत्र सुरु करुन मराठी भाषेतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान मिळविला आणि मग मुंबईत जांभेकरांनी 'दर्पण'च्या माध्यमातून सुरु केलेली वैचारिक प्रबोधनाची पेरणी मराठी भूमीत रुजण्यास सुरुवात झाली.१९ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मराठी समाजमन घडविण्यात आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा मोठा वाटा होता.जसा या 'दर्पण' वृत्तपत्राचा जन्म झाला तसे मराठी वृत्तपत्रविश्वात नवी पहाट उगवली. यासाठी गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांचेही सहकार्य बाळशास्त्रींना लाभले. भाऊ महाजन यांच्या सहकार्याने मराठी तर स्वत: बाळशास्त्री इंग्रजी मजकुराची बाजू 'दर्पण' साठी सांभाळत असत. दर्पण हे वृत्तपत्र इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होत असे.
यात दोन स्तंभ म्हणजे काँलम असत. उभ्या मजकुरात एक कॉलम मराठी भाषेत व दुसरा काँलम इंग्रजी भाषेत असे. मराठी भाषेतील मजकूर हा अर्थातच आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी होता व इंग्रजी भाषेतील मजकूर हा वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे तेव्हाच्या सत्ताधारी राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठीच होता. ब्रिटिश कालखंडात इंग्रजांच्या विरोधात लिखाण करण्यास मनाई होती. असा परिस्थितीतही जांभेकर यांनी दर्पणच्या संपादकपदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. ज्यांना मराठी वाचता येत होते त्यांनाही हे वृत्तपत्र म्हणजे काय हे तेव्हा पटकन कळले नाही कारण वृत्तपत्र ही संकल्पनाच मुळी त्याकाळी लोकांना नवीनच होती. त्यामुळे दर्पण वृत्तपत्राचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात फारच कमी होते. पण काहि दिवसांनी हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजत गेली तसे त्या वृत्तपत्रातील विचारही रुजुन त्यांचा प्रतिसाद वाढत गेला. दर्पण अशा रितीने साडेआठ वर्षे चालले आणि जुलै १८४० ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. केवळ लोकांचे कल्याण आणि लोकांचे शिक्षण असेच उदात्त उद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन 'दर्पण' प्रकाशित करत राहिले . याची साक्ष म्हणजे 'दर्पण' मध्ये आताची वृत्तपत्रे जशा भरमसाठ जाहिराती छापतात तशी एकही जाहिरात त्यांनी स्वतःच्या वृत्तपत्रात छापली नाही. ह्या साठी त्यांनी स्वत:चे पैसे खर्च करुन आठ वर्षे लोकांसाठी वृत्तपत्र त्याकाळी सुरु ठेवले. यावरुनच आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा वृत्तपत्र सुरू करण्यामागील हेतू आपण लक्षात घेतला पाहिजे. त्या काळातील गव्हर्नर जेम्स कार्नाक यांनी जस्टीस ऑफ पीस असा किताब देऊन बाळशास्त्रींचा गौरव केला.
आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा यांचा कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी ६ जानेवारी १८१२ रोजी जन्म झाला. वडील गंगाधरशास्त्री हे पंडित तर आई सगुणाबाई धार्मिक आणि धर्मपारायणवादी. त्यांचाच वारसा बाळशास्त्रींना मिळाला. १८२४ च्या सुमारास म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षीच संस्कृतचे शिक्षण पूर्ण करुन जांभेकरांनी मुंबई गाठली. मुबंईत त्यांच्या बहिणीचे म्हणजे लाडूबाईचे यजमान रामशास्त्री जानवेकर हे (दी बॉम्बे नेटिव्ह स्कूल सोसायटी) शाळेचे तपासनीस होते. त्यांच्याकडे बाळशास्त्रींची निवास व्यवस्था झाली. मुंबईतील वास्तव्य, शिक्षण, शिक्षणातील अडीअडचणी, त्यावर केलेली मात. दर्पण दिनदर्शिकेचे प्रकाशन व्यावसायिक अडचणी असा खडतर प्रवास बाळशास्त्री यांनी केला. इंग्रजी भाषेचा सखोल अभ्यास करुन विविध विषयांचे ज्ञान मिळवून त्याचा उपयोग आपल्या समाजाला कसा होईल याकडे बाळशास्त्री जांभेकर यांचा ओढा होता. यासाठीच त्यांनी इंग्रजीचे ज्ञान आत्मसात केले. व नंतर त्यांनी अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व मिळविले . त्याशिवाय ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, गुजराती आणि बंगाली भाषांवरही त्यांची चांगली पकड होती. १८३४ साली भारतातील पहिले प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक होण्याचा बहुमान बाळशास्त्रींना मिळाला आणि १८४५ साली ते राज्याच्या शिक्षण विभागाचे संचालक झाले. बाळशास्त्रींनी त्यांच्या हयातीत विविध विषयांवर ग्रंथ लिहिले. यात प्रामुख्याने भूगोल, इतिहास, भौतिकशास्त्र, गणित, खगोलविद्या, मानसशास्त्र आदी विषयांचा समावेश आहे. सोप्या आणि साध्या मराठी भाषेत सर्वांना समजतील, असे हे ग्रंथ आहेत. याच बरोबर त्यांनी बालव्याकरण, भूगोलविद्या, सारसंग्रह आणि नीतीकथा हे चार ग्रंथ लिहिले. हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास हा ग्रंथ १८५१ साली त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला.
आचार्य जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील समाजसुधारक होते. दर्पण हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोक शिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करताना या विषयांवर विपुल लेखन केल्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले.
ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत. उपयोजित ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती. देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे. तसेच सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे, याची जाणीव त्यांना झाली होती. विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते. थोडक्यात, आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वीच अपेक्षित होता. त्या अर्थाने ते द्रष्टे समाजसुधारक होते.
सार्वजनिक ग्रंथालयांचे महत्त्व ओळखून त्यांनी बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केली. विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना केली. यातूनच पुढे स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांसारखे दिग्गज कार्यरत झाले. १८४० मध्येच त्यांनी दिग्दर्शन या मराठीतील पहिल्या मासिकाची सुरुवात केली. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी ५ वर्षे काम पाहिले. या मासिकातून त्यांनी भूगोल, इतिहास, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान आदी विषय नकाशे व आकृत्यांच्या सहाय्याने प्रसिद्ध केले. या अभिनव माध्यमातून त्यांनी लोकांची आकलन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला.
एकदा आचार्य अत्रे हे बाळशास्त्री जांभेकरांबद्दल छान म्हणाले होते.
"बाळशास्त्री जांभेकर हे बोलके नव्हे तर कर्ते सुधारक होते. "
म्हणुनच आयुष्यात केवळ प्राध्यापक म्हणून अध्ययनच न करता बाळशास्त्रींनी आपल्या दर्पण मधून सामाजिक सुधारणेवर भर दिला. दादाभाई नौरोजी हे आचार्य बाळशास्त्रींचे विद्यार्थी होते. बाळशास्त्री जांभेकर हे आद्य मराठी पत्रकार आणि आद्य समाजसुधारक होते. त्यांच्यासोबत त्यांना आद्य प्राध्यापक संबोधिले जाते. त्यांचे हे महान कार्य पुढील कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरत आहे. महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.
लेखन व माहिती संकलन:
रत्नाकर सावित्री दिगंबर येनजी