काय असतो टास्क फ्रॉडचा सापळा- जाणून घ्या आणि सतर्क रहा.
सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२२ -एका ऍड फिल्म मेकरला सायबर गुन्हेगारांकडून ९६ लाख रुपयांचा चुना.
मार्च २०२३ - निवृत्त अधिकार्याला १ कोटी रुपयांना ऑनलाईन ठकवले.
जून २०२३ - चक्क १४० आयटीवाल्यांना १६ करोड रुपयांचा चुना.
जून २०२३ - मल्टिनॅशनल कंपनीत काम करणार्या अधिकार्याला १.६४ कोटींना आणि
खाजगी कंपनीत कार्यरत असलेल्या एका स्त्रीला ८७.८४ लाखाला ऑनलाईन गंडा.
गेल्या काही दिवसात घडलेल्या ह्या घटना आहेत. हा फक्त पुण्या-मुंबईतला आकडा आहे.महाराष्ट्र आणि देशभराचे गणित इथे विचारातच घेतलेले नाही. यावरून तुम्हाला ह्या प्रचंड मोठ्या फसवणुकीचा अंदाज येईल. विशेष म्हणजे हे फसवले गेलेले सर्व लोक ’टास्क फ्रॉड’च्या आमिषाला बळी पडलेले आहेत. सुशिक्षित आणि नोकरदार लोकांचा देखील यामध्ये समावेश आहे हे विशेष. झटपट मार्गाने हवा असलेला पैसा, कधी नोकरीच्या जोडीने एखादा जोडधंदा असावा म्हणून तर कधी जॉब हवा, मग तो कोणताही असो अशा विचाराने असेल पण अनेक लोक ह्या टास्क फ्रॉडच्या सापळ्यात अडकत चालले आहेत. विशेषतः कोरोना काळामध्ये अनेकांच्या नोकर्या गेल्या,अनेकांची पैशाची निकड वाढली तेव्हापासून ही फसवणूक अधिक प्रमाणात वाढली आहे.
हे टास्क फ्रॉड म्हणजे नक्की असते तरी काय?
नोकरीच्या शोधात असलेले, घरी फावल्या वेळात काही काम शोधणारे अशा विविध लोकांना ह्यामध्ये लक्ष केले जाते. तुमच्या व्हॉट्सएपवर किंवा इतर मेसेंजरवर एक मेसेज येतो. ’घरबसल्या हजारो रुपये कमावा.’ आणि ते कसेकमावायचे? तर तुम्हाला काही व्हिडिओज लाइक करायला लावतात किंवा एखाद्या सहल कंपनीसाठी छोटा रिव्ह्यू लिहायचा असतो, फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर एखाद्या व्यक्तीला फॉलो करायचे असते. अशी अगदी सहज कोणीही विनाकष्ट करू शकेल अशी कामे तुम्हाला करायला सांगितली जातात. आणि ह्या प्रत्येक ’टास्क’साठी तुम्हाला वेगवेगळे पैसे मिळणार असतात. तुम्ही त्याची तयारी दाखवली की, मग लगेच तुम्हाला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड करण्यात येते. तिथे तुमच्यासारखे अनेक लोक तुम्हाला दिसतात. काही वेळा तुम्ही ग्रुपमध्ये ऍड
झाल्याबरोबर तुम्हाला वेलकम बोनस म्हणून तुमच्या खात्यात पाचशे ते हजार रुपये लगेचजमा केले जातात. इथून सुरू होतो खरा खेळ..
इथे तर दुप्पट काय पैसे तिप्पट होण्याची देखील खात्री दिली जाते.
काहीही न करता खात्यात आलेले पैसे बघून लोकांना आनंद तर होतोच पण समोरच्या व्यक्तीवर विश्वास देखील वाढतो. आता तुम्हाला लहान सहान टास्क दिले जातात. अमक्या व्यक्तीला इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि त्याचा स्क्रीनशॉट टाका, एखादी पोस्ट लाइक करा आणि स्क्रीन शॉट ग्रुपवर टाका असे हे टास्क असतात. ते केले की लगेच तुमच्या खात्यात पैसे जमा होतात. एकदा हा खेळ रंगला की मग तुम्हाला डबल कमाईचे आमिष दाखवले जाते. दहा हजार गुंतवले तर पंधरा हजार, पंचवीस गुंतवले तर पस्तीस हजार असे सांगण्यात येते. हुरळून गेलेले लोक हे पैसे गुंतवतात आणि चक्क काही दिवसात त्यांना कबूल केल्याप्रमाणे दुपटीने पैसे बँक खात्यात जमा देखील होतात. एकदा तुम्ही ह्या सापळ्यात पूर्ण अडकलात की, मग तुम्हाला क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यासाठीसुचवले जाते. इथे तर दुप्पट काय पैसे तिप्पट होण्याची देखील खात्री दिली जाते. पण त्यासाठी तुम्हाला काही मिनिटांचाच कालावधी गुंतवणूक करण्यासाठी दिला जातो. त्यासाठी तुम्हालाएका कंपनीच्या खात्यात पैसे भरण्यासाठी सांगितले जाते. तुम्ही विचार करेपर्यंत ग्रुपमधील इतर लोक फटाफट पैसे भरून त्याचे स्क्रीनशॉट देखील शेअर करतात. कोणी लाख तर कोणी दोन लाख गुंतवलेले असतात. अर्थात हे लोक ह्या झोलझालमध्ये सामील असतात हा भाग वेगळा.
फार कमी लोकांना क्रिप्टो आणि त्याच्या व्यवहारांबद्दल माहिती असते
आता तुम्ही देखील धाडस करता आणि एखाद दोन लाख गुंतवून टाकता. एकदा हे पैसे गुंतले की, मग तुम्हाला एका क्रिप्टो करन्सी ट्रेड करणार्या वेबसाइटवर नेले जाते. खरेतर, फार कमी लोकांना क्रिप्टो आणि त्याच्या व्यवहारांबद्दल माहिती असते. पण क्रिप्टोमध्ये गुंतवणूक म्हणजे खूप पैसा हे गणित मात्र प्रत्येकाला माहिती असते. तिथे मग तुमचा आयडी पासवर्ड तयार करावा लागतो पण तुमचे बँक अकाउंट बाजूला होते आणि तुम्हाला एक ई- वॉलेट मिळते. रोजच्या रोज तुमच्या ह्या ई-वॉलेटमध्ये हजारो रुपये जमा होताना दिसायला लागतात. मग अजून प्रलोभन, अजून गुंतवणूक असे चक्र चालू होते. काही लोकं अल्पसंतुष्ट असतात. ते वॉलेटमध्ये चार पाच लाख रुपये दिसले, की ते बँक खात्यात जमा करा म्हणून मागे लागतात.त्यांना ’अजून टास्क पूर्ण झाला नाहीये, कालावधीच्या आधी पैसे हवे असतील तर लाख रुपये भरा, ते नंतर परत मिळतील असे सांगितले जाते. काही वेळा तर धमकावले देखील जाते.
पोलिसांच्या हाताला देखील काही माग लागत नाही.
दहा बारा लाख गुंतवल्यावर देखील हाताला काही लागत नाहीये हे लक्षात आल्यावर काही लोक शहाणे होतात पण तोवर वेळ निघून गेलेली असते. अपेक्षित रक्कम जमा झाली की, हे सायबर भामटे ग्रुपमधल्या चाट डीलिट करतात, नंबर बंद करतात आणि पळ काढतात. शक्यतो ह्या फसवणुकीसाठी टेलिग्रामची निवड केली जाते. टेलिग्राममध्ये मोबाइल नंबर शो न करता चॅट करता येते आणि इथे ग्रुपमध्ये मेसेज पाठवणारा आपले आणि संपूर्ण ग्रुपचे चाट देखील डिलीट करू शकतो. त्यामुळे पोलिसांच्या हाताला देखील काही माग लागत नाही. अत्यंत हुशारीने हे सगळे नेटवर्क चालवले जाते.
एकच लक्षात ठेवा वाचकांनो, कष्टाशिवाय लक्ष्मी नाही आणि बीन कष्टाची लक्ष्मी ही कधी अलक्ष्मी ठरेल हे सांगता येत नाही. तेव्हा सावध राहा, अशा झटपट पैशाच्या मागे धावू नका.कोणतेही काम स्वीकारण्याआधी त्याची पूर्ण चौकशी करा आणि मगच कामाला हात घाला.
-प्रसाद ताम्हनकर