का केला इंग्लंडने स्कॉटलंडच्या राणीचा शिरच्छेद?
भारतासारखाच इंग्लंड हा देशही राजेरजवाड्यांचा देश आहे. इतका की आपण स्वातंत्र्यानंतर लोकशाही अवलंबली पण इंग्लिश लोकं अजूनही आपली राजेशाही कवटाळून बसलेली आहेत. इंग्लंडच्या गादीचा इतिहास इतर कोणत्याही देशातील राजगादीच्या इतिहासाइतकाच रक्तरंजित आहे. वरच्या चित्रात आहेत स्कॉटलंडची राणी मेरी आणि तिचा शिरच्छेद करणारी राणी एलिझाबेथ(पहिली). आज आम्ही या लेखातून तुम्हांला सांगत आहोत या दोघींनी मिळून घडवलेल्या इतिहासाबद्दल..
मुळातच ग्रेट ब्रिटन या नावाने ओळखलं जाणारं राष्ट्र इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंड या राज्यांच्या एकत्रीकरणातून झालेलं आहे. पुढे उत्तर आयर्लंडही त्याचा भाग बनलं. त्यापैकी इंग्लंड हे प्रमुख राज्य असल्यानं इंग्लंडचा राजा ग्रेट ब्रिटनचा राजप्रमुख मानला जातो. तरी काही राजसंबंधांमुळे इतर राज्यांचे हितसंबंधही इंग्लंडच्या राजगादीशी जोडले गेले आहेत.
ही आहे क्वीन मेरी
त्यापैकी एक म्हणजे स्कॉटलंडची राणी क्वीन मेरी. मेरी केवळ सहा दिवसाची असताना तिचे वडील, आणि स्कॉटलंडचे राजे किंग जेम्स ५वे यांचं देहावसान झालं. प्रथेनुसार मेरीला राणी घोषित केलं गेलं. वय लहान असल्यामुळं तिला फ्रान्समध्ये ठेवण्यात आलं आणि ती मोठी होईपर्यंत स्कॉटलंडचा कारभार रिजन्टांच्याद्वारे चालवला गेला.
क्वीन मेरी आपला पहिला पती, फ्रान्सचा राजा फ्रान्सिससोबत
मोठी झाल्यावर वयाच्या १६व्या वर्षी तिचं लग्न डॉफीन ऑफ फ्रान्स, फ्रान्सिस याच्याशी झालं. पुढच्याच वर्षी फ्रान्सिस हा फ्रान्सिस २रा या नावानं फ्रान्सचा राजा झाला आणि मेरी त्याची राणी बनली. पण राजगादी सांभाळल्यापासून वर्षभरातच फ्रान्सिसचं निधन झालं. मेरी विधवा होऊन स्कॉटलंडला परतली.
क्वीन मेरी आणि तिचा दुसरा पती लॉर्ड डार्नली
स्कॉटलंडला परतल्यावर मेरीने स्कॉटलंडचं पदसिद्ध राणीपद स्विकारलं. मेरीने नंतर सुमारे चार वर्षांनी आपला मामेभाऊ हेन्री स्टुअर्ट, लॉर्ड डार्नली याच्याशी लग्न केलं. हे लग्न फार सुखावह झालं नाही. तीन वर्षांतच लॉर्ड डार्नलीचं घर स्फोटामध्ये उध्वस्त झालं आणि बागेत त्याचा गूढरीत्या खून झालेला आढळला. यामध्ये मेरीचा तत्कालीन प्रियकर जेम्स हेपबर्न, अर्ल ऑफ बॉथवेलवर संशय व्यक्त केला गेला पण चौकशी अंती त्याला निर्दोष ठरवलं गेलं. जेम्स हेपबर्न आणि मेरीनं या घटनेनंतर महिन्याभरातच लग्न केल्यामुळं जनमत मेरीच्या विरोधात गेलं. लोकांचा रोष वाढत गेल्यामुळे रिजन्टांनी मेरी आणि जेम्सना लॉक् लेवेनच्या किल्ल्यात बंदी बनवलं. या घटनेमुळे मेरीचं राणीपद धोक्यात आलं. आपल्या लॉर्ड डार्नलीपासून झालेल्या मुलाला, त्यावेळी केवळ एक वर्ष वयाच्या असलेल्या सहावा जेम्स याला, आपला वारस नेमून तिला राजगादीचा त्याग करावा लागला.
मेरीच्या शिरच्छेदाच्या चार वर्षं आधी काढलं गेलेलं मेरी आणि जेम्सचं डबल पोट्रेट
या घटनेमुळं तिला जेम्सबरोबर इंग्लंडचा आश्रय घ्यावा लागला. इंग्लंडला आल्यावर सुरूवातीला इंग्लंडची राणी एलिझाबेथ १ली, हिने तिचं चांगलं स्वागत केलं पण काही दिवसातच या मेरीनं राणी एलिझाबेथच्या गादीलाच आव्हान दिलं आणि हेन्री स्टुअर्टबरोबर झालेल्या लग्नाच्या संबंधाने स्वतःला इंग्लंडच्या राणीपदाचा वारस घोषित केलं. यासाठी तिला इंग्लंडमधील कॅथलिकांनी मोठा पाठींबा दिला आणि स्पॅनिशांनीही मदत केली. हे एलिझाबेथला आवडणारं नव्हतंच. तिनं मेरीला नजरकैदेत ठेवलं. पुढे इंग्लंडच्या अन्तर्भागातील वेगवेगळ्या किल्ल्यांमध्ये आणि राजवाड्यांमध्ये तिने ही नजरकैद सुरू ठेवली.
नजरकैदेत असूनही मेरीच्या कारवाया सुरूच राहिल्या. वेगवेगळ्या पद्धतीने मेरीने एलिझाबेथविरोधी असलेल्या उत्तरेकडील बंडाळ्यांना उत्तेजन दिलं. मेरीच्या या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कारवाया सुमारे १९ वर्ष सुरू होत्या. पण १५८६च्या शेवटी राणी एलिझाबेथच्या खुनाची योजना आखल्याच्या आरोपाखाली मेरीला अटक करण्यात आली आणि चौकशीअन्ती तिला मृत्यूदंड फर्मावण्यात आला.
मेरी राणीचं वेस्ट मिनिस्टर इथलं थडगं..
आजही कित्येक स्कॉटस् तिला आपली राणी मानतात आणि एलिझाबेथ ऐवजी तिलाच इंग्लंडचं सम्राज्ञीपद मिळायला हवं होतं असं त्यांना वाटतं. याच मेरीचा मुलगा, पहिल्या एलिझाबेथ राणीच्या मृत्यूनंतर किंग जेम्स ६ वा, या नावाने इंग्लंडचा राजा बनला.
आजच्या दिवशी, म्हणजे ८ फेब्रुवारी, १५८७ मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली स्कॉटलंडची राणी मेरीचा शिरच्छेद करून शिक्षेची अंमलबजावणी केली गेली.