या मुलांनी चक्क बांधलं तरंगतं मैदान...वाचा एका जिद्दीची कहाणी!!!
संकटांच्या छाताडावर उभे राहून त्याच संकटाना आपली खासियत बनवण्याची हि अद्भुत कथा आहे मंडळी !!!
ही कथा आहे थायलंड मधल्या ‘कोह पान्यी’ या लहानश्या गावाची. हे अख्ख गाव पाण्यात वसलंय. ३६० मच्छिमार कुटुंबाच्या या गावाला जमीन तशी नाहीच. या खेड्यातल्या मुलांनी १९८६ साली फूटबॉल वर्ल्डकप टीव्हीवर पाहिला आणि त्यांना हा खेळ प्रचंड आवडला.
आपणही फुटबॉल खेळावं अशी मुलांची इच्छा झाली. पण जमीनच नाही तर खेळणार तरी कुठं? गावातल्या माणसांना ही इच्छा बोलून दाखवल्यावर सगळेजण त्यांना हसले. आपलं हसं तर झालं, पण खेळायची इच्छाही आहेच. मग यावर मुलांनी एक अफलातून आयडिया काढली.
ही कल्पना म्हणजे गाव जसं तरंगणारं आहे, तसंच मैदानही तरंगणार बनवण्याची होती. मुलांनी गावातली जुनी लाकडे जमा केली आणि एक तरंगतं मैदान बनवलं. अश्या प्रकारे तयार झालं गावातीलं पाहिलं फुटबॉल मैदान. हे काम सोप्पं नव्हतं मंडळी. तरीही जिद्दीने मुलांनी ते करून दाखवलं!!
मुलांच्या या कामावर गावातली लोकं अजूनही हसतच होती. या सर्वांकडे दुर्लक्ष करून मुलं फुटबॉलमध्ये पारंगत झाली. एवढी की दुसऱ्या शहरात झालेल्या फुटबॉल सामन्यात कोह पान्यी गावची मुलं दुसऱ्या क्रमांकावर आली.
या घटनेनंतर मात्र हसणाऱ्यांची तोंडे कायमची बंद झाली. मग काय, पूर्ण गावालाच फुटबॉलचं वेड लागलं आणि मुलांसाठी एक चांगलं तरंगतं मैदान खुद्द गावानंच बनवून दिलं. पुढे तर ‘पान्यी फुटबॉल क्लब’ची स्थापना देखील झाली. सध्या हा क्लब थायलंडमधला प्रतिष्ठेचा क्लब मानला जातो.
संकट कितीही मोठं असलं तरी त्यावर मात करता येते. हीच गोष्ट या मुलांनी दाखवून दिली आहे. अश्या या जिद्दीला बोभाटाचा सलाम!!!