विनोद खन्ना : जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी...
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/field/image/1493308691322.jpg?itok=eV2-lKhd)
बॉलीवडचे दिग्गज अभिनेते विनोद खन्नां यांचं आज वयाच्या ७०व्या वर्षी मुंबईत निधन झालं. त्यांच्या दमदार अभिनयाने त्यांनी आपली कारकिर्द गाजवली आणि लोकप्रियतेची शिखरं गाठली. आम्ही वाचकांसाठी त्यांच्या आयुष्यातील काही ठळक गोष्टी इथे देत आहोत.
विनोद खन्नांचा जन्म ६ अॉक्टोबर १९४६ मध्ये पाकीस्तानमधल्या पेशावर येथे झाला. पण स्वातंत्र्यावेळी झालेल्या फाळणीत त्यांचं कुटुंब मुंबईत येऊन स्थाईक झालं. त्यांना एक भाऊ आणि तीन बहिणी आहेत.
कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना विनोद खन्नांनी बॉलीवूडवर राज्य केलं. त्यांचे वडील टेक्स्टाईल, डाय आणि रसायनांचा व्यवसाय करायचे.
लहानपणी विनोद खन्ना बुजऱ्या स्वभावाचे होते. पण शाळेत असताना एकदा शिक्षकांनी त्यांना बळजबरीने नाटकात काम करायला लावलं आणि तेव्हापासून त्यांना अभिनयाची गोडी लागली.
'मुघल-ए-आझम', 'सोहलंवा साल' अशा तत्कालिन चित्रपटांनी विनोद खन्नांच्या मनावर परिणाम घडवला होता. सुपरस्टार राजेश खन्ना हे त्यांचे आवडते अभिनेते. त्यामुळे वडिलांच्या विरोधाला डावलून विनोद खन्नांनी बॉलीवूडमध्ये आपले पाय रोवले.
विनोद खन्ना हे असे अभिनेते आहेत ज्यांनी आपली फिल्मी कारकिर्द खलनायकाच्या भुमिकेतून सुरू केली आणि नंतर ते चित्रपटात नायकाचा प्रमुख रोल करू लागले. १९८६ मध्ये सुनील दत्त यांनी 'मन का मीत' या चित्रपटातून त्यांना व्हिलन म्हणून लॉन्च केलं.
'पूरब और पश्चिम', 'सच्चा झूठा', 'मेरा गांव मेरा देश', 'मस्ताना', 'ऐलान', अशा अनेक चित्रपटात निगेटिव्ह रोल केल्यानंतर शेवटी विनोद खन्नांना १९७१ मध्ये 'हम तुम और वोह' या चित्रपटात नायकाची भूमिका मिळाली.
विनोद खन्नांची पडद्यावर खास जोडी जमली ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत. या दोघांनी मिळून 'हेरा फेरी', 'खून पसीना', 'अमर अकबर अॅन्थोनी', 'परवरीश', 'मुकद्दर का सिकंदर' असे अनेक हिट सिनेमे दिले.
विनोद खन्ना हे बॉलीवूडचे एकमेव असे अभिनेते आहेत ज्यांनी यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना इंडस्ट्रीमधून तात्पुरती निवृती घेतली. १९७५ मध्ये त्यांनी 'ओशो' (गुरू रजनीश) यांचं शिष्यत्व स्वीकारलं होतं आणि अमेरिकेतील रजनीशपुरम येथे जाऊन त्यांच्यासाठी माळीकामही केलं होतं.
आपली पहिली पत्नी गीतांजली, यांच्यासोबत १९८० मध्ये विनोद खन्नांचा घटस्फोट झाला. राहुल आणि अक्षय खन्ना ही या दोघांची मुलं. त्यानंतर १९९० मध्ये विनोद खन्नांनी कविता, यांच्याशी लग्न केलं.
१९७७ मध्ये विनोद खन्ना भारतीय जनता पक्षाचे सदस्य झाले. आणि त्याच्या पुढील वर्षी पंजाबच्या गुरुदासपूरमधून त्यांनी निवडणूकही जिंकली.
विनोद खन्नांना एकूण ५ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. त्याचबरोबर १९९९ मध्ये फिल्मफेअर लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवार्ड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
विनोद खन्नांचा शेवटचा चित्रपट म्हणजे २०१५ मध्ये आलेला शाहरुखचा 'दिलवाले'
आज आपल्यात ते राहीले नसले तरी त्यांचा अभिनयरूपी ठेवा चाहत्यांना त्यांची कायम स्मृती देत राहील. बोभाटा कडून या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली !