computer

बेनझीर भुत्तो हत्याकांड!! पाकिस्तानने यामागचं सत्य कधीच बाहेर येऊ दिलं नाही!! यामागे कितीजणांचे किती फायदे होते याची गणतीच नाही..

इतिहासात जी काही हत्याकांडं झाली, त्यात अगदी अलीकडच्या काळात घडलेली हत्या म्हणजे बेनझीर भुत्तो हिची हत्या. आजही यामागचं रहस्य पूर्णपणे उलगडलेलं नाही.

बेनझीर भुत्तो हिचा जन्म १९५३ मध्ये कराचीतल्या एका श्रीमंत जमीनदार घराण्यात झाला. तिचे आजोबा जुनागढ संस्थानचे नवाब होते. साहजिकच त्यांचं घराणं श्रीमंत आणि सुशिक्षित होतं. बेनझीरचे वडील झुल्फिकार अली भुत्तो खूप लवकर राजकारणात आले. बेनझीर ही त्यांची सगळ्यात थोरली मुलगी. ती अगदी लहान होती तेव्हाच झुल्फिकार अली भुत्तो पाकिस्तानचे मंत्री होते. पुढे ते पंतप्रधानही झाले.

बेनझीर उच्च शिक्षण घेऊन लंडनहून परत आल्यानंतर वडिलांनीच तिला पुढे आणायला सुरुवात केली. त्यांच्या प्रभावामुळे तीही राजकारणात सक्रिय झाली. १९६७ मध्ये झुल्फिकार अली भुत्तो यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टी स्थापन केली. आयुब खानने केलेल्या बरबादीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पीपल्स पार्टीने लोकांच्या मूलभूत गरजा भागवण्यावर जास्त भर दिला. लोक आधीच्या आयुब खान सरकारला कंटाळले होते. त्यामुळे १९७१ मध्ये झुल्फिकार अली भुत्तो पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष बनले. नंतर कुठल्याही मीटिंगसाठी किंवा परिषदेसाठी जाताना ते बेनझीरला बरोबर घेऊन जायला लागले. त्यातून तिला राजकारण, खलबतं, चर्चा, मसलती यांचा बराच अनुभव मिळाला.

१९७७ मध्ये झुल्फिकार अली भुत्तो यांनी झिया उल हक यांची लष्करप्रमुख म्हणून नेमणूक केली. हा माणूस वरवर साधा होता. त्यामुळे भविष्यात तो आपल्याला फारसा त्रास देणार नाही, आपल्या कह्यात राहील असा भुत्तोंचा अंदाज होता. पण झालं उलटंच. झिया उल हकने पाकिस्तानमध्ये मार्शल लॉ लागू केला आणि सत्ता ताब्यात घेतली. झुल्फिकार भुत्तोंना कैदेत टाकलं. त्यांच्यावर तीन वर्षांपूर्वी झालेल्या महंमद कसुरी नावाच्या नेत्याच्या हत्येचा आरोप ठेवला. पुढे एप्रिल १९७९ मध्ये भुत्तोंना फाशी दिली गेली. त्यानंतर बेनझीर, तिची आई आणि भावंडं यांना नजरकैदेत ठेवलं गेलं. १९८८ पर्यंत भुत्तो कुटुंबीयांचा झिया उल हक सरकारने भरपूर छळ केला. दरम्यानच्या काळात बेनझीरचा भाऊ शाहनवाज खान याचा कान्स येथे संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. पीपीपीच्या अनेक कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली.

अखेर सरकारने लोकांच्या दडपणाला बळी पडून मार्शल लॉ हटवला. आता बेनझीरला वाटलं, आपल्याला थोडे बरे दिवस येतील. एका नव्या पाकिस्तानची ती स्वप्नं बघू लागली. दरम्यान तिचं असिफ अली झरदारी याच्याशी लग्नही झालं. १९८८ मध्ये पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यात पाकिस्तान पीपल्स पार्टीला विजय मिळाला. २ डिसेंबर १९८७ या दिवशी बेनझीर भुत्तो पाकिस्तानची पहिली महिला पंतप्रधान बनली.

इंग्लंडमध्ये शिक्षण झाल्यामुळे बेनझीर आंग्लाळलेली होती. उर्दूपेक्षा तिचं इंग्लिशवर जास्त प्रभुत्व होतं. तिचं एकंदरीत इंग्रजाळलेलं व्यक्तिमत्व कट्टरपंथी इस्लामी लोकांच्या नजरेत खुपत होतं. त्यामुळे ती आणू पाहत असलेल्या सुधारणांनाही कट्टरपंथीयांनी कायम विरोध केला.

दुसऱ्या बाजूला तिची पंतप्रधानपदाची कारकीर्दही वादग्रस्त ठरली. सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. आसिफ अली झरदारी यांना कोणत्याही कामाबद्दल दहा टक्के कमिशन देण्याचा प्रघात पडून गेला होता. शिवाय त्यावेळच्या मंत्रिमंडळात आणि महत्त्वाच्या पदांवर बेनझीरने स्वतःच्या कुटुंबीयांची आणि नातेवाईकांची वर्णी लावली होती. बेनझीर सत्तेत आली तेव्हा आधीच्या सरकारने देशाचं मोठ्या प्रमाणावर इस्लामीकरण केलं होतं. बेनझीरने याला विरोध केला. हे अर्थातच अनेक जणांना रुचलं नाही. कडव्या मूलतत्त्ववाद्यांना तर नाहीच नाही. वास्तविक देशात जास्तीत जास्त सुधारणा आणण्याचा बेनझीरचा उद्देश होता. पण त्याला यश मिळणार नाही अशी चिन्हं दिसत होती.

बेनझीरला तिच्या पक्षात आणि मंत्रिमंडळात अनेक विरोधक होते. एक तर ती एक स्त्री होती. त्यामुळे तिच्या हाताखाली काम करणं हेच बऱ्याच लोकांना मानवणारं नव्हतं. त्यात पाकिस्तानला सुधारणांच्या मार्गावर नेण्याचे तिचे जे मनसुबे होते, त्यामुळेही तिला अनेक विरोधक निर्माण झाले. त्यामुळे तिला लवकरच पंतप्रधानपद गमवावं लागलं. १९९० मध्ये बेनझीर विरोधी पक्षनेता बनली. पुढे काही वर्षं बेनझीर भुत्तो आणि नवाज शरीफ यांच्यात खुर्चीसाठीचा खेळ सुरू राहिला. या अनागोंदीचा फायदा उठवत जनरल परवेज मुशर्रफ यांनी १९९९ मध्ये पाकिस्तानची सूत्रं आपल्या ताब्यात घेतली. लष्करी उठाव होऊन बेनझीर आणि नवाज शरीफ दोघांनाही बाजूला सारण्यात आलं आणि मुशर्रफ सर्वेसर्वा बनले. सत्तेत आलेल्या मुशर्रफ यांनी बेनझीरला आपलं लक्ष्य बनवलं. त्यामुळे बेनझीर देश सोडून गेली. पुढची जवळपास सात-आठ वर्षं कधी दुबई, तर कधी इंग्लंड अशा तिच्या वाऱ्या सुरू होत्या. पाकिस्तानात परतलो तर आपलं भवितव्य काय आहे याची तिला स्पष्ट कल्पना होती. त्यामुळे तिने मायदेशात यायचंच टाळलं. पण २००७ मध्ये मुशर्रफ यांच्या सांगण्यावरून बेनझीर पाकिस्तानात परतली. अर्थात त्याआधी त्यांनी तिला एक इशारा देऊन ठेवला होता: पाकिस्तानात परत आल्यावर तिच्या जिवाला धोका असणार होता.
बेनझीर परत आली तेव्हा पाकिस्तानात तिचं मोठ्या उत्साहात स्वागत झालं. पण तिचा येण्याचा मुहूर्त चुकला होता. त्यावेळी पाकिस्तानात दहशतवादाने टोक गाठलं होतं. तिच्या जिवाला असलेला धोका वाढला होता.

बेनझीर कराची विमानतळावरून बाहेर येत असतानाच तिला दहशतवादी हल्ल्याचा सामना करावा लागला. यावेळी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये जवळपास दीडशे माणसं मरण पावली. बेनझीर जीवावरच्या संकटातून थोडक्यात वाचली. पाकिस्तानमध्ये जानेवारी महिन्यात निवडणुका होणार होत्या. या निवडणुकांआधी तिच्यावर हल्ला होण्याची दाट शक्यता होती. निवडणुकीसाठी तिने सादर केलेल्या अजेंडामध्ये अनेक चांगल्या गोष्टी होत्या. पण हे स्वप्न प्रत्यक्षात येण्याआधीच डिसेंबर २००७ मध्ये तिचा मृत्यू झाला. तारीख होती २७ डिसेंबर २००७. त्यादिवशी तिने रावळपिंडीमध्ये झालेल्या एका रॅलीत भाग घेतला होता. वास्तविक बेनझीरला बुलेट-प्रुफ लँड क्रुझर गाडी मिळाली होती. परंतु गाडीचं सनरूफ उघडून त्यातून ती जमावाला अभिवादन करण्यासाठी, हात हलवण्यासाठी उभी राहिली होती. त्यामुळे गाडी बुलेट-प्रुफ असली तरी बेनझीरचा कमरेपासून वरचा भाग गाडीच्या बाहेरच होता. ही संधी साधून जमावातल्या एका १५ वर्षाच्या मुलाने गोळीबार केला आणि नंतर स्फोटाच्या मदतीने स्वतःला उडवून दिलं. आत्मघातकी हल्ला घडवून आपलं लक्ष्य त्याने बरोबर टिपलं. या हल्ल्यात बेनझीर गंभीररीत्या जखमी झाली आणि इस्पितळात पोहोचण्यापूर्वीच तिने प्राण सोडले.

या सगळ्यामध्ये एका गोष्टीचं रहस्य कायम आहे. ते म्हणजे या हल्ल्यादरम्यान बेनझीरच्या सुरक्षारक्षकांची संशयास्पद भूमिका. कोणताही हल्ला झाल्यावर आपली स्वतःची सुरक्षितता बाजूला ठेवून आपल्या नेत्याचं संरक्षण करायची, त्याला प्राधान्य द्यायची जबाबदारी या सुरक्षा रक्षकांवर असते. परंतु हल्ल्यानंतर जे फुटेज मिळालं त्यामध्ये स्पष्ट दिसून येत होतं की हे गार्ड्स स्वतःलाच वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांचंही तसंच. थोडक्यात एवढा मोठा स्फोट होऊनही आणि त्यात एक महत्त्वाचा नेता गंभीर जखमी होऊनही फार काही गोंधळ माजला नव्हता. जणू काही हे अपेक्षितच होतं.

बेनझीरला नक्की कोणी मारलं हे गूढ अजूनही कायम आहे. अनेकांच्या म्हणण्यानुसार तिच्या राजकीय विरोधकांनी तिला संपवलं. काहींच्या मते तिला स्फोटामुळे थेट इजा झाली नव्हती, तर त्यामुळे या कुठलीशी लोखंडी वस्तू फेकली जाऊन तिच्या डोक्याला आदळली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. या आणि अशा काही थिअरीज मांडण्यामागे एक राजकीय कारण आहे. ते म्हणजे जर गोळी लागून किंवा स्फोटाचा परिणाम म्हणून बेनझीर गेली असती तर ती शहीद ठरली असती आणि निवडणुकीमध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टी विजयी झाली असती. हेच अनेकांना नको होतं.

अजून एक खटकण्यासारखी गोष्ट म्हणजे बेनझीरचं पोस्टमॉर्टेम न होणं. त्यामुळे मृत्यूचं खरं कारण समोर आलं नाही. विशेष म्हणजे बेनझीरचा पती असिफ अली झरदारी यानेही पोस्टमॉर्टेमला विरोध केला. त्यामुळे संशयाची सुई झरदारीकडेही रोखली जाते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेल्या युनायटेड नेशन्सच्या तपास अधिकाऱ्यांनाही तपासाची परवानगी मिळाली नाही. उघड आहे - बेनझीरचं जाणं आणि तिच्या मृत्युमागचं खरं कारण आणि खरा गुन्हेगार जगासमोर न येणं हेच अनेकांसाठी फायद्याचं होतं!

या सगळ्यात इतकी रहस्यमयता आहे की अल कायदाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारूनही बेनझीरच्या मृत्यूमागचं गूढ कायम आहे.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required