ट्र्म्पविजय-बोभाटा स्पेशल लेख : बहिर्या आधुनिक फुरोगाम्यांच्या कानाखाली काढलेला आवाज
शेवटी जे अपेक्षित होतं तेच झालं. डॉनल्ड ट्रम्प जिंकला! मिडीया, टिव्हीवरचे चर्चेकरी, स्त्रीवादी, पर्यावरणवादी, समानतावादी, रंगभेदविरोधी, लिंगभेदविरोधी अशा सगळ्यांच्या नाकावर टिच्चून जिंकून आला. आपापल्या मनोर्यांमध्ये बसून टीका करणाऱ्या स्वयंघोषित तथाकथित पुरोगाम्यांना पुन्हा एकवार नाकावर आपटावे लागले!
हे सगळे तथाकथित पुरोगामी इतिहासातून आणि वर्तमानातूनही काहीही शिकत नाहीत हे पुन्हा एकवार सिद्ध झालं. या अशा भाकड पुरोगाम्यांत आणि काही खऱ्या प्रामाणिक पुरोगाम्यांत गोंधळ होऊ नये म्हणून या बोरू/टीव्ही/कीबोर्ड बहाद्दर स्वयंघोषित पुरोगाम्यांना आपण या लेखात 'फुरोगामी' असे संबोधणार आहोत. ज्यांना आपले मत आणि एखाद्या गरीब अशिक्षित शेतकर्याचे मत सारख्याच किंमतीचे आहे हे पटते, त्यांनी हे उगाच स्वतःला लावून घेऊ नये.
बरं हे एवढ्यात पहिल्यांदा होतंय असंही नव्हे. भारत, युके, कॅनडा ही अशीच नजिकची उदाहरणे. भारतात तर पाठोपाठ दोनदा हे सिद्ध झालं होतं की लोक तथाकथित "सिस्टिम"ला वैतागले आहेत. केजरीवालसारखा 'सिस्टिम' बाहेरचा माणूस सगळ्या राजकारण्यांना धूळ चारत अलगद मुख्यमंत्री झाला. पठडीतल्या राजकारण्यांपेक्षा वेगळा नेता असे स्वतःला यशस्वीपणे प्रोजेक्ट केल्यानंतर मोदींना किंवा नितीशना विजय कठीण गेला नाही. याचीच पुनरावृत्ती अमेरिकेत झालेली स्पष्ट दिसते.
राज्यकर्ते 'आपले' नाहीत. आपल्या आशा-आकांक्षा-प्रश्न यांना सामोरे जायला ते पुरेसे नाही असं जेव्हा बहुसंख्य लोकांना वाटतं तेव्हा सत्तांतर घडतं. पण प्रस्थापित व्यवस्था म्हणजेच 'सिस्टिम' ही 'आपली' नाही. आपल्या आशा-आकांक्षा-प्रश्न यांना सामोरे जायला ती पुरेशी नाही असं जेव्हा लोकानां वाटतं, मात्र ती सिस्टीम सहज बदण्यासाठी आवश्यक तितकं बळही नाही हे समजल्यावर जी हताशता येते त्यातून "मी हे बदलून दाखवतो" म्हणणार्या फरिश्त्याला लोक संधी देतात! अमेरिकेतही तेच झालंय.
या सगळ्याला सर्वात मोठे कारण आहे तेथील आपल्यासारखाच व्यवसायाभिमुख झालेला मिडीया. पत्रकारीतेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते कारण तो लोकांचा आवाज असतो. त्याच बरोबर तो लोकांसाठी आणि प्रशासकांसाठी आरसा असतो आणि त्याहून मुख्य म्हणजे तो तटस्थपणे शक्य तितक्या संपूर्ण सत्याला समोर आणतो. पण हल्लीचा मिडीया (मग तो अमेरिकेतील असो वा भारतातील) तसा राहिला आहे काय? अमेरिकेत तर सरळसरळ अख्खा मिडीया (आणि बराच सोशल मिडीयासुद्धा) एकट्या ट्रम्पच्या विरोधात लढत असल्यासारखे वागत होते. सुरुवातीला त्यांची कारणंही पटण्याजोगी होती. मात्र पुढे पुढे त्याचं कारणही ट्रम्पच्या धोरणांना विरोध नव्हता बरं, तर त्याच्या विरोधातील बातम्या अधिक 'चमचमीत' झाल्या होत्या! शिवाय मिडीयाच्या मागे वाहावणार्या कित्येक प्रसिद्धीलोलूप नि स्वतःला उदारमतवादी आणि व्यक्तीस्वातंत्र्यवादी म्हणवणाऱ्या फुरोगाम्यांना आपण ट्रम्पच्या व्यक्तिगत आयुष्यात मर्यादेहून अधिक डोकावून त्याच्या पॉलिसिजपेक्षा त्याच्यावर वैयक्तिक हल्ला करून स्वतःतील विसंगती जगजाहीर करत आहोत याचेही भान राहिले नाही. अशा ढळढळीत विरोधाभासाला एन्कॅश न करण्याइतका ट्रम्प दुधखुळा नाही! (२००४मध्ये 'सोनिया गांधीं'वर केलेला वैयक्तिक हल्ला 'इंडिया शायनिंग'ला कसा बाधला होता याचे स्मरण येणे अगदीच अनुचित ठरू नये)
"बघा बघा हे सगळे प्रस्थापित - सिस्टिममधले- कसे माझ्या वैटावर टपलेत आणि कट रचताहेत बघा. मी सिस्टीम बाहेरचा या वैट्ट लोकांना दूर करेन याची भीती वाटल्याने कसे एकवटलेत, नि वाट्टेल त्या थराला जाऊन प्रचार करताहेत. पण मी त्यांना पुरून उरेन" या ट्रम्पच्या बाजूला विरोधकांनीच बळ पुरवलं. त्यातही काही रिपब्लिकन ट्रम्पच्या विरोधात गेल्यावर तर ट्रम्प विरुद्ध सगळी वैट्ट वैट्ट सडकी व्यवस्था असे चित्र उभे राहिले. मग, सामान्याला एरवी तुच्छ लेखणारे सगळे फुरोगामी, फेमिनिष्ठ वगैरे आणि सोबत मिडीया आणि राजकीय नेते सगळे हे असं इतक्या पर्सनल थराला जाऊन मुद्दाम कॅम्पेन चालवताहेत म्हणजे ट्रम्पमुळे यांना नक्कीच धोका असणार. तेव्हा या शिष्ठ लोकांना आणि राजकारणी-मीडिया युतीलाही हाच काय तो वठणीवर आणू शकतो, सिस्टिम बदलू शकतो या त्याच्या दाव्यावर लोकांचा विश्वास बसला.
दुसरी मोठी गोष्ट म्हणजे ग्रामीण मतदार व कामगारवर्गाकडे सिस्टिमने केलेले दुर्लक्ष. भारतात अनेक पक्ष असल्याने या वंचित वर्गाकडे वेगवेगळे पर्याय तरी असतात मात्र अमेरिकेत दोनच मुख्य पक्ष असल्याने आणि दोन्ही पक्षांकडून या लोकांच्या पदरी निराशा पडल्याने असा व्यवस्थेबाहेरून आलेला मसीहा त्यांना पुन्हा "अच्छे दिन" आणेल असा त्यांना विश्वास वाटला तर नवल नाही! दोन्ही पक्षच नव्हेत तर अमेरिकन मिडीयाही शहरांतच केंद्रित आहे. ग्रामीण मतदार, कामगार (ज्यांना रेड नेक म्हटले जाते) त्यांच्या प्रश्नांचा, अस्मितांना या सगळ्यात फारसे स्थान नाही. जे ट्रम्पनी दिले. (आठवा: मेक्सिकन कामगारांना हाकला)
तिसरी गोष्ट म्हणजे ट्रम्प हा एक पुरूष आहे. नुसता पुरूष नाही तर एक गौरवर्णीय पुरूष आहे. कोणी कितीही नाकारू दे. अमेरिका (किंवा खरंतर बहुतांश देश) जितकी रंगभेदी आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक लिंगभेदी आहे. अमेरिकेतही महिलांना जगातील अनेक देशांप्रमाणे कितीतरी अधिक संघर्ष करावा लागत आहे. त्यात अचानक एका वर्षी गोर्या पुरुषापुढे देशातील परंपरावादी मतदार एका बाईला आपली राष्ट्राध्यक्ष स्वीकारतील हे जरा दिवास्वप्नच होते.. आणि ते भंग पावले. हे एकमेव कारण आहे असा माझा दावा नाही मात्र हे मुख्य कारणांपैकी एक आहे हे नक्की.
हीच असे नाही, गेल्या दोन-तीन वर्षातील अनेक घटना फुरोगामींना एकच शिकवण देत आहेत की "आपल्या आयव्हरी टॉवरमधून खाली उतरा". तुम्ही हुशार असालही. पण आम्हाला त्याचा उपयोग काय? काहितरी गोल गोल अप्राप्य नि गोग्गोड आदर्श बोलण्यापेक्षा जमिनीवर या. आमच्यात मिसळून आम्हाला समजावा, समोरच्याला मान देऊन त्याच्या पातळीवर येऊन बोला. (नुसतं किमान हे पुस्तक वाचा तोवर तुमच्याशी काय बोलायचं? असा पवित्रा टाळा) नाहीतर आम्हाला आम्हाला झेपतील असे वेगळेे पर्याय शोधावे लागतील.
पण जर कोणी शिकवल्यावर आत्मपरिक्षण करून बाहेरची कारणे शोधण्यापेक्षा स्वतःच्या बोलण्यात - बोलण्यातील माजात आणि दुसर्याला कमी लेखत कृती/वाचा ठेवण्यात बदल करायला तयार असतील तर ते आधुनिक फुरोगामी कुठले!