गांधीजींनी सुरू केले होते ३ फुटबॉल क्लब!! पण कशासाठी?
आपले राष्ट्रपिता महात्मा गांधींना कोण नाही ओळखत मंडळी? हातात शस्त्र न उचलता, एकही युध्द न करता त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांच्या आयुष्याबद्दल सगळ्यांनी वाचलं-ऐकलं आहेच. पण फुटबॉल आणि महात्मा गांधी हे समीकरण मात्र कोणालाच परिचित नसेल. जरा वेगळं वाटतंय ना? हो, फार कमी जणांना माहित आहे की महात्मा गांधी हे फुटबॉल या खेळाशीही जोडलेले होते. पण कसे? चला पाहूया...
फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळं साहजिक फुटबॉलच्या प्रत्येक सामन्याला प्रेक्षकांची तुडूंब गर्दी जमते. जेव्हा गांधीजी दक्षिण आफ्रिकेत वंशभेदाविरूध्द लढत होते त्या काळात तिथेही काहीशी हीच स्थिती होती. तिथल्या लोकांवरही फुटबॉलचा मोठा प्रभाव होता. सामने पाहण्यासाठी लोकांची भरपूर गर्दी असायची. गांधीजींच्या लक्षात आलं की आपलं अहिंसा आणि समानतेचं आंदोलन लोकांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी फुटबॉलचा चांगला उपयोग होऊ शकतो.
त्यांनी पॅसिव्ह रेसिस्टर्स सॉकर क्लब (Passive Resisters Soccer Club) या नावाने डर्बन, प्रिटोरीया आणि जोहान्सबर्ग या तीन ठीकाणी तीन फुटबॉल क्लब सुरू केले. या क्लब्जनी कधी मोठ्या फुटबॉल लीग्जमध्ये भाग घेतला नाही. पण ते स्थानिक आणि मैत्रीपूर्ण सामने खेळायचे.
गांधीजी सामन्यांच्या मधल्या वेळेत प्रेक्षक आणि खेळांडूशी बोलून त्यांच्यात वर्णद्वेषाविरूध्दच्या अहिंसात्मक आंदोलनासाठी जागृती करत. अनेकवेळा ते सामन्यादरम्यान लोकांना पॅम्पेल्ट्सही वाटायचे. अशा सामन्यांमध्ये मिळालेले पैसे ते वर्णद्वेषाविरूध्द लढताना कैदेत गेलेल्यांच्या कुटूंबांना द्यायचे. बापूजींना प्रत्यक्ष मैदानात खेळताना कोणीही पाहिलेलं नाही.
१९१४ साली गांधीजी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी भारतात परत आले आणि त्यांनी सुरू केलेले फुटबॉल क्लबही बंद झाले. पण त्यांनंतर त्यांच्या विचारांशी एकरूप झालेल्या लोकांनी पुढे त्याच उद्देशाने तिथे बरेच फुटबॉल क्लब्ज सुरू केले होते.