विषारी छत्री आणि सरकारविरोधी बल्गेरियन लेखकाचा खून!! आज ४० वर्षांनंतर या खुनाचे रहस्य उलगडले नाहीय.!
खरं म्हणजे रस्त्याने चालताना घाईगडबडीत एखाद्या माणसाचा किंवा त्याच्या हातातल्या वस्तूचा धक्का आपल्याला लागणे यात काही नवीन नाही. पण असा धक्का देण्यामागे विषप्रयोग करून समोरच्याचा थेट खूनच करण्याचा उद्देश असेल तर... दचकलात ना? नाही, हा लेख राझी सिनेमातील सेहमतबद्दल (आलिया भट्ट) नाही. चित्रपटातच नाही तर प्रत्यक्ष जगातही असे प्रयत्न झाले आहेत.
अशा प्रयत्नांच्या रहस्यमय गोष्टींवरचा पडदा कधीच बाजूला होत नाही. त्यातून रहस्य उलगडू पाहणाऱ्याच्या जीवालाच धोका निर्माण होत असेल तर मग तर ही रहस्ये रहस्येच राहतात.
आता जी कहाणी सांगणार आहोत ती आहे एका बल्गेरीयन नागरिकाची पण जी घडली लंडनमध्ये !
बल्गेरीया म्हणजे एकेकाळी सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली असलेला देश ! युरोपातील पूर्वेकडच्या देशांना इस्टर्न ब्लॉक कंट्रीज म्हटले जाते. हे देश तसे गरीब असल्याने त्यांना रशियासोबत जुळवून घेणे भागच होते.साहजिकच या देशातल्या निवडणुकांवर रशियाचा प्रभाव असे आणि येणारी सरकारेही रशियाच्या ताटाखालची मांजरे असत. असे असले तरी त्या देशांना स्वतःची ओळख होती, स्वतःची भाषा -संस्कृती होती. त्यामुळे काहींना ही मुस्कटदाबी सहन होत नसे. त्यातूनच काही लेखक - कवी रशियाच्या विरोधात जनजागृती करण्याचा प्रयत्न करत. अशा लोकांना संपवण्यासाठीत्यांच्या हत्या विषप्रयोगाने केल्या जात.
विषप्रयोग ही रशियन गुप्तहेरांची खासियत आहे असेही काही लोकांचे मत आहे.या बाबतीतले रशियन गुप्तहेरांचे कौशल्य(!) लक्षात घेऊन इतर देशही त्यांची मदत घेत.तर आज आपण अशाच एका विषप्रयोगाची कथा वाचणार आहोत.
तो दिवस होता ०७ सप्टेंबर १९७८. जॉर्जी मार्कोव्ह लंडनच्या वॉटर्लू ब्रीजवरुन चालला होता. रोजच्यासारखीच साधारण वर्दळ होती. इतक्यात जॉर्जीला मांडीच्या मागच्या बाजूने काहीतरी टोचल्यासारखे वाटले. एखाद्या मुंगीने किंवा किड्याने कडकडून चावा घेतल्यासारखे. क्षणभरात त्या वेदनेची सणक पार मेंदूपर्यंत पोहोचली.त्याने मागे वळून पाहिले. त्याच्या मागे एक माणूस होता. त्याने जॉर्जीची माफी मागितली. जॉर्जीला त्याचा चेहरा नीट दिसला नाही. फक्त हे दिसले, की त्या माणसाने आपली छत्री खाली टाकली आणि तो घाईघाईने तिथून निघून गेला. पुढे जाऊन तो एका कॅबमध्ये बसून नाहीसा झाला.
अक्षरशः काही सेकंदांचा खेळ, पण तो आपल्या जिवावर बेतणार आहे याची जॉर्जीला पुसटशीही कल्पना नव्हती. घरी आल्यावर त्याने पाहिले तर त्या जागी लाल रंगाचे पुरळ आले होते. असह्य वेदना होत होत्या. नंतर ताप आला. हे वरवर दिसते तितके साधे नाही हे त्याच्या लक्षात आले म्हणून तो रुग्णालयात दाखल झाला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. चारच दिवसांनी जॉर्जीचा मृत्यू झाला. ते चार दिवसही तो तडफडत होता. यातना इतक्या असह्य होत होत्या की यापेक्षा मरण येईल तर बरे असे त्याला वाटत होते.
आणि शेवटी तेच झाले. जॉर्जीचा तडफडून मृत्यू झाला.
जॉर्जीचा असा तडफडून मृत्यू जितका धक्कादायक होता, तितकेच त्याच्या मृत्यूचे कारणही. त्याच्या मृत्यूला कारणीभूत होती ती एक छत्री. तीच ती ब्रिजवर त्या माणसाने टाकून दिलेली छत्री. 'त्या' व्यक्तीने त्या छत्रीच्या टोकाने त्याच्या मांडीला धक्का दिला होता. पण असे काय विशेष होते त्या छत्रीमध्ये?
तर ते होते छत्रीच्या टोकाला लावलेले रायसीन नावाचे विष.या विषाच्याच प्रभावामुळे जॉर्जीची ही अवस्था झाली होती.
या प्रकरणात ना कोणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ना कोणाला अटक झाली. काहींनी नक्की काय घडले याचा आपल्या परीने तपास करण्याचा प्रयत्न केला. बाकी काही वर्तमानपत्रांनी आवाज उठवला. पण पुढे विशेष काहीच झाले नाही.
पण हा मार्कोव्ह नेमका होता तरी कोण?
जॉर्जी मार्कोव्ह हा फक्त लेखकच नाही, तर बल्गेरिया बीबीसी सर्व्हिसचा प्रसारक होता. शिवाय प्रमुख बंडखोर नेत्यांमध्ये त्याचा समावेश होता. बल्गेरियन कम्युनिस्ट राजवटीने त्याला हद्दपार केले होते. त्यानंतर तो लंडनला गेला आणि तिथून बल्गेरियाच्या राजवटीविरोधात लिखाण करू लागला. रेडिओ फ्री युरोप मध्ये तो काम करू लागला. त्या माध्यमातून त्याने बल्गेरियाच्या राजवटीवर केलेले भाष्य गाजू लागले. रेडिओ फ्री युरोप मुळात अमेरिकेच्या आधाराने चालणारे. मग कम्युनिस्टांवर टीका करणे ओघाने आलेच. यामुळेही बल्गेरियाच्या कम्युनिस्ट राजवटीचा तो कट्टर शत्रू बनला.
मार्कोव्ह गेला आणि त्याच्या खुनाची चौकशीही झाली, पण त्याबाबत काही ठोस पुरावे मिळाले नाहीत. मिळाले असतील तरी लोकांसमोर आले नाहीत. पण त्याच्या खुनामध्ये बल्गेरियन सुरक्षा यंत्रणांचा हात आहे, असे सगळेचजण मानतात. बऱ्याच वर्षांपूर्वी रशियन गुप्तहेर संघटना असलेल्या केजीबीच्या एका अधिकाऱ्याने ही हत्या असल्याची आणि त्यात बल्गेरियन सुरक्षा यंत्रणा आणि केजीबी यांचा हात असल्याची पुष्टी केली होती. पण त्यावेळी मात्र या प्रकरणाच्या बाबतीत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. बल्गेरियाने तपास करण्याचे नाटक तर केले पण तो फारसा पुढे गेला नाही. त्यामागचा खरा सूत्रधार कोण होता, हे उजेडात न आल्याचेही कोणाला विशेष वाटले नाही. लोकांचा येथील तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर विश्वासच नव्हता. त्यामुळे जणू हे असेच घडणार असे सर्वजण गृहीत धरूनच चालले होते.
पण असे असले तरी मार्कोव्हबद्दल बल्गेरियामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्याची पुस्तके बल्गेरियात मोठ्या प्रमाणावर वाचली जातात. त्याच्यावर एक डॉक्युमेंट्रीही बनवण्यात आली. त्यामुळे त्याच्या खुनाच्या तपास प्रकरणात सरकार फारशी प्रगती करू शकले नाही, पण तेथील समाजात मात्र त्याचे अनेक चाहते तयार झाले.
जॉर्जीचा खून झाला तो कालखंड हा कम्युनिस्ट राजवटीचा होता.पण आता कम्युनिस्ट राजवट गेल्यानंतरही याबद्दलची माहिती गुप्तच आहे. याचे कारण त्या काळातील फाईल्स नष्ट करण्यात आल्या. पुरावे सफाईने मिटवले गेले. ९० च्या दशकाच्या सुरुवातीला ८० टक्क्याहून अधिक गुप्त पोलिसांच्या फाइल्स नष्ट केल्या गेल्या. परिणामी आजही जुन्या राजवटीची आणि इथे नेमके काय घडले याबद्दलची अनेक रहस्ये गुप्त राहिली आहेत.
या सगळ्याचा शोध घ्यायचा असेल तर भूतकाळातील अंधारात जाऊन चाचपडल्याशिवाय गत्यंतर नसले तरी ते कोण करणार हा प्रश्नच आहे. याबाबतीत एकंदर रशियन गुप्तहेर संघटनांची 'कीर्ती' पाहता हा जिवावरचा धोका स्वीकारणे सोपे नाही हे मात्र खरे !