पाकिस्तानात भारतीय हेर का मारले गेले? मोरारजी देसाईंनी खरंच RAWला धोका दिला होता का??
CIA, KGB, MI6, RAW, सिक्रेट एजंट म्हटलं की गोष्ट ऐकण्याआधीच त्यात इंटरेस्ट येतो की नाही? आणि मग ती स्टोरी खरी असेल तर आणखीच. त्यात ती स्टोरी भारताच्या ’रॉ’ची असेल तर मग अगदी सोने पे सुहागा!!
तर मंडळी, ऑपरेशन कहुता हे रॉच्या काही वादग्रस्त कामगिर्यांपैकी एक. कहुता हे पाकिस्तानातल्या रावळपिंडीजवळचं गांव. तिथं पाकिस्ताननं प्रोजेक्ट ७०६ या नावाखाली १९७४मध्ये आपला खान रिसर्च लॅबोरेटरीज (KRL) हा ऍटॉमिक बॉंबचा प्रोजेक्ट चालू केला. तिथं ते लांब पल्ल्याची मिसाईल्सपण बनवणार होते. भारतानं १९७१मध्येच पोखरणमध्ये अणूस्फोट केले होते. पण पाकिस्तानकडे आण्विक शस्त्रं असणंही धोक्याचं होतं.
मग काय, रॉ कामाला लागली. नक्की कुठं हा प्रकल्प चालू आहे ही माहिती त्यांना मिळत नव्हती. म्हणून त्यांनी काय केलं माहित आहे? जिथं पाकिस्तानी शास्त्रज्ञ आपले केस कापायला येतात,त्या सलूनमधून चक्क त्या शास्त्रज्ञांचे कापलेले केसच चोरले. इथं मग आपल्या BARC मध्ये या केसांचं परिक्षण केलं, आणि त्या केसांवर ऍटॉमिक किरणं पडली आहेत हे सिद्ध झालं. अशा तर्हेनं कहुतामधल्या अणूभट्टीचा शोध तर लागला आणि पाकिस्ताननं युरेनिअममध्ये शस्त्रं बनवण्याचा दर्जा आणण्याइतपत काम केलंय हे ही लक्षात आलं. जसं हे भारताला नको होतं, तसंच ते अमेरिकेलाही नको होतं.
ही पूर्ण कामगिरीच खूप धोकादायक होती. रॉने पाकिस्तानात आपला एक खबरी तयार केला. त्याला मोठी रक्कम देण्याच्या बदल्यात त्या खबरीनं कहुताच्या प्रोजेक्टचे ब्ल्यूप्रिंट्स आणून देणं कबूल केलं. रक्कम मोठी असल्यानं त्यासाठी पंतप्रधानांची मंजूरी हवी होती. पंतप्रधान होते मोरारजी देसाई. त्यांनी आधीच रॉचं बजेट ३०%नी कमी केलं होतं आणि रॉचे संस्थापक आर. एन. काव यांना रजेवर पाठवलं होतं. त्यांनी या रकमेला मंजूरी दिली नाही.
एवढं करून मोरारजींनी गप्प बसावं ना!! “माझ्या पाकिस्तानातल्या हेरांनी तुमच्या कहुतामध्ये काय चाललंय हे सगळं मला सांगितलंय” अशा अर्थाचं वाक्य त्यांनी त्यांच्या मुहम्मद झिया-उल-हक या फोनमित्राला सांगितलं. आता हे झिया-उल-हक कोण ते तुम्हांला सांगायची गरज नाही. हो ना? आता ही एवढी अंदरकी बात भारताला कळाल्याचं समजल्यावर या पाकिस्तानच्या जनरलनं सूत्रं हलवली. त्यानं रॉचे सगळे हेर शोधून शोधून मारले.. आणि पाकिस्तान त्यांच्या अणूशस्त्रांच्या कार्यक्रमात कुठंवर पुढे गेलाय हे आपल्याला आजतागायत कळलं नाहीय.
मोरारजी नक्की काय म्हणाले आणि का म्हणाले यावर लोकांनी बरेच तर्क केलेयत. कुणी म्हणतं झिया-उल-हक त्यांना सतत फोन करत असे आणि लहानसहान गोष्टींत सल्ले घेण्याचं नाटक करत असेल, तेव्हा मोरारजी कदाचित बोलून गेले. कुणी असंही म्हणतं की मोरारजींवर गांधींचा प्रभाव होता आणि अहिंसा-सत्य यांचं आचरण करत असताना त्यांना झिया-उल-हकला अंधारात ठेवता आलं नाही, इत्यादी..इत्यादी..
काही का असेना, एका पंतप्रधानाच्या चुकीमुळं हाती आलेली कामगिरी तर गेलीच, वर आपले बरेच गुप्तहेर जे देशासाठी शत्रूदेशांत राहून महत्वाच्या खबरा आणत होते, तेही आपल्या जीवाला मुकले..