computer

१९४२मध्ये नवानगरच्या राजांनी पोलिश निर्वासितांना आसरा दिला, आज पोलंड त्याच उपकारांची परतफेड करत आहे!!

'वसुधैव कुटुम्बकम, अतिथी देवो भव' ही भारतीय संस्कृतीतली काही तत्वं. या तत्त्वांचं पालन आपल्याकडे इतिहासातही केलेलं आढळतं. आज आपण जी गोष्ट बघणार आहोत ती आहे दिग्विजयसिंह रणजीतसिंहजी जडेजा या राजाची. दिग्विजयसिंह गुजरातमधील नवानगर ( आताचं जामनगर) संस्थानाचे राजे होते. आज पोलंडमधल्या अनेक रस्ते, शाळा यांना त्यांचं नाव देण्यात आलं आहे. पण पोलंडसारख्या दूर देशात त्यांना का मानलं जातं? त्यांनी नेमकं असं काय केलं? याचा परामर्श घेण्यासाठी हा लेखनप्रपंच!!

महाराजा दिग्विजय सिंह यांना जामनगरची गादी १९३४ मध्ये त्यांचे काका प्रख्यात क्रिकेटपटू रणजीतसिंहजी यांच्या निधनानंतर मिळाली. त्यापूर्वी त्यांनी ब्रिटिश लष्करात अनेक पदं सांभाळली. राजगादीवर बसल्यावर त्यांनी आपल्या काकांची विकासाची, जनकल्याणाची ध्येयधोरणं पुढे तशीच सुरू ठेवली. ते राजे झाल्यावर काही वर्षांतच दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. ह्या वेळी देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं. दुसऱ्या महायुद्धादरम्यान रशियाच्या लाल सेनेने अनेक पोलिश लोकांना रशियाच्या ईशान्येकडील तसेच सायबेरिया मधल्या सोव्हिएट लेबर कॅम्पमध्ये काम करण्यासाठी पकडून नेलं होतं. १९४१ मध्ये जर्मनीने सोवियत युनियनवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे राजकीय चित्र मोठ्या प्रमाणावर बदललं. त्यानंतर सुमारे वर्षभराने पोलिश लोकांना सोवियत युनियन सोडून जाण्यास परवानगी मिळाली. परिणामी सायबेरियाच्या थंड प्रदेशातील लोकांचे जथ्थेच्या जथ्थे मध्य आशियाच्या उबदार प्रदेशांकडे येऊ लागले, तेही काही कैक किलोमीटर अंतर पार करून. या प्रवासादरम्यान काही पोलिश लोकांनी थंडी, भूकबळी, कुपोषण यामुळे त्यांचे आप्त गमावले. अनेक युरोपिय आणि आशियाई देशांनी प्रवेशबंदी केलेले हे लोक निरनिराळ्या निर्वासित छावण्यांमध्ये राहू लागले. शेवटी ते भारतात आले. मुंबई बंदरावरही त्यांना त्यावेळच्या मुंबईच्या ब्रिटिश गव्हर्नरने येण्यास मज्जाव केला. हे सगळं नवानगरचे राजे महाराजा दिग्विजयसिंहजी जडेजा यांच्या कानावर येत होतं. त्यांनी या निर्वासितांना मदत करण्यासाठी आणि त्यांना येऊ देण्यासाठी ब्रिटिश सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ब्रिटिशांच्या या कोरडेपणाला वैतागून महाराजांनी त्यांच्या राज्यातल्या एका जहाजाची त्यांच्यासाठी व्यवस्था केली.

१९४१ मध्ये हे सगळे लोक महाराजांनी पाठवलेल्या जहाजातून राजांच्या संस्थानात उतरले. त्यावेळी दिग्विजय सिंहांनी त्यांच्या निवाऱ्याची सोय केली. जामनगर मध्येच 'बलचडी' या ठिकाणी त्यांच्यासाठी तात्पुरत्या छावण्या उभारल्या. या छावण्यांमध्ये त्यांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. त्यात जेवणखाण, शिक्षण या सुविधाही होत्या. या निवारा छावण्यांमध्ये अनेक लहान मुलं होती. त्यातील काही मुलं दुर्दैवाने अनाथ झाली होती. महाराजांनी त्यांना शिक्षण घ्यायला आणि त्यांची पोलिश संस्कृती जपायला प्रोत्साहन दिलं. बलचडीच्या छावणीत एक छोटा पोलंड आकार घेऊ लागला.

राजे छावणीतल्या लहान मुलांना सांगत, की त्यांचे आई वडील जरी हयात नसले तरी त्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण महाराजांनी स्वतः त्यांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. ही सगळी मुलं महाराजांना 'आमचे बापू' या नावाने संबोधत असत. या छावण्यांमध्ये राहणाऱ्या एका मुलाने तिथल्या वातावरणाचं वर्णन केलं आहे. तो सांगतो, "माझ्यासह इतर अनेकांना या छावण्यांमध्ये अतिशय सुरक्षित आणि आनंदी वाटायचं. घरापासून कोसो मैल दूर असणाऱ्यांना घर देण्याचा तो प्रयत्न होता. यात फक्त घरच नाही, तर आमच्यासाठी रुग्णालयंही बांधण्यात आली होती. शिवाय बलचडीतली अनेक उद्यानं, पूल पोलिश लोकांना प्रवेश करण्यासाठी खुली करण्यात आली होती. यासाठी त्यांच्यावर कोणतीही बंधनं नव्हती. काही ठिकाणी तर त्यांच्या देशाचा झेंडाही असे." अजून एका मुलीने एक वेगळाच किस्सा सांगितला आहे. ही मुलं लहान असताना त्यांना त्या छावणीमध्ये शिजवली जाणारी पालकाची भाजी अजिबात आवडत नसे. याच्या निषेधार्थ त्यांनी एक दिवस स्पिनॅच स्ट्राइक करायचा ठरवला. महाराजांना जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनी तिथल्या स्वयंपाक्याला परत पालक न शिजवण्याची सूचना दिली. खऱ्या अर्थाने या मुलांची त्यांच्या स्वतःच्या मुलांप्रमाणे मनं जपली जात होती!

हे पोलिश लोक दुसरं महायुद्ध संपेपर्यंत या निवारा छावण्यांमध्ये राहात होते. त्यांना निवारा मिळावा, त्यांची व्यवस्थित सोय व्हावी यासाठी दिग्विजय सिंहांनी प्रसंगी अनेक धोकेही पत्करले. मुळात ब्रिटिशांनाच त्यांनी अशाप्रकारे पोलिश निर्वासितांना थारा दिलेला आवडला नव्हता. पण महाराज आपल्या निर्णयावर ठाम होते.

त्यांच्या या निस्वार्थी कार्यासाठी त्यांना पोलांड सरकारकडून गौरवण्यात आलं. पोलंड सरकार आणि भारत सरकार यांनी संयुक्तपणे त्यांच्या कार्यावर आधारित 'लिटील पोलंड इन इंडिया' या नावाचा माहितीपट तयार केला आहे. पण त्यापेक्षाही जामनगरनजीकच्या बलचडी या छोट्याशा गावाला आज पोलंडमध्ये ओळख मिळाली आहे हे जास्त बोलकं आहे.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required