सट्टा खेळणारी गावं !!! या गावातले लोक सट्टा खेळून पोट भरतात !!
प्रत्येक गावाची एकदम 'पेश्शल' अशी ख्याती असते. चादरीसाठी सोलापूर, संत्र्यासाठी नागपूर, शिक्षणासाठी पुणं, पैशासाठी मुंबई . हे आम्ही महाराष्ट्रपुरतंच बोलतोय असं नाही. प्रत्येक राज्यात आशा अनेक शहरांची खास अशी ओळख असते. ही ओळख त्या-त्या गावाची, शहराची शान असते. त्या गावाच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा तो अविभाज्य भाग असतो.
उदाहरण घ्या सुरत किंवा राजकोटचं. सुरत हिऱ्याची जागतिक बाजारपेठ समजली जाते तर राजकोट दूध, तेलबिया, किराणा यांच्या व्यापारासाठी! पण या दोन्हीही गावांची बाजारात एक वेगळीच ओळख आहे ती म्हणजे ही शहरं जुगारासाठी म्हणजे सट्टा बाजार म्हणून (कु) प्रसिद्ध आहेत.
राजकोट एरंडा बाजार म्हणजे एरंडाच्या बियांच्या सट्ट्यासाठी तर सूरत खाजगी शेअर बाजाराच्या सट्ट्यासाठी फेमस आहेत.
आता तुम्ही म्हणाल की यात काय विशेष? प्रत्येक बाजारात सट्टा खेळणारी माणसं असतातच की. पण मंडळी, या बाजाराचा व्यवहार एका रात्रीत शेकडो कोटींचा असतो.
राजकोटमध्ये एरंडाच्या सोबत इतर किरणामालाचा सट्टा इतका मोठा असतो की हा बेकायदा सट्टा काबूत आणण्यासाठी सरकारला अनेक कायदे करावे लागले आणि नॅशनल कमोडिटी एक्सचेंजच्या स्थापनेला हाच सट्टा अप्रत्यक्षपणे कारणीभूत आहे. सुरतचा खाजगी शेअर बाजार (खानगीनु सौदो)आपल्याकडील अधिकृत बाजार बंद झाल्यावर सुरू होतो आणि पहाटेपर्यंत खुला असतो.
हे सर्व सट्टा बाजार बेकायदेशीर आहेतच, पण कितीही कायदे करा, ते चालू राहतातच. परस्परांसोबत असलेला विश्वास हे एकच नाणं इथे चालतं. माणसं या बाजारात रातोरात करोडपती होतात आणि रातोरात रस्त्यावर येतात, शहर सोडून पळ काढतात, आत्महत्या करतात.. पण हा सट्टा थांबत नाही.
पण आज आम्ही अशा एका शहराची ओळख करून देणार आहोत जिथे लोकं पूर्णवेळ सट्टा खेळतात. म्हणजे उपजीविकेचे साधन म्हणून सट्टा खेळतात.
हे शहर म्हणजे राजस्थानातील जोधपूर जवळचं फलोदी!
'इधरका बच्चा बच्चा सट्टा खेलता है' अशी ख्याती या गावाची आहे. हो, आणि सट्टा खेळायला यांना निमित्त लागतं असं काही नाही. पाऊस कधी पडेल? हा सट्टा पंधरा दिवसांचा असतो. पाऊस कधी पडेल? किती पडेल? पहिल्या सरीत पागोळ्या पडतील की नाही अशा अनेक प्रकारे सौदेबाजी होते. हे तर एक उदाहरण झाले. पण जुगार खेळायला यांना कारण लागत नाही. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष कोण होणार, आजचा आयपीएलचा सामना कोण जिंकेल, एक ना दोन!! कोणतेही कारण सट्टा खेळायला पुरेसे आहे. आता अशी बाजी लावणं म्हणजे 'सौदा लिखाना'. प्रत्यक्षात कुठेच न लिहिला जाणारा पण सगळ्यांना बंधनकारक असा हा प्रकार असतो. हारलात तर पैसे द्यावे लागतात आणि जिंकल्यावर न विचारणा करता तुमच्याकडे पैसे पोहचतात. लिहिलेली बाजी किंवा सौदा काही वेळा बुकी 'खातो' म्हणजेच स्वतःच्या अंगावर घेतो याला 'सौदा खाना' असं म्हणतात.
आता जुगार तो जुगारच. पण हे बेकायदेशीर व्यवहार सुरळीत पार पाडतात त्याचे कारण फलोदी गावाच्या ' नेट वर्किंग' मध्ये आहे. फलोदी गावाचे लोक मुंबई ते पाटणा आणि दिल्ली ते कन्याकुमारी सगळीकडे पसरली आहेत. फायनान्सच्या क्षेत्रात अग्रेसर आहेत. समजा एखाद्या सट्टेबाजानी हात वर केले तर तो कायमचा बाजारातून बाहेर फेकला जाती.
तर मंडळी येत्या 23 तारखेला मतमोजणी आहे. नवे सरकार कोणाचे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, तुम्ही टीव्हीवर एक्जिट पोल बघत असालच. आता फलोदी गावात देशभरातील सट्टेबाज गोळा झाले असतील.* काही दिवसांपूर्वी फलोदीत मोदींना 20 पैसे भाव होता तर राहुल गांधींना 25 रुपये. याचा अर्थ असा की समजा तुम्ही 100 रुपये मोदींवर लावले आणि ते पंतप्रधान झाले तर 120 रुपये मिळतील. राहुल गांधींवर 100 रुपये लावले आणि ते पंतप्रधान झाले तर 2500 मिळतील! पण हा या अंदाज फार फार जुना आहे. सट्टा बाजारात दर १० सेकंदाला भाव बदलत असतात. सट्टा बाजारात फलोदीचा अंदाज 'फायनल' समजला जातो. आता फलोदी काय म्हणतंय हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही.
थोडा आंतरजालावर शोध घ्या उत्तर मिळेलच!!!
*(या लेखात हा उल्लेख विषय समजावा यासाठी दिला आहे. तुम्हाला माहितीच आहे की बोभाटा पूर्णपणे अ-राजकीय आहे.)