computer

काय घड्तंय अफगाणीस्तानमध्ये ? जाणून घ्या - काबूल एक्सप्रेस भाग १

काय घड्तंय अफगाणीस्तानमध्ये ? जाणून घ्या - काबूल एक्सप्रेस भाग १

अनेक साम्राज्यांचे कब्रस्तान अफगाणीस्तान- वाचा : काबूल एक्सप्रेस भाग -२

जगाच्या हिशोबात अफगाणिस्तानला महत्व का आहे? अफगाणिस्तान जगाची वाटही लावू शकतं ??? काबूल एक्सप्रेस भाग -३

 

अफगाणिस्तानात तालिबानचं राज्य स्थापन झालंय.तालिबानचे सैनिक राजधानी काबूलच्या सीमेवर थांबले होते. त्यांना काबूलमधे जावंच लागलं नाही. अफगाणिस्तानचे अध्यक्षच सरकार आणि काबूल सोडून पळून गेले.झाडावरचं फळ अगदी अलगदपणे तालिबानच्या हातात पडलं.

१९९६ साली सिविल वॉरनंतर तालिबानचं सरकार अफगाणिस्तानात स्थापन झालं होतं.सरकार स्थापण्याला अमेरिकेनंच मदत केली होती, शस्त्र पुरवली होती.ओसामा बिन लादेननं अफगाणिस्तानात तळ स्थापला आणि २००१ साली न्यूयॉर्कमधले जुळे मनोरे उडवले.अमेरिकेनं ओसामा बिन लादेनवर आणि त्याला थारा देणाऱ्या तालिबान सरकारवर कारवाई केली.२००१ मधे तालिबानचं सरकार पडलं आणि अमेरिकेच्या मदतीने अफगाणिस्तानात संमिश्र सरकार स्थापन झालं. तेव्हां पासून तालिबाननं अफगाण सरकारशी गनिमी युद्ध आरंभलं होतं. वीस वर्षाच्या खटपटीनंतर तालिबाननं पुन्हा सत्ता हाती घेतली आहे.

आता पुढे काय ?

अफगाणिस्तान सरकारकडं सुमारे ४ लाख सैनिक होते. ते सैन्य प्रशिक्षित करणं आणि त्यांना शस्त्र आणि पगारपाणी करण्यावर अमेरिकेनं सुमारे ९० अब्ज डॉलर खर्च केले होते.तालिबानकडं ३५ हजार ते ५० हजार सैनिक होते. तुटपुंज्या खर्चावर सैनिक काम करत होते. त्यांच्याजवळची शस्त्रंही अफगाण सैनिकांच्या शस्त्रांच्या तुलनेत अगदीच सामान्य होती.

फरक होता तो मनोबलाचा. अफगाण सैनिक आतून खचला होता. त्याला पगार धडपणे मिळत नव्हता, अन्नही मिळालेलं नव्हतं, आपलं सरकार ठीक काम करत नाही, भ्रष्ट आहे अशी सैनिकांची भावना होती.त्यामुळं अफगाणिस्तानातल्या अनेक शहरांत त्यांनी शस्त्र टाकलं, पळ काढला.या उलट तालिबानचे सैनिक जिहादी होते, मनानं कणखर होते.मोटार सायकली आणि पिक-अप मोटारी अशी वाहनं वापरल्यामुळं ते चपळतेनं हालचाली करू शकत होते, वाऱ्यासारखे देशभर पसरले.

तालिबानी म्हणजे नक्की कोण ?

तालिबान ही एक मुळातली अनौपचारिक विस्कळीत संघटना होती. खरं म्हणजे ती संघटनाच नव्हती. १९९० च्या सुमाराला मुल्ला उमर कंदाहार विभागातल्या संगेसर या खेड्यातल्या मदरशात रहात होता. उमरचं धार्मिक शिक्षण पाकिस्तानातल्या हक्कानी मदरशात झालं होतं. अफगाणिस्तानात अराजक आणि अनास्था निर्माण झाली होती तेव्हां मुल्ला उमर संगेसरमधले विद्यार्थी घेऊन बाहेर पडला आणि काहीही शस्त्रं हातात नसतांनाही त्यानं काही गावांमधे शांतता आणि व्यवस्था स्थापन केली.मदरशात शिकणाऱ्यांना अफगाण भाषेत तालिब (विद्यार्थी) म्हणतात. तालिब म्हणजे एकवचन, तालिबान म्हणजे अनेकवचन. पाच पन्नास तालिबांनी संघटित कारवाई केली म्हणून त्या गटाचं नाव पडलं तालिबान.

१९९१ ते २०२१ काय घडलं ?

तालिबानकडं अंगावरचे कपडे सोडता काहीही नव्हतं. मुल्लाचं नेतृत्व आणि धाडस या दोन गोष्टींच्या आधारे तालिबांनी धडक कारवाई केली. त्यांच्या शौर्याबद्दल, त्यांच्या क्रौर्याबद्दल, त्यांच्या धार्मिकतेबद्दल कीर्ती पसरली. त्यांच्याबद्दल दंतकथा पसरल्या. लोक त्यांना घाबरू लागले. तालिबान आले म्हटल्यावर सरकारी सैनिक आणि अफगाण यादवी युद्धातले इतर गटांचे सैनिक पळ काढू लागले. जलालाबाद या मोठ्या शहरात अगदी चार दोन पिक अप व्हॅन आणि दहा पाच बाईक घेऊन तालिब शहरात घुसले आणि तिथल्या सैनिक व पोलिसानी शस्त्रं टाकली आणि ते तालिबानला शरण गेले. ही१९९१ च्या सुमाराची गोष्ट. परवा परवा असंच घडत गेलं आणि अफगाण शहरं तालिबानच्या हातात पडत गेली.

इतक्या सहज तालिबानी कसे आले ?

अफगाण सरकार बरंच संघटीत होतं. पोलिस होते, न्याय व्यवस्था होती,बँकिंग होतं, सरकारची विविध खाती होती,मंत्री मंडळ होतं. अमेरिकेची भरभक्कम मदत सरकारला मिळत होती.युरोपीय देशही पैसे देत होते. गेल्या वर्षात अफगाणिस्तानला अमेरिका ३५.५ अब्ज डॉलर, जर्मनी २८.४ अब्ज डॉलर, ब्रिटन १८.६ अब्ज डॉलर, जपान १६.३ अब्ज डॉलर आणि फ्रान्स १४.१ अब्ज डॉलर येवढं अनुदान मिळालं. खुद्द अफगाणिस्तानचं उत्पन्न फक्त ७२ अब्ज डॉलर आहे.

दुर्दैव असं की पैसा पुढारी आणि टोळीनायकांच्या खिशात गेला, लोकांपर्यंत पोचला नाही. अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती वाईट होती, दिवसेंदिवस अधिकाधीक बिघडत जात होती. अफगाणिस्तानातलं सरकार भ्रष्ट होतं. जनता पार वैतागली होती. या राजकीय पोकळीत तालिबान घुसलं.

 

अनेक साम्राज्यांचे कब्रस्तान अफगाणीस्तान- वाचा : काबूल एक्सप्रेस भाग -२

जगाच्या हिशोबात अफगाणिस्तानला महत्व का आहे? अफगाणिस्तान जगाची वाटही लावू शकतं ??? काबूल एक्सप्रेस भाग -३

 

सबस्क्राईब करा

* indicates required