computer

जगाच्या हिशोबात अफगाणिस्तानला महत्व का आहे? अफगाणिस्तान जगाची वाटही लावू शकतं ???

काय घड्तंय अफगाणीस्तानमध्ये ? जाणून घ्या - काबूल एक्सप्रेस भाग १

अनेक साम्राज्यांचे कब्रस्तान अफगाणीस्तान- वाचा : काबूल एक्सप्रेस भाग -२

जगाच्या हिशोबात अफगाणिस्तानला महत्व का आहे? अफगाणिस्तान जगाची वाटही लावू शकतं ??? काबूल एक्सप्रेस भाग -३

अफगाणिस्तानची लोकसंख्या तीन कोटीच्या आसपास आहे. अफगाणिस्तानचं जीडीपी ७२ अब्ज आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या पावणेबारा कोटी आहे आणि महाराष्ट्राचं जीडीपी ४५० अब्ज डॉलर आहे.  लोकसंख्येच्या हिशोबात महाराष्ट्र ३.७५ पट आणि पैशाच्या जमा हिशोबात ६ पट मोठा असूनही जगभर अफगाणिस्तानची चर्चा होते. मग अफगाणिस्तानला जगाच्या हिशोबात इतकं महत्व कां आहे?
प्रश्न रास्त आहे. पण जगाचं राजकारण आणि जग समजून घेतलं की या प्रश्नाची उत्तरं सहज मिळतात.

डेंजर देश -अफगाणिस्तान

अफगाणिस्तान हा एक देश आहे, म्हटलं तर एक सार्वभौम देश आहे. स्वतःचं किंवा जगाचं काय करायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य अफगाणिस्तानाला आहे. अफगाणिस्तानची मदत होऊ शकते किंवा अफगाणिस्तान जगाची वाटही लावू शकतं.
१९९६ किंबहुना त्याच्या आधीपासूनच अफगाणिस्तानं स्वतःचं नुकसान करून घ्यायचं ठरवलं, यादवी माजवली आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची धूळधाण करून टाकली. जनतेला धडपणानं जगता येईनासं झाल्यावर अफगाण जनता पाकिस्तानात, युरोपात, अमेरिकेत, तुर्कस्तानमधे अशा नाना ठिकाणी परागंदा झाली, त्या त्या देशांवर अफगाण जनतेनं आपला बोजा टाकला.

 

जिहादींचे आश्रयस्थान

 १९९६ नंतर अफगाणिस्ताननं अल कायदा व इतर विध्वंसक संघटनाना आपल्या देशात आश्रय दिला,हवं ते करण्याचं स्वातंत्र्य दिलं. ओसामा बिन लादेननं अफगाणिस्तानात मुक्काम केला आणि तिथून जगभर अमेरिका व पश्चिमी संस्कृतीतल्या देशांत हिंसक उद्योग केले. न्यू यॉर्कचे जुळे मनोरे तिथूनच ओसामा बिन लादेननं उडवून दिले.
पाकिस्तानचं लष्कर आणि आयएसआय यांच्या नादानं अफगाणिस्तानानं जिहादींचे कारखाने उभारले,या कारखान्यातून तयार झालेले जिहादी जगभर पसरले. इराक,सीरिया,इंडोनेशिया,फिलिपिन्स, थायलंड,चीन,रशिया,सौदी अरेबिया,इजिप्त अशा नाना ठिकाणी हे जिहादी उद्योग करत होते. अफगाणिस्तानात वापरण्यासाठी पाकिस्ताननं जिहादी तयार केले होते; काही काळ अफगाणिस्तानातली मारामारी थोडी कमी झाल्यानंतर त्यातले काही जिहादी पाकिस्ताननं भारतातही-काश्मिरात-पाठवले होते. 
अफगाणिस्तानची धास्ती वाटत असल्यानं तो शांत रहावा असं जगाला वाटतं.

दुर्मीळ खनीजाचा साठा अफगाणिस्तानात

अफगाणिस्तानात काही दुर्मीळ खनीजं आहेत असा एक विचार जगात पसरलेला आहे. अलिकडे भूगर्भाचा अभ्यास करणाऱ्यांचं म्हणणं आहे की लिथियम या दुर्मीळ खनीजाचा जगातला सर्वात मोठा साठा अफगाणिस्तानात आहे आणि त्याची किमत ३ लाख कोटी डॉलर आहे असं सांगितलं जातं. गाडी विजेवर चालवण्यासाठी लिथियमचा वापर केलेल्या बॅटऱ्यांची आवश्यकता आहे आणि जग पुढल्या पाच दहा वर्षात विजेवर चालणाऱ्यार गाड्या वापरणार म्हटल्यावर लिथियमला जबरदस्त मागणी येणार हे उघड आहे. त्यामुळं जगाचं (विशेषतः अमेरिका, चीन..) अफगाणिस्तानवर लक्ष आहे.काहीही करून तिथलं लिथियम त्यांना मिळवायचं आहे.

पाईपलाईनची अवघड वाट

मध्य आशियातल्या देशात, दक्षिण रशियात तेल आहे. ते तेल रूंद पाईप टाकून अरबी समुद्रापर्यंत नेणं आणि तिथून ते जहाजांवाटे जगभर जाणं आवश्यक आहे. त्यासाठी पाईप लाईन अफगाणिस्तानातूनच न्यावी लागेल. त्यासाठी अफगाणिस्तानात काही एक व्यवस्था, शांतता आणि स्थैर्य निर्माण होणं आवश्यक आहे.

 

भौगोलिक राजकारणातला दुवा अफगाणिस्तान

भूगोलाचंही एक राजकारण असतं. इराण, मध्य आशिया, रशिया, चीन, पाकिस्तान अशा वर्तुळाकार भूगोलात अफगाणिस्तान मधोमध आहे. वर्तुळाच्या परिघावर असलेल्या देशांशी संपर्क आणि दळणवळण ठेवण्यासाठी, त्या देशांना आटोक्यात ठेवण्यासाठी अफगाणिस्तान हा एक मध्यवर्ती भूभाग आहे. त्यामुळं आशियातल्या भौगोलिक राजकारणाच्या हिशोबात अफगाणिस्तानला महत्व आहे.
म्हणूनच तर अठराव्या शतकात ब्रिटीश साम्राज्यानं अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणूनच तर रशिया आणि अमेरिकेनं   आक्रमण करुन अफगाणिस्तान अंकित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणूनच तर आता चीनचा अफगाणिस्तानवर डोळा आहे.
अफगाणिस्तान कसं आहे यात जगाला रस नाहीये. अफगाणिस्तान कसंही असलं तरी त्याला अनेक अंगांनी महत्व असल्यानं जगाला अफगाणिस्ताननं शांत रहावं असं वाटत असतं.

काय घड्तंय अफगाणीस्तानमध्ये ? जाणून घ्या - काबूल एक्सप्रेस भाग १

अनेक साम्राज्यांचे कब्रस्तान अफगाणीस्तान- वाचा : काबूल एक्सप्रेस भाग -२

जगाच्या हिशोबात अफगाणिस्तानला महत्व का आहे? अफगाणिस्तान जगाची वाटही लावू शकतं ??? काबूल एक्सप्रेस भाग -३

सबस्क्राईब करा

* indicates required