कार्यकर्ते मंडळी, तयारीला लागा... निर्माण होतोय जगातला पहिलावहिला रोबोट राजकारणी
आता राजकारणी माणूस म्हटलं की एकतर काहीजणांच्या अंगात उच्चकोटीचा उत्साह संचारतो, किंवा बरेच जण पोटतिडकीने फुसफुसायला लागतात. या नेतेमंडळींना सामान्य लोकांनी प्रश्न विचारले की प्रत्युत्तरादाखल येणारी त्यांची उत्तरंही नको त्या स्वरूपाचीच असतात. असो, या हाडामांसाच्या राजकारणी लोकांचा तुम्हाला वैताग आला असेल तर आता विज्ञानाची एक नवीन क्रांती अनुभवायला सज्ज व्हा मंडळी...
कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनचं युग संपून आपण आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता असणार्या यंत्रांच्या जगात प्रवेश केला आहे. आता तर जगात अनेक ठीकाणी या मशिन लर्निंग उर्फ AI तंत्राचा वापर सुरूही झालाय. यातच भर म्हणून आपल्या न्यूझीलंडच्या संशोधकांनी चक्क जगातला पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता असणारा राजकारणी रोबोट बनवलाय!
या AI राजकारण्याचं नाव आहे 'सॅम'. तो फेसबुक मेसेंजरवर, तसंच त्याच्या वेबसाईटवरील सर्व्हेमध्ये सहभागी होणार्या लोकांबरोबर संवाद साधायला शिकतोय. भविष्यात तो तिथल्या स्थानिक लोकांच्या हाऊसिंग, पाणी, शिक्षण आणि इमिग्रेशन संबधीत तक्रारी किंवा प्रश्नांना उत्तरंही देईल. त्याला बनवलंय न्यूझीलंडचे ४९ हवर्षीय उद्योजक निक गेरिट्सन यांनी. त्यांनी सॅमला आगामी २०२० मध्ये होणार्या न्यूझीलंडच्या निवडणूकीत उमेदवार म्हणून उभं करण्याची तयारीही सुरू केलीये. निक यांच्या म्हणण्यानुसार जगातले देश वातावरणातील बदल, समानता अशा मुद्द्यांवर उपाय योजू शकत नाहीयेत. राजकारणातले अनेक पुर्वाग्रह दूर करणं, लोकांना राजकारणाशी चांगल्या रितीने जोडणं, मोठमोठ्या समस्यांवर चर्चा घडवून आणणं, आणि पक्षाऐवजी मुद्द्यांवर बोलणारा AI राजकारणी निर्माण करणं, हा त्यांचा उद्देश आहे. 'टेक इन एशिया' च्या रिपोर्टनुसार जरी ही प्रणाली पूर्णपणे निर्दोष नसली तरी जगातल्या अनेक देशांमध्ये वाढत चाललेल्या राजकीय आणि सांस्कृतिक अंतराला भरण्याचं काम ती करेल.
सद्या तरी हा राजकारणी रोबोट अगदी बाल्यावस्थेत आहे. त्यात एखाद्या मशिनला राजकारणात उभं राहता यावं असा कोणता कायदाही तिथे अस्तित्वात नाहीये. पण पुढे जाऊन हा प्रकार अस्तित्वात येणार यात शंका नाही.
आता भारतात हा राजकारणी आला तर इथं काय काय गंमती होतील, याची फक्त कल्पनाच करा...