जगभर गाजलेल्या ॲलेक्साची भारतीयांनी कशी गोची केली आहे वाचा !!
आपल्याला शाळेत एक सुविचार नेहमी सांगायचे,"गरज ही शोधाची जननी आहे". आमचं म्हणणं आहे की "आळस ही शोधाची जननी आहे". आपल्याला अधिकाधिक आराम मिळावा म्हणून हे सगळे शोध लागलेले आहेत. आत हाच आळशीपणा वाढवण्यासाठी आणखी एक यंत्र गेल्या दोन वर्षांत दाखल झालंय- व्हर्च्युअल असिस्टंट!!
व्हर्च्युअल असिस्टंट्स म्हणजे काय?
आता तुम्ही मान्य करा किंवा न करा, कॉफी विथ करण तर तुम्ही पाह्यलंच असणार. त्यात तो "ओके गुगल, सेट द लाईट्स" म्हटल्यावर पांढऱ्या रंगाचं एक प्रकरण "ओके" म्हणतं की त्यांचे रॅपिड फायरसाठीचे लाईटसिस्टीम सेट करतं, ते प्रकरण म्हणजे एक प्रकारचा व्हर्च्युअल असिस्टंट. आता गुगलहोमसारखे ॲमेझॉनने पण दोन व्हर्च्युअल असिस्टंट्स बाजारात आणले आहेत, एक थोडा स्वस्त इको डॉट ४०००ला मिळतो, तर फक्त इको ८०००रुपयांना. गुगल होमला "ओके गुगल" म्हटलं की तो आपली आज्ञा ऐकायला सज्ज होतो, तसे ॲमेझॉनचे व्हर्च्युअल असिस्टंट्स "ॲलेक्सा" म्हटलं की जागे होतात आणि त्यांना सांगितलेले काम करतात. सध्याच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तयार केलेले हे व्हर्च्युअल असिस्टंट्स भारी पॉप्युलर झालेत राव!!
व्हर्च्युअल असिस्टंट्स काय कामे करु शकतात?
तसं पाह्यलं तर लै कामं करु शकतात. रोजच्या बातम्या, हवामान, जगाच्या कुठल्या कोपऱ्यात किती वाजले आहेत, कुठे किती ट्रॅफिक आहे, अमक्या सिनेमातलं ढमकं गाणं लावणं, तमक्याला फोन लावणं किंवा मेसेज पाठवणं, रिमाईंडर्स सेट करणं.. हे तर बेसिक झाले. पण जर व्हर्च्युअल असिस्टंट्स घरातल्या टीव्ही आणि इलेक्ट्रिक बोर्डासोबत कनेक्ट केलेत, तर टीव्ही लावणं/बंद करणं, आवाज कमी जास्त करणं, लाईट्स चालू बंद करणं, फॅनचा स्पीड कमी जास्त करणं, युट्यूबवर पुढचं गाणं लावणं असली सगळी कामं तोंडी सूचना देऊन व्हर्च्युअल असिस्टंट्स कडून करवून घेता येतात. आता पटलं ना, यांच्यामुळे आळशीपणा कसा वाढतो ते!!
तर, या सगळ्या व्हर्च्युअल असिस्टंट्स सर्वात लोकप्रिय व्हर्जन आहे ॲलेक्सा!! गेल्या काही काळात ती प्रसिद्ध झाली की या व्हर्च्युअल असिस्टंट्सवर बरेच मीम पण वायरल झाले आहेत. आपल्या देशात अद्यापही काही लोकांना वाचता-लिहिता येत नाही, असे लोक फक्त बोलून ॲलेक्साकडून कामे करवून घेत आहेत. आठवतंय, एका परदेशातल्या मुलीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. ती ॲलेक्साला "बेबी शार्क" गाणं लाव म्हणून सांगत होती आणि शेवटी ॲलेक्साला ती मुलगी काय म्हणते ते कळलं आणि गाणं लावल्यावर बाळ खूष झालं. आता या बाळाला नीट बोलताही येत नव्हतं त्यामुळे ॲलेक्साला इंग्रजीत सांगितलेलंही नीट कळत नव्हतं. आपल्या भारतात लोकांना नीट बोलायला येत असूनही ॲलेक्साला त्यांच्या सूचना कळत नाहीत. का? जाणून घ्या याचं कारण...
ॲलेक्साचा प्रॉब्लेम..
भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. ॲलेक्सा तशा १४ भाषा समजू शकते. पण आपले गडी एकाच वेळी कितीही भाषा बोलू शकतात राव!! तेव्हा मग बिचाऱ्या ॲलेक्साची पंचाईत होते. आता एखाद्याने तिला सांगितले ' वाजाड गं अलेक्सा' तर तिला काय समजणार? एखादा दोनतीन भाषा वापरुन विचारतो, "ॲलेक्सा आज वेदर कसे आहे?" मग यात दोन भाषा आल्याने तिला दोन भाषांवर काम करून मग उत्तर द्यावे लागते. आपली उत्तर भारतीय जनता तिला ॲलेक्साजी म्हणते तेव्हा तिला प्रश्न पडतो की नेमके यांनी ऑर्डर दिली तरी कुणाला?
एकंदरीत आपल्या लोकांच्या या कलंदर स्वभावामुळे ॲलेक्साची गोची होते राव!! तिला एकाचवेळी मग वेगवेगळ्या भाषा प्रोसेस कराव्या लागल्याने प्रश्न कळत नाहीत, ती आपलं काम करत नाही, आपल्याला तीच आज्ञा पुन्हापुन्हा द्यावी लागते. यात वेळ पण जातो आणि तुम्हाला मनस्ताप व्हायची शक्यता पण असते. ॲमेझोनचे म्हणणे आहे की ते या प्रॉब्लेमवर काम करत आहेत. पण तोवर तरी लोकांनी ॲलेक्साशी बोलताना एकावेळी एकाच भाषेचा वापर करायला हवा.