जाणून घ्या ब्लॉक प्रिटिंग कसे केले जाते..
भारतात ठिकठिकाणी हँड ब्लॉक प्रिंटिग केलं जातं. राजस्थानी ब्लॉक प्रिंटेड ड्रेसेस आणि रजया, कलमकारी कपडे, सिल्कवरचं ब्लॉक प्रिंट्स, एक ना दोन. दुपट्टे, साड्या, पडदे, बेडशीटस या सगळ्या प्रकारांत हे ब्लॉक प्रिंटेड कापड वापरलं जातं. हे कपडे बनवण्याची प्रक्रिया अथ पासून इतिपर्यंत हातानेच केली जाते.
पाहूयात आज ब्लॉक प्रिंटिंग कसे केलं जाते ते..
ठसा बनवणं
लाकडाची गोल चकती कापून तिची एक बाजू छान साफाईदार बनवली जाते. मग त्या बाजूवर फेविकॉल आणि पांढर्या खडूच्या पावडरचा एक थर देतात. हा थर एकदा सुकला की ज्या चित्राचा ठसा बनवायचा ते चित्र खिळ्यांनी ठोकून बसवतात. हे सर्व झालं की तो चित्रावरचा आकार टोकदार खिळा आणि हातोड्याने खालच्या चकतीवर काढला जातो. एकदा का तो आकार खालच्या लाकडावर आला की चित्राच्या आजूबाजूचा भाग कोरून काढला की तिथे फक्त त्या चित्राचा ठसा राहातो.
मग त्या ठशाला मागच्या बाजूला एक हँडल बसवला की तो उपयोगासाठी तयार होतो.
कापड तयार करणे
हे कापड तयार करणे ही चांगलीच किचकट काम आहे. एका मोठ्या टेबलावर रंगकाम करण्याच्या पांढर्या कापडाखाली वापरलेल्या कापडांचे ७-७ थर आणि त्याखाली ज्यूटच्या कापडाचे चांगले वीसेक थर दिले जातात. वरच्या कापडावर ब्लॉक प्रिंट करत असताना खाली रंग पाझरतो त्यामुळे ही सगळी काळजी घ्यावी लागते.
प्रत्यक्ष ब्लॉक प्रिंटिंग करताना..
कापड अंथरून तयार झाल्यावर प्रत्यक्ष ब्लॉक प्रिंटिंग हे अत्यंत काळजीपूर्वक आणि कौशल्याने करण्याचे काम आहे. कधीकधी एकाच डिझाईनसाठी दोनतीन वेगवेगळे ठसे वापरावे लागतात. अशावेळेस पहिला ठशा कापडावर पूर्णपणॆ उमटवला जातो. मग त्यावर दुसरा छाप उमटवताना योग्य ठिकाणी व्यवस्थित उमटवावा लागतो नाहीतर पूर्ण डिझाईन खराब होऊ शकते. पूर्ण प्रोसेसमधली ही पायरी सगळ्यात अवघड समजली जाते.