computer

अगदी युद्ध चालू असतानासुद्धा हमखास झोप येईल अशा या दोन ट्रिक्स...आजपासून तुम्हीही झोपा फटाफट आणि ते ही डाराडूर !!

झोप लागत नाही हा अनेकांचा तक्रारीचा विषय. प्रेमात पडलेल्या लोकांची गोष्ट वेगळी ओ पण सामान्य पब्लिकचं काय ? ही झाली आपल्या झोपण्याची समस्या. पण समजा तुम्ही एका तंबूत झोपलेले आहात आणि बाहेर मशीन गन्स असंख्य गोळ्या झाडत आहेत, रणगाड्यांमधून गोळे फेकले जातायत, माणसांच्या आरोळ्या/किंकाळ्यांचा आवाज येतोय. अशा वातावरणात सैनिकांना झोप कशी लागत असेल ?
कारणं काहीही असली तरी समस्य झोपेचीच. पण सैन्याने यावर फार पूर्वीच उपाय शोधलाय. हा उपाय आपण सामान्य नागरिक सुद्धा करू शकतो शकतो. 

चला तर झोपेची समस्या सोडवूया. 

या सोप्प्या ट्रिकचा उल्लेख “लॉयड बड विंटर” या लेखकाच्या  "Relax and Win" या पुस्तकात आढळतो. विंटर हे धावपटूंना प्रशिक्षण द्यायचे. त्यांना ही सोप्पी कल्पना तयार करण्याची गरज पडली ती दुसऱ्या महायुद्धामुळे. झालं असं की, दुसऱ्या महायुद्धात मोठ्या प्रमाणावर वैमानिकांचा जीव जात होता. याचं कारण शत्रू नसून चक्क झोप होती. पुरेशी झोप न झाल्याने फायटर प्लेनचे वैमानिक चुकीचा निर्णय घेऊ लागले होते. त्यामुळे त्यांचा हकनाक जीव जायचा. ही समस्या सोडवण्यासाठी विंटरना आमंत्रित करण्यात आलं. त्यांनी या समस्येवर २ उपाय काढले. १. शारीरिक विश्रांती आणि २. मानसिक विश्रांती. 

या दोन सोप्प्या पद्धतींचा ६ आठवडे सराव केल्यानंतर सैनिकांमध्ये फरक जाणवू लागला. सैनिक चक्क ऐन रणभूमीत २ मिनिटात झोपी जाण्यात यशस्वी झाले. चला आता या ट्रिक्स शिकून घेऊया.

१. शारीरिक विश्रांती

शारीरिक विश्रांती अशी : सर्वात आधी बेडवर पाय खाली सोडून बसायचं. यानंतर डोळे मिटून डोकं खाली आणायचं. हनुवटी छातीपर्यंत येईल इथवर मान खाली आली पाहिजे. पुढे, याच अवस्थेत श्वास मंद ठेवून चेहऱ्याच्या स्नायूंना शिथिल होऊ द्यायचं. हळूहळू संपूर्ण शरीर शिथिल होऊ द्यायचं. जीभ, हात, पाय, खांदे इत्यादी. आपणं अगदी निष्प्राण झालोय या अवस्थेत गेलात की फक्त आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं. एवढं केलं की झोप यायला मदत होते. 

२. मानसिक विश्रांती

दुसरी ट्रिक आहे मानसिक विश्रांती. ही कदाचित कठीण भासू शकते. तर, या ट्रिक मध्ये असा विचार करायचा की तुम्हाला कोणतेच ताणताणाव नाहीत. आयुष्य सुंदर आहे !! अशी कल्पना करणं कठीण जाऊ शकतं कारण झोप न येण्यामागे ताणताणाव हीच समस्या असू शकते. पुढे, तुम्ही एका आरामदायी ठिकाणी बसून मोहून टाकणारं दृश्य बघत आहात असा विचार करा. अश्या कल्पना व्यक्तीनुसार बदलत जाऊ शकतं. त्यामुळे ज्याने त्याने आपापल्या कल्पनाशक्तीने मनोरम दृश्य डोळ्यांसमोर आणावीत. सुखासीन वातावरणात कोणतेही ताणताणाव नसलेल्या अवस्थेत आपण वावरतोय असा भास निर्माण करायचा. यामुळे होतं असं की आपण शांत होऊन झोप यायला मदत होते.

 

हे दोन उपाय सुरुवातीला कठीण वाटू शकतात. पण रोजच्या सरावाने तुमची झोपेची समस्या चुटकीसरशी सुटेल. मग कधी करून बघताय ?

सबस्क्राईब करा

* indicates required