एका देशाचं नागरिकत्व मिळवणारी पहिली रोबो, पण AI म्हणजे काय? जाणून घ्या तिची पूर्ण कहाणी..
पाहा या सोफियाला. अर्धा माणसाचा चेहरा आणि अर्ध्या भागात दिसणाऱ्या यंत्रांमुळं ती काही आपल्याला पूर्ण मानव वाटत नाही. तिला अर्थातच आपल्यासारखं हृदय आणि मेंदू तर नाहीच नाही, पण तिच्याकडे आहे चक्क सौदी अरेबियाचं नागरिकत्व आणि पासपोर्टसुद्धा. २० ऑक्टोबर २०१७रोजी तिला सौदी अरेबिया या देशानं रियाधला झालेल्या एका समारंभात नागरिकत्व बहाल केलंय.
जगात वेगवेगळ्या प्रकारचे रोबो असतात. काही मानवांसारखे दिसणारे म्हणजेच हात-पाय-नाक-डोळे असणारे असतात तर काहींना फक्त हात किंवा सामान उचलण्यासाठी हूक किंवा तत्सम काहीतरी असतं. तर या माणसांसारख्या दिसणाऱ्या रोबोजना ह्युमनॉईड म्हटलं जातं. जगात खूप सारे ह्युमनॉईड्स आहेत. यापूर्वी आम्ही तुम्हांला पूर्णपणे रोबोट्सकडून चालवल्या जाणाऱ्या हॉटेलबद्दल सांगितलं होतं. तिथं काही ह्युमनॉईड्स तर काही प्राण्यांचं रूप दिलेले रोबोज आहेत. त्यामुळं सोफिया काही पहिली ह्युमनॉईड नाहीय.
सोफियाची जन्मकथा:
सोफियाला बनवलंय हाँगकाँगमधल्या हॅन्सन रोबोटिक्स नावाच्या कंपनीनं. तिला १९ एप्रिल २०१५ या दिवशी कार्यान्वित करण्यात आलं होतं. तिला तयार करताना प्रसिद्ध अभिनेत्री ऑड्री हेपबर्नला समोर ठेवण्यात आलं होतं. तिच्या गालांचे उंचवटे आणि चाफेकळी नाक ऑड्रीसारखं आहे असं या कंपनीचं म्हणणं आहे. पण आम्हांला काही ती ऑड्रीसारखी दिसतेय असं वाटत नाहीय.
(सोफिया आणि ऑड्री हेपबर्न - आता तुम्हीच सांगा, या दोघींत तुम्हाला कितपत साम्य वाटतंय??)
तर, या सोफियाला कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची क्षमता आहे. ही कृत्रिम बुद्धीमत्ता दिलेलं यंत्र त्याला कितपत बुद्धी दिली आहे, त्यानुसार कमी किंवा अधिक हुशार असू शकतं. याचा मूळ उद्देश सध्या माणूस करत असलेली कामं यंत्राकडून करवून घेण्याचा आहे. बरं, या सोफियाला मशीन लर्निंग म्हणजेच शिकण्याची क्षमताही दिलीय. आपण शिकतो म्हणजे काय करतो? तर, ऐकलेली-पाहिलेली-वाचलेली माहिती लक्षात ठेवतो आणि योग्य वेळ आली की त्या माहितीचा वापर करतो. ही सोफियाही ऐकू, पाहू शकते आणि तिनं आता केलेली गोष्ट पुढच्यावेळेस अधिक चांगल्या पद्धतीनं ती करू शकते.
सोफियाची वादग्रस्तता:
सौदी अरेबियासारख्या स्त्रियांना अत्यंत वाईट वागणूक देणाऱ्या देशानं सोफियाला नागरिकत्व देणं हा खरं तर मोठाच विरोधाभास आहे. म्हणजे पाहा, तिथं बायका पुढच्या वर्षी कार चालवू शकतील, त्यांना अजून एकट्यानं बाहेर पडण्याची परवानगी नाहीय, त्या कोणत्याही गोष्टीविरूद्ध आवाज उठवू शकत नाहीत. इतकंच काय, त्यांना त्यांचा खास बुरखा-अबाया घातल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. असं असताना त्यांच्या राजधानीत विना अबायाच्या सोफियाला नागरिकत्व देण्यात आलंय. जिथं माणूस असणाऱ्यांना स्त्रियांनाच काही अधिकार नसतील, तर या सोफियाला काय अधिकार असतील?
तसंच, जर तिला काही कारणानं कोर्टात खेचलं किंवा तिच कोर्टात गेली, तर ते प्रकरण नक्की कसं हाताळलं जाईल, याबद्दलही जगभरातल्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या मनांमध्ये गोंधळ आहे.
ही सोफिया एकदा म्हणाली होती की तिला माणसांना नष्ट करायचंय. शब्दश: सांगायचं तर, "destroy humans". मात्र नुकतंच तिनं लोकांच्या सहवासात शांतपणे तिला राहायचंय असं म्हटलंय. आपण सिनेमांमध्ये बघतो ना, रोबोजनी जगावर ताबा मिळवलाय आणि त्यांना पूर्ण मानवजातीवर राज्य करायचंय. तसं कदाचित भविष्यात होऊही शकेल.
तिचं वेगळेपण:
सोफिया पाहू शकते, ऐकू शकते आणि चेहऱ्यावर हावभावही दाखवू शकते. ती आपल्यासारख्या मुलाखती देऊ शकते, लोकांशी संवाद साधू शकते. अर्थात, संवाद साधू शकणारी ही काही पहिली रोबो नाहीय. सिंगापूरच्या नादिया मॅग्नेनाट थल्मान (Nadia Magnenat Thalmann) या प्रोफेसरबाईंनी स्वत:ची हुबेहूब प्रतिमा असणारी नदीन नावाची अशी रोबो २०१३मध्येच तयार केलीय. पण ही नदिन उत्तर द्यायला खूप वेळ लावते. त्यामानानं ही सोफिया प्रश्नाचा अर्थ समजून घेऊन उत्तर देण्यात चांगलीच तरबेज आहे असं तिच्या भाषणावरून दिसतंय.
( प्रोफेसर नादिया, नदीनसोबत. ओळखा पाहू कोणता रोबो आहे? - स्रोत)
आताच्या या रियाधमध्ये झालेल्या फ्युचर इनव्हेस्टमेंट इनिशिएटिव्हच्या नागरिकत्व बहाल करण्याच्या कार्यक्रमात सोफियाने भाषण देखील केलं. ती भुवया उंचावू शकते, दु:खी हावभाव चेहऱ्यावर दाखवू शकते. आनंदही ती दाखवू शकते. पण माणसासारख्या सगळ्या भावभावना ती दाखवू शकत नाही. २०१७मध्ये तिनं बऱ्याच देशांना भेटी दिल्या आहेत, लोकांना भेट्लीय आणि मिडियाची लाडकीही बनलीय. ती सिनेमेसुद्धा पाहाते बरं...
तिचा निर्माता, डेव्हिड हॅन्सनच्या मते, ती वृद्धांना आधार देण्याचं, एखाद्या कार्यक्रमात किंवा पार्कमध्ये लोकांना मदत करण्याचं काम सहजपणे करू शकेल. किंबहुना, याच कामासाठी तिची निर्मिती झाली आहे.
आजच्या घडीला मात्र ही सोफिया विक्रीसाठी उपलब्ध नाहीय. मात्र याच हॅन्सन रोबोटिक्स कंपनीने बनवलेला प्रोफेसर आईनस्टाईन मात्र विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि हा १४ इंची प्रोफेसर लोकांचा खूप लाडका आहे. ही कंपनी आणखी काही हुमनॉईड्सना सोफियाच्या कुटुंबात सामवाणार आहे.
या सगळ्या उदाहरणांवरून लक्षात येतंय की, भविष्यात घरीदारी रोबोज सहजपणे काम करतील. कुणी सांगावं, कदाचित माणसानं अश्मयुगात जसे त्याचे छोटे गट बनवले, तशा या रोबोजच्या पण सोसायटया हळूहळू बनू लागतील..