computer

आपले लायझॉल गर्भपात, स्पॅनिश फ्ल्यूरोधक आणि योनीमार्ग साफ करायला वापरले जायचे? हे का, केव्हा आणि कसे होत होते?

सध्याच्या  दिवसांत अखंडीत साथ कोणती असेल तर ती टिव्ही चॅनेल्सची! सोबत टिव्ही कमर्शिअल्स म्हणजे जाहिरातींचा अखंड भडीमार तर आहेच. थोडं लक्ष देऊन बघितलंत तर प्रत्येक एक मिनिटाच्या कमर्शिअल ब्रेकमध्ये एका कंपनीची जाहिरात नसेल असे होतच नाही. ती कंपनी म्हणजे - रेकीट बेनकायझर! कदाचित या कंपनीचे नाव फारशा परि,चयाचे नसेल म्हणा पण त्या कंपनीच्या प्रॉडक्टची नावं सांगितल्यावर खूण पटेल हे नक्की! 

डेटॉल, सर्वसाधारण फिनाईलच्या ऐवजी लायझॉल, टॉयलेट साफ करायला येणारा हार्पिकवाला अक्षयकुमार, डासांना पिटाळून लावणारे मॉर्टीन, खवखवणार्‍या घशासाठी स्ट्रेप्सिल्स, पिंपल्सवर क्लिअरसील, झालंच तर कपड्यांवरचे डाग काढणारे व्हॅनिश,  वीट हेअर रिमूव्हर, ड्युरेक्स.... पटली ना ओळख? आता आठवा, प्रत्येक मिनिटात एक तरी जाहिरात या उत्पादनांची असतेच असते. कारण फार सोपं आहे. यातली अर्ध्यांहून अधिक उत्पादनं जंतूशी लढा देणारी आहेत. 

तर अशा जंतू ते शुक्रजंतू (ड्युरेक्स) यांचा मुकाबला करणार्‍या कंपनीच्या उत्पादनांसोबत काही गंमतीदार किस्से जोडलेले आहेत. म्हणजे पाहा, हॅरी पिकप नावाच्या एका माणसाने बनवलेल्या उत्पादनाचं नाव पडलं हार्पिक!  मॉर्टिन नावाची पण अशीच एक गंमत आहे. मॉर्टिन बनवणारा शास्त्रज्ञ जर्मन आणि त्याची बायको फ्रेंच. फ्रेंच भाषेत मॉर्ट म्हणजे डेड (dead) आणि जर्मन भाषेत इन (ein) म्हणजे एक. या दोन्हीचे एकत्रीकरण झाले मॉर्टिन!  Durability, reliability, and excellence तीन शब्दांचा वापर करून तयार ते ड्यूरेक्स!

सध्या या उत्पादनांची वाढलेली मागणी बघता तुमच्या मनात असाही विचार आला असेल की या कंपनीचे शेअर घ्यायला काय हरकत आहे? पण फार उशीर झाला आहे मंडळी. हे शेअर बर्‍याच वर्षांपूर्वी डी-लिस्ट झाले आहेत.

वाचकहो, आज आम्ही सांगणार आहोत या कंपनीच्या एका उत्पादनाची कहाणी -लायझॉलची  रेकीट बेनकायझर भारतात ज्याला लायझॉल नावाने विकते, त्याच उत्पादनाला इतर देशांत लायसोल नावाने विकते. आज लायझॉलची गोष्ट सांगण्याचे कारण असे आहे की १३० वर्षांपूर्वी जेव्हा युरोपात कॉलर्‍याची साथ जोरात होती, तेव्हा कॉलर्‍याशी मुकाबला करण्यासाठी डॉ. गुस्ताव रॉपेन्स्ट्रॉच नावाच्या माणसाने लायझॉलची निर्मिती केली. अर्थात याचं श्रेय त्याला जात असले तरी त्याकाळात बाजारात याच नावाची अनेक उत्पादने आली.

१९१८ साली स्पॅनिश फ्ल्यूच्या साथीदरम्यान लेन अँड फिंक या कंपनीने स्पॅनिश फ्ल्यूला रोखण्याचा रामबाण उपाय म्हणून या उत्पादनाची जाहिरात केली. या उत्पादनाचा मूळ फॉर्म्यूला कार्बोलिक अ‍ॅसीड आणि फेनॉलचे मिश्रण असा होता. आता फॉर्म्युल्यात फरक आलेला आहे. पण त्याकाळात आत्महत्या करणार्‍यांचे लायझॉल हे हमखास काम करणारे विष समजले जायचे.

स्पॅनिश फ्ल्यूची साथ ओसरल्यावर लेन अँड फिंक कंपनीने जाहिरातीची दिशा बदलली. लायझॉल हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी उपयुक्त औषध म्हणून प्रसिध्दीस आणले. स्त्रियांच्या योनीमार्गातील जंतूसंसर्ग कमी करण्यासाठी हा एक अभिनव मार्ग असे सुचवणाऱ्या अनेक जाहिराती तयार करण्यात आल्या. सोबत दिलेला नमुनाच पाहा!!

समागमानंतर मूल होऊ नये यासाठी केल्या जाणार्‍या डूशिंग (पाण्याचा फवारा)मध्ये लायझॉल वापरण्याची लोकप्रिय पध्दत सुरु झाली. बाळंतपणात होणार्‍या जंतूसंसर्गासाठी पण लायझॉलचा उपयोग बरीच वर्षे करण्यात आला. 

अमेरिकेत मात्र लायझॉलचा उपयोग एका वेगळ्याच कामासाठी, म्हणजे बेकायदेशीर गर्भपातासाठी केला जायचा. आपल्याकडे आता गर्भपाताला मर्यादित प्रमाणात मान्यता आहे, ज्याला  MTP म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नसी असे म्हणतात. अमेरिकेत मात्र साठीच्या दशकापर्यंत गर्भपात करण्याची परवानगी नसे. त्यामुळे बरेचसे क्वाक म्हणजे कुडमुडे डॉक्टर लायसोलचा वापर गर्भपातासाठी करायचे. लायसोलचे पाण्यात मिश्रण करून गर्भाशयात ते ढकलायचे. अशा क्रिमिनल ऍबॉर्शनमध्ये जीवाला धोका असायचा.

१९५६ साली दोन डॉक्टरांनी एक मेडिकल जर्नलमधून या प्रकारावर प्रकाशझोत टाकला. त्यांनी निदर्शनास आणले की चार स्त्रियांवर लायसोल वापरून गर्भपाताचा प्रयोग करण्यात आला होता. त्यांपैकी एक महिला मरण पावली, तर इतर तिघीजणी मरणाच्या दारातून परत आल्या. यानंतर वैद्यकीय जगाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आणि हे प्रयोग थांबले. त्याकाळच्या लायझॉलमध्ये क्रेसॉल नावाचे एक रसायन वापरले जायचे. क्रेसॉलमुळे गर्भपाताला मदत होत असे, पण किडन्या कामातून जायच्या. अनेक वर्षे अ‍ॅबॉर्शन केमिकल अशी लॉयझॉलची ख्याती होती.  आता मात्र या सगळ्या प्रकारांना आळा बसलेला आहे आणि केवळ घराच्या -ऑफिसच्या-हॉस्पिटलच्या स्वच्छतेसाठी लायझॉल वापरले जाते.


सध्या सांगायचा मुद्दा इतकाच आहे की आताशा कोरोनावर अनेक चित्रविचित्र उपाय सामाजिक माध्यमातून तुमच्याकडे पोहोचत असतील. तर ते प्रयोग करून पाहू नका. डॉक्टरचे काम डॉक्टरलाच करू द्या आणि त्यांचेच सल्ले ऐका.

सबस्क्राईब करा

* indicates required