शेजारी निळाशार समुद्र असूनही हा तलाव गुलाबी कसा ?? फोटोशॉप तर नक्कीच नाहीय हा !!
ऑस्ट्रेलिया हा खंड विचित्र आणि जगावेगळ्या गोष्टींनी भरलेला आहे. जगात कुठेही आढळणार नाहीत असे प्राणी, वनस्पती तिथे आढळतात. एवढंच नाही तर तिथली ठिकाणं सुद्धा चमत्कार वाटतील अशी आहेत. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियाचा हा गुलाबी तलाव पाहा.
बाजूलाच समुद्र असूनही हा तलाव चक्क गुलाबी रंगात आहे. हे कसं शक्य झालं ? याचं उत्तर ऑस्ट्रेलियाच्या खास पाण्यात दडलंय.
मंडळी, हा आहे “लेक हीलर”. या तलावाला मिळालेला गुलाबी रंग काही वर्षांपर्यंत रहस्य होता. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं होतं, की तलावात असणाऱ्या विशिष्ट शेवळांमुळे पाण्याला गुलाबी रंग मिळाला आहे. याची सत्यता तपासण्यासाठी एक्सट्रीम मायक्रोबायोम प्रोजेक्ट या संशोधन कार्यक्रमाच्या अंतर्गत एक संशोधन करण्यात आलं.
संशोधकांनी पाण्याचे नमुने घेतले आणि त्यांची DNA तपासणी केली. तपासणीत जे तथ्य बाहेर पडलं ते असं, की क्षारांवर जगणारे जीवाणू आणि दुनालीयेला नावाची वनस्पती या पाण्यात आढळते. दोघांनाही लालसर-गुलाबी रंग आहे. याचा अर्थ आधीचा तर्क काही अंशी बरोबर होता, पण या संशोधनातून आणखी रोचक माहिती सापडली ज्याचा विचारही झाला नव्हता.
पाण्याच्या नमुन्यांमध्ये Salinibacter ruber नावाचा जीवाणू आढळला. मिळालेल्या DNA मधून तब्बल ३३% DNA या प्रकारच्या जिवाणूचे होते. म्हणजे लेक हीलरला मिळालेला गुलाबी रंग हा या जीवाणूची देण आहे तर.
लेक हीलर माणसांसाठी सुरक्षित आहे का ?
एवढे वेगवेगळे जीवाणू आणि शेवाळ असल्यावर तिथे पोहायला कोण जातंय, असं जर तुम्हाला वाटलं असेल तर ते साफ चुकीचं आहे. या तलावात असलेली प्रचंड क्षार क्षमता माणसाला पोहण्यासाठी अनुकूल बनवते. ज्याला पोहता येत नाही तोही या तलावात न बुडता पोहू शकतो... आणि हो, या पाण्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणामही होत नाही.
मंडळी, हा तलाव आणि तिथला परिसर इतका “Cool” असूनही फारसं कोणी तिथे जात नाही. याचं कारण म्हणजे मिडल आयलंड ऑस्ट्रेलियाच्या अगदी दक्षिण कोपऱ्यात आहे. तिथे जायचं झाल्यास बोट किंवा होडी हे दोनच पर्याय आहेत. याखेरीज हा प्रवास खर्चिक पण आहे.
समजा तुम्हाला ऑस्ट्रेलियाला जायचा चान्स मिळाला तर लेक हीलर पाहणार का ? सांगा बरं !!