जागरण करून केलेला अभ्यास शरीरासाठी चांगला की वाईट ?? परीक्षेच्या आधी हे वाचा !!
परीक्षा दिलेल्या प्रत्येकालाच परीक्षेचा अभ्यास लक्षात राहतो. सर्वात जास्त लक्षात राहतो तो परीक्षेचा आदला दिवस. तो दिवस म्हणजे युद्धपातळीवरच्या अभ्यासाचा असतो. आपल्यातल्या बऱ्याच जणांनी त्यांच्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी रात्ररात्रभर जागरण करून अभ्यास केला असणार. आजही मुलं रात्ररात्रभर पाठांतरात घालवतात. चहा कॉफी तर लिटर लिटरभर रिचवली जाते.
कधी विचार केला आहे का हा अभ्यास आपल्या मेंदूसाठी चांगला असतो की वाईट ? बरेचजण म्हणतील की आदल्या रात्री अभ्यास केला म्हणून मी पास झालो. अशी काही उदाहरणं सोडली तरी प्रश्न तिथल्या तिथेच आहे. जागरण करून केलेला अभ्यास मेंदूसाठी चांगला असतो का ? आजच्या जागतिक निद्रा दिनानिमित्त आपण या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत.
विज्ञान म्हणतं की परीक्षेच्या आदल्या रात्री प्रचंड अभ्यास करणे स्मार्ट ठरत नाही. याला तसं कारणही आहे. वर्षभर अभ्यास न केलेली मंडळी परीक्षेच्या अगोदर एक अख्खी रात्र अभ्यास करण्यात घालवतात. पण खरं तर हा अभ्यास आपल्या स्मरणशक्तीवर परिणाम करत असतो. आपल्या प्रत्येकाच्याच शरीराचं एक घड्याळ असतं. जेवणाची वेळ, झोपेची वेळ, कामाची वेळ या सगळ्या वेळा ठरलेल्या असतात. याविरुद्ध जाऊन जर आपण काही करणार असू तर शरीराचं गणित बिघडतं.
दिवसा पाठांतर करताना आपला मेंदू ज्या गतीने माहिती साठवतो ती गती रात्री मंदावते. जर आपण मेंदूच्या इच्छेविरुद्ध काम केलं तर घोटाळा होतो. आपल्याला मेंदूची ज्या वेळी सर्वात जास्त गरज असते तेव्हाच मेंदू बंद पडू शकतो. काही वेळा प्रश्नपत्रिका हातात आल्यावर मुलं सगळंच विसरतात. नीट झोप न झालेल्या मुलांना असा अनुभव जास्त येतो.
एका वैज्ञानिक अभ्यासात ५३,००० विद्यार्थ्यांवर एक प्रयोग करण्यात आला होता. या प्रयोगात विद्यार्थ्यांच्या मेंदूवर होणारा निद्रानाशाचा परिणाम अभ्यासण्यात आला. आलले निष्कर्ष आश्चर्यकारक होते. अंमलीपदार्थ किंवा अल्कोहोलने मेंदूवर जो परिणाम होतो तसाच काहीसा परिणाम या विद्यार्थ्यांच्या मेंदूवर दिसून आला.
स्वित्झर्लंड मध्ये झालेल्या एका प्रयोगात हे सिद्ध झालंय, की फक्त एक दिवस झोपेशिवाय गेला तरी शरीराचं सगळं गणित बिघडतं.
मग करायचं काय ?
राव अभ्यास तर झालेला नाही, दुसऱ्या दिवशी पेपर आहेत आणि हे विज्ञान सांगतंय की झोपेचं खोबरं करू नका ? मग करायचं तरी काय ?
अशी परिस्थिती असेल तर तुम्ही जागरण करू शकता पण थोडं स्मार्ट बना. आधी तर कॉफी आणि चहा टाळा. अभ्यासाच्या मध्ये निदान २० मिनिटे झोप घ्या. एकदा झोपलो की उठणार नाही या भीतीने झोप टाळू नका. अभ्यास करताना पाठांतरावर भर देऊ नका. परीक्षा झाल्यावर घरी येऊन ताणून द्या.
मंडळी, हा शॉर्टकट तुम्हाला बऱ्याच प्रमाणात फायदेशीर ठरेल. लक्षात ठेवा शरीराच्या विरुद्ध जाऊन काही करणे म्हणजे धोक्याचं ठरू शकतं. गुगलवर अपुऱ्या झोपेमुळे होणारे परिणाम सर्च करून पाहा मोठी लिस्ट मिळेल.
एकंदरीत काय तर पुरेशी झोप घ्या. तुमच्या आजूबाजूला कोणी परीक्षेच्यावेळी ‘नाईट मारणार’ असेल तर त्याला वेळीच हा लेख दाखवा !!