एक कीटक दुसर्या कीटकाचे अंत्यसंस्कार करतो ? नेमके जैविक सत्य जाणून घ्या !
तुमच्या ओळखीत असे अनेक भाबडे परमपूज्य काका असतील जे सक्काळी सकाळी असे निष्पाप असे व्हिडिओ पाठवत असतात. हे निर्व्याज -निष्पाप व्हिडिओ न बघण्याचा पर्याय तुमच्याकडे नसतो.पण एक दिवस अचानक ते अशी एक व्हिडिओ क्लिप पाठवतात जी बघितल्यावर तुम्हीही संभ्रमात पडता.
आता उदाहरणार्थ 'कीट पतंगै भी अपने प्रियजनों का दाह-संस्कार करते हैं या व्हिडिओत खरोखर एक माशी एका मेलेल्या कीटकाला मातीत गाडताना दिसते. (दाह संस्कार म्हणजे जाळणे) आता गाडण्याऐवजी आपण 'दफन' हा शब्द वापरायचा का ? तर मंडळी तसं काही नाही हा एक जीवसृष्टीचा व्यापारी व्यवहार आहे. कसं ते समजून घेण्यासाठी पुढे वाचा !!
इतर सगळ्याच जीवसृष्टीप्रमाणेच किटकसृष्टीत शिकार आणि शिकारी हे जोडी आढळते. ह्या व्हिडियोमध्ये दिसणारी माशी पॅरासिटॉईड वास्प ह्या कुळातली आहे. पॅरासिटॉईड म्हणजे परजीवी. ही प्रौढ माशी जरी 'व्हेजिटेरीयन' असली तरी हिच्या अळीला म्हणजे जन्माला येणार्या नव्या जीवाला वाढीसाठी प्रोटीन्सची गरज असते. आता ही गरज भागवणे हे आईचे काम आहे आणि आई ती गरज भागवते शिकार करून ! आता ही आई माशी शिकार कशी करते ते बघा !
आधी ही माशी मातीमध्ये खड्डा खणून बीळ तयार करते व मग शिकारीच्या शोधात बाहेर पडते. बिळाच्या जवळपास झुरळ, नाकतोडा किंवा क्रिकेटसारखा किडा दिसला की ही त्याला दंश करते. या दंशाचे दोन टप्पे असतात. पहिला दंश असतो जो शिकारीला थोडसं बधीर करतो. यानंतर 'डॉक्टर्स प्रिसीजन'ने किटकाच्या मेंदूमध्ये बरोब्बर त्या चेतासंस्थेला असा दुसरा दंश करते की ज्यामुळे किटकाच्या पायाची हालचाल मंदावते व तो माशीचा गुलाम होतो. ह्यानंतर त्याच्या 'मुच्छा अँटीना' पकडून माशी त्याला बिळामध्ये घेऊन जाते आणि त्याच्या अंगावर बरोब्बर अशा जागी अंड घालते की जिथे नवजात बाळ-अळीला किटकाच्या अंगाला छिद्र पाडून रस शोषता येईल.
यानंतर माशी बाहेर पडते आणि खड्ड्याचं दार थोडसं बुजवून वर एक दगड किंवा काड्या वगैरे रचून तिथून निघून जाते.
अंड्यातून बाहेर पडलेली अळी हळूहळू त्या किटकाच्या शरीरात प्रवेश करते आणि आतमधल्या फ्लुईड्स आणि अवयवांना अशा पद्धतीने खाते की तिला कोषात जाईस्तोवर पुरेसे पोषण मिळेल व किटक जिवंत राहील. किटकाचे फुफ्फुसं, हृदय आणि मेंदू हे सर्वात शेवटी खाल्लं जातं. संशोधकांचा असा अंदाज आहे की अळी किटकाच्या अंतर्भागात विशिष्ट द्रव्य पसरवते, ज्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन न होता किटकाची जखम ताजी राहते.
अशाप्रकारे किटकाला पोटभर पोखरून झाल्यावर दहा ते बारा दिवसांनी अळी किटकाच्या शरीरातच कोषावस्थेत जाते. तिचं माशीमध्ये रुपांतरण पूर्ण झाल्यावर ती त्याच्या शरीरातून बाहेर येते आणि बिळाच्या तोंडावरचा दगड बाजूला सारून बिळातून बाहेर पडते. ह्या माश्यांमध्ये कोळ्यांवर वाढणार्या, दुसर्या माश्यांवर वाढणार्या, सुरवंटांवर अंडी घालणार्या, कोळ्याच्या जाळ्यात कोळ्याच्या अंगावर अंड घालणार्या अशा अनेक जाती आहेत. पण अळीच्या वाढीची पद्धत साधारण अशीच असते.
उत्क्रांतीच्या प्रवासात विविध जीवांनी पिल्लांच्या पोषणासाठी आत्मसात केलेल्या ह्या विविध पद्धती खरंच अचंबीत करणार्या आहेत ह्यात शंकाच नाही. तेव्हा ह्यापुढे अशी एखादी खड्डा खणणारी माशी दिसली तर काहीतरी गुड न्यूज आहे हे नक्कीच !
लेखकःमकरंद केतकर