पक्ष्यांचा खून करणारे हे झाड तुम्हाला माहीत आहे का??
हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर यांच्यामधल्या उष्णकटिबंधीय पाण्याच्या प्रदेशात एक पिसोनिया नावाचं फुलझाड असतं. फुलांचं झाड म्हणजे ऐकायला तर मस्त वाटतंच, पण पाहायलाही मस्त असेल, असंच वाटतं ना? मग थांबाच. हे पिसोनिया नावाचं झाड अट्ट्ल सिरियल किलर आहे. ते ही थंडपणे बळींना आकर्षित करुन, त्यांचा हालहाल करुन खून करणारं. वाचूयात तर मग हे झाड खून नक्की करतं कसा आणि हा खून विनाकारण आहे असं संशोधकांचं म्हणणं का आहे?
हे झाड असा करतं खून..
या झाडाला शेंगा लागतात. या शेंगेच्या एका बाजूस हूकासारखा भाग असतो आणि त्या भलत्याच चिकट असतात. अर्थातच, या शेंगा पक्ष्यांच्या अंगाला चिकटतात. याप्रकारे इतक्या शेंगा पक्ष्यांना चिकटतात की त्यांना उडणं अवघड होऊन बसतं आणि जड होऊन ते खाली पडतात. मग साधारणत: पक्षी या पिसोनिया झाडातच अडकतात किंवा त्याच्या बुंध्याशी येऊन पोचतात. तिथंच ते पक्षी मरुन जातात. यामुळंच या झाडाला बर्डकॅचर म्हणजेच पक्षी पकडणारे असंही म्हटलं जातं.
बरं, असं करुन पक्ष्यांना शेंगांमध्ये गुरफटून टाकणारं हे काही जगात एकच झाड नाही, पण जितक्या जलद गतीनं या शेंगा पक्ष्यांना चिकटतात, त्याचा वेग मात्र इतर झाडांपेक्षा भलताच जलद असतो. फक्त तो पक्षी या झाडाजवळून गेला किंवा त्या शेंगांमध्येच पडला तरी या शेंगांचे हुक्स पटकन त्यांच्या शरीरात अडकतात. यात जर तो पक्षी लहान असेल तर तो शक्यतो मरतोच. मोठा असेल तर थोडाफार दूरपर्यंत जाऊ तरी शकतो.
( स्रोत )
हा पक्ष्यांचा खून विनाकारण कसा काय?
कॅनडातल्या ॲलन बर्गर यांनी तब्बल दहा महिने या झाडाचा अभ्यास केला. त्यात त्यांनी झाडावर अथवा झाडाच्या पायथ्याशी पक्षी मरण्यानं किंवा अशा बिया पक्ष्यांच्या शरीराला चिकटण्यानं पिसोनिया झाडाला खुद्द काही फायदा होतो का याचाही अभ्यास केलाय. त्यांना यात काही शक्यता असतील असं वाटलं होतं. उदाहरणार्थ पक्ष्यांच्या विष्ठेमुळं झाडाला खत मिळेल, पक्ष्यांचं शरीर कुजून त्यामुळं झाडाची वाढ होईल, पक्ष्यांच्या अंगाला चिकटून झाडाच्या शेंगा दूरदूरपर्यंत जातील आणि त्यामुळं त्याचं बीज परिसरात पसरायला मदत होईल, इत्यादी इत्यादी.. पण मग या ॲलन बर्गरला नक्की सापडलं काय?
या बर्गरना असं आढळून आलं की पक्ष्यांच्या मृत शरीराजवळ रुजलेल्या बिया या इतर बियांहून काही वेगळ्या असल्याचं दिसलं नाही. म्हणजे त्या काही जलद उगवल्या नाहीत किंवा ती झाडं काही खूप मोठी झाली असंही नाही. म्हणजेच पक्ष्यांच्या मृत शरीरातून या झाडाला वाढीसाठी काही मिळतं असं नाहीय. त्यापेक्षा जिथं पक्ष्यांची विष्ठा पडली होती, तिथली झाडे अधिक चांगली वाढत होती. याचाच अर्थ, हे पक्षी मेल्यापेक्षा त्यांचं जिवंत असणं अधिक चांगलं होतं.
नंतर या बर्गरनी या पिसोनियाच्या शेंगा समुद्राच्या पाण्यात सोडल्या. त्यांना हे पाह्यचं होतं की हे बी दुसऱ्या बेटांवर जाऊन तिथं रुजून बीजप्रसार होतो की कसे. पण या शेंगा दुसऱ्या बेटावर पोचण्याआधीच चार-पाच दिवसांतच सडून कुजून गेल्या. म्हणजे या पक्ष्यांच्या मृत शरीरावर बसून या शेंगा दुसऱ्या बेटांपर्यंत पोचल्या असत्या तरी त्या तिथं पोचण्याआधीच त्या सडून कुजून गेलया असत्या आणि तिथं त्या रुजूच शकल्या नसत्या.
यावरुन बर्गरने असा निष्कर्ष काढला की, कदाचित जिवंत पक्ष्यांच्या शरीराला चिकटून या झाडाची बीजे दूरवर जाऊ शकतात. पण एकतर शेंगा खूपच चिकट असल्यानं आणि या शेंगांचे गुच्छच गुच्छ असल्यानं त्याचा परिणाम विपरित होतो आणि खूप जास्त शेंगा चिकटल्याने जड होऊन ते पक्षी उडू शकत नाहीत आणि मरुन जातात.
असो, या पिसोनिया संबंधित बऱ्याच प्रश्नांची उत्तरं संशोधकांना मिळायची आहेत. या निसर्गात आणखी बरीच गुपितं दडली आहेत..