जगात या ठिकाणी सर्वात आधी माकडाचं माणसात रूपांतर झालं!!
डार्विन आणि इतर वैज्ञानिकांच्या मते माणूस हा आफ्रिकेतून निघून संपूर्ण जगात पसरला. हा माणूस म्हणजे शास्त्रीय भाषेत ‘होमोसेपियन’. आजवर एवढी माहिती आपल्याजवळ होती, पण आता नवीन संशोधनामुळे हे समजलं आहे की तो माणूस आफ्रिकेच्या नेमक्या कोणत्या भागातून बाहेर पडला. हे ठिकाण म्हणजे आजचा बोट्स्वाना देश.
पूर्ण उत्क्रांत झालेला माणूस म्हणजे होमोसेपियन हा तब्बल २ लाख वर्षापूर्वी बोट्स्वानातील झाम्बेझी नदीच्या काठावर राहायचा हे संशोधनात आढळलं आहे. होमोसेपियन या ठिकाणी जवळजवळ ७०,००० वर्ष राहिले असं म्हटलं जात आहे.
झाम्बेझी नदी, बोट्स्वाना याच ठिकाणी माणसाची उत्क्रांती का झाली ?
नेमक्या याच ठिकाणी आजचा माणूस कसा तयार झाला याचं उत्तर तिथल्या हवामानात आहे. हा भाग त्यावेळी सर्वात सुपीक होता. त्यामुळे इथे माणसाची वाढ झाली. पुढच्या काही हजार वर्षांनी पृथ्वीच्या अक्षात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे हवामानात बदल झाला. पर्जन्यमान लक्षणीयरीत्या बदललं. परिणामी झाम्बेझी नदी आणि आजूबाजूच्या भागांव्यतिरिक्त इतर भागातही सुपीकता आली. याचा दुसरा परिणाम म्हणजे माणूस इतर ठिकाणी स्थलांतरित होऊ लागला.
हे स्थलांतर २ टप्प्यात झालं. पहिल्या टप्प्यातील माणसं ही आफ्रिकेच्या ईशान्य भागाकडे वळली, तर दुसर्या टप्प्यातील माणसं ही नैऋत्य भागाकडे वळली. उरलेल्या माणसांनी आफ्रिकेतच राहणं पसंत केलं. या लोकांचे अंश सध्याच्या कलाहारी वाळवंटातल्या माणसांमध्ये आढळतात.
संशोधन कसं पार पडलं?
या संशोधनात झाम्बेझी नदीच्या भागात राहणाऱ्या माणसांचे माइटोकॉन्ड्रियल DNA आणि mtDNA टेस्ट घेण्यात आले. mtDNA हा प्रकार आईकडून मुलाला मिळत असतो. हा क्रम अनेक पिढ्या बदलत नाही. या संशोधनात mtDNA टेस्टने बरीच मदत केली.
mtDNA टेस्टमधून मिळालेली माहिती आणि जगातील सर्वात प्राचीन मानववंश समजल्या जाणाऱ्या सहारा वाळवंटाच्या उपविभागातील जमातींची माहिती, तसेच हवामान भौतिकशास्त्रातील संशोधन, यांच्या आधारे हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
मंडळी, एवढी ठाम माहिती मिळालेली असली तरी विज्ञान हे रोजच नवीन गोष्टी घेऊन येत असतं. मानव उत्क्रांतीत अशा नवनवीन माहिती येतच राहतील आणि ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा.