computer

एका मराठी गाडीवानामुळे शक्य झाली जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी !!

माणसाचा इतिहास युद्धाच्या रक्तपाताने रंगलेला आहे. आधी फक्त स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडणारा मानव जेव्हा समूहाच्या माध्यमातून दुसऱ्या मानव समूहाशी लढायला लागला, तेव्हा युध्दाचा जन्म झाला. युद्ध म्हणजे विध्वंस, रोगराई, दारिद्र्य, वाताहात याच्या वर्णनांनी इतिहासाची पाने भरून गेली आहेत. मात्र युध्दांनी मानवजातीला  एक देणगी दिली आहे.  ती म्हणजे प्रत्येक युद्धात वैद्यकीय शास्त्र विकसित होत गेले.

आज आम्ही तुम्हाला जगातल्या पहिल्या प्लास्टिक सर्जरीबद्दल अशी माहिती देणार आहोत जी झाली युरोपात, पण त्याचे मूळ होते प्राचीन भारतीय वैद्यक शास्त्रात !

१८१५ ‘जोसेफ कॉन्स्टन्टीन कार्प्यू’ या सर्जनकडे एक सैन्याअधिकारी आला होता. जवळजवळ ८ वर्षे पाऱ्याची इंजेक्शन्स घेऊन त्याचे नाक गळून पडले होते. त्याच्या नाकाच्या जागी फक्त हाडे दिसत होती. डॉक्टर जोसेफने त्याच्या कपाळावरची कातडी काढून नाकाच्या जागी लावली. हे ऑपरेशन १५ मिनिटे चाललं. आज जसं ऑपरेशनच्या वेळी अनेस्थेशिया देतात तसं त्यावेळी नव्हतं. तीन दिवसांनी त्या अधिकाऱ्याच्या तोंडावरची पट्टी काढण्यात आली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेला त्याचा मित्र आश्चर्याने ओरडला “त्याचं नाक परत आलं...."!!! ही होती जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी.

(जोसेफ कॉन्स्टन्टीन कार्प्यू)

मंडळी, जोसेफ कॉन्स्टन्टीन कार्प्यू यांना ही प्लास्टिक सर्जरीची विद्या युरोपमध्ये राहून सुचलेली नव्हती. त्या मागे त्यांनी भारतात येऊन केलेला भारतीय वैद्यकशास्त्राचा अभ्यास होता. त्यांना भारतीय वैद्यकशास्त्राचा अभ्यास का करावासा वाटला यामागे पण एक गोष्ट आहे.

ती गोष्ट आहे १७९५ च्या काळातली. कोसाजी नावाचा गाडीवान होता. टिपू सुलतान आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या तिसऱ्या अँग्लो-म्हैसूर युद्धात ब्रिटिशांचे सामान वाहून नेण्याचे काम त्याने घेतले होते.  युद्धाच्या रणधुमाळीत तो टिपू सुलतानाच्या हातात सापडला. टिपू सुलतानाने त्याचा एक हात कलम केला आणि त्याचे नाक छाटून त्याला हाकलून दिले. ब्रिटिशांनी त्याला औषधपाणी केले. हाताची जखम भरून आली, पण नाकावर शस्त्रक्रिया करण्यास कोसाजीने नकार दिला. छाटलेले नाक पूर्ववत करण्याची किमया पुण्यात आहे असे सांगून तो कर्नाटकातून पुण्याला आला.

पुण्यात त्या काळी कुमार नावाचा एक वैद्यक आयुर्वेदीय पद्धतीने शस्त्रक्रिया करायचा. कुमार वैद्याने त्याच्या कपाळावरची त्वचा काढून त्याच्या नाकावर रोपण केले. कोसाजीचे नाक काही दिवसांतच पूर्ववत झाले. ब्रिटिशांसाठी हे एक नवलच होते. त्यांनी या शस्त्रक्रियेची इत्थंभूत माहिती इंग्लंडला पाठवली. सोबत कोसाजीचे एक पोर्ट्रेट तयार करून इंग्लंडला पाठवले. थोड्याच दिवसात इंग्लंडमधील जेन्टलमन्स मॅगझिनमध्ये ही कथा प्रसिद्ध झाली. साल होतं १७९५. ही कथा वाचून डॉक्टर ‘जोसेफ कॉन्स्टन्टीन कार्प्यू’ यांना इतकं कुतुहल वाटलं की ते भारताकडे रवाना झाले. पुढील जवळजवळ २० वर्षें त्यांनी भारतातल्या पारंपारिक प्लास्टिक सर्जारीवर अभ्यास केला. असं म्हणतात की ते कुमार वैद्यला भेटले आणि त्याच्याकडूनच प्लास्टिक सर्जरी शिकून घेतली. पुढे १८१५ साली त्यांनी मायदेशी परतून पहिली यशस्वी सर्जरी केली. 

भारतात प्लास्टिक सर्जरीची गरज का होती ?

प्राचीन भारतात व्यभिचार, चोरी आणि देशद्रोह अशा गुन्ह्यांत शिक्षा म्हणून नाक छाटण्याची शिक्षा फर्मावली जायची. कौटिल्याच्या ग्रंथामध्येही असे उल्लेख आहेत. छाटलेल्या नाकावर उपाय म्हणून त्याकाळी कपाळावरची त्वचा काढून त्याचे त्वचारोपण केले जायचे. अनेक प्राचीन भारतीय ग्रंथांत अशा शस्त्रक्रियांचे उल्लेख आहेत.

अशारीतीने कापलेले नाक पूर्ववत करण्याच्या शस्त्रक्रियेला “Rhinoplasty” म्हणतात. डॉक्टर जोसेफ कार्प्यू यांनी केलेल्या शस्त्रक्रियेचा लिखित स्वरुपातील पुरावा कोसाजी नावाच्या एका गाडीवानाच्या पोट्रेटसह आजही ब्रिटीश म्युझियममध्ये पाहायला मिळतो.

त्या पोर्ट्रेटच्या सोबत जी माहिती दिली आहे त्यात हे सर्व उल्लेख वाचायला मिळतात. (त्यामधील त्याच्या नावाचे स्पेलिंग वाचून त्याचे नाव कोसाजी नसून 'कौसाजी' असावे असे वाटते)

याच लेखात तो मूळ इंग्रजी संदर्भ जशाच्या तसा देत आहोत.

Portrait of Cowasjee, 'a Mahratta of the cast[e] of husbandmen' and bullock driver with the British army in the Third Anglo-Mysore War, who had his nose cut off while a prisoner of Tipu Sultan, the nose then being reconstructed using a flap of skin brought down from the forehead; bust portrait of Cowasjee, three-quarters to right, looking to front, wearing turban and drape over his left shoulder, traces of scarring on his forehead; below, diagrams of the skin graft and the wax plate used to cut the correct shape of skin needed for the reconstruction. 1795
Stipple

तर मित्रांनो, यावरून हे लक्षात येतं, भारतीय संस्कृतीचा इतिहास इतका पुरातन आहे की जेव्हा इतर जग अज्ञानाच्या अंधारात होते तेव्हा भारतात वैद्यक शास्त्र पूर्ण प्रगत झाले होते. 
पुढच्या भागात पाहू ज्यांचे मूळ युद्धात आहे अशा वैद्यक शास्त्रातील अनेक घटना..

सबस्क्राईब करा

* indicates required