computer

‘ब्लॅक बॉक्स’ म्हणजे काय ? विमानात ब्लॅक बॉक्स महत्वाचा का असतो ??

विमान अपघात आता नेहमीचेच झाले आहेत. कुठल्याही विमान अपघातानंतर तो कसा आणि का झाला याची कारणे शोधणे गरजेचे असते. कारण समजले तर ज्या चुकीने तो अपघात झाला ती चूक भविष्यात टाळता येऊ शकते. पण मग ते कारण शोधणार कसं? तर मंडळी, त्यासाठीच ‘ब्लॅक बॉक्स’ नावाची वस्तू विमानात ठेवलेली असते. 

तुम्ही कित्येक वेळा बातम्यांमध्ये ब्लॅक बॉक्स हे नाव ऐकले असेल. विमान कोसळल्यानंतर त्याच्या अवशेषांमध्ये ब्लॅक बॉक्सचा कसून शोध घेतला जातो. हा कधी सहज सापडतो तर कधी अनेक दिवसांच्या, महिन्यांच्या प्रयासाने सापडतो. पण हा सापडेपर्यंत शोधमोहीम थांबवली जात नाही. नेमकं असतं काय यात? हा बॉक्स इतका महत्वाचा का आहे? चला तर मग जाणून घेऊयात… 

मंडळी, ब्लॅक बॉक्स म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर एक काळ्या रंगाचा चौकोनी डबा आला असेल. पण नाही, ब्लॅक बॉक्स असतो नारिंगी रंगाचा. शोधण्यास सोपं जावं आणि पटकन नजरेस पडावं म्हणून याचा रंग भडक नारिंगी ठेवण्यात आला असतो. पण मग याला ब्लॅक बॉक्स का म्हणतात? तर या मागचं कारण असं की सन 1939 मध्ये हवाई अभियंता फ्रांकिस हुजनोट याने असं यंत्र बनवलं जे विमानातल्या घडामोडी रेकॉर्ड करू शकेल. त्यात फोटो काढण्याची सुद्धा व्यवस्था होती. परंतु त्या काळात फोटो काढण्यासाठी आणि ते डेव्हलप करण्यासाठी अंधार असणे गरजेचे होते. फोटो फिल्म वर प्रकाश पडला तर ती फिल्म खराब होऊन जाई. म्हणून फ्रांकिस ने या बॉक्सला अंधारात ठेवण्याची व्यवस्था केली आणि हा बॉक्स नंतर ब्लॅक बॉक्स नावाने ओळखला जाऊ लागला.

विश्वयुद्धामध्ये अनेक विमाने अपघातग्रस्त झाली आणि त्या अपघातामागे काय कारण आहे हे तपासणे गरजेचे बनले. नंतर एका जेट विमानाच्या अपघातात ऑस्ट्रेलियाच्या वॉरेन डेव्हिड नावाच्या संशोधकाला त्या मागचे कारण शोधण्याचे काम देण्यात आले. डेव्हिडच्या मनात आले की अपघात घडण्यापूर्वी काही मिनिटे कॉकपिट मध्ये काय संभाषण झाले हे समजले असते तर कारण शोधणे अतिशय सोपे झाले असते. मग त्याने चुंबकीय स्टील वायर आणि बॉबीनचा वापर करून असे यंत्र तयार केले जे आवाज रेकॉर्ड करू शकेल. त्याचीच सुधारित आवृत्ती म्हणजे आज वापरण्यात येणारे ब्लॅक बॉक्स.

(वॉरेन डेव्हिड)

1960 मध्ये प्रत्येक लढाऊ आणि प्रवासी विमानाला ब्लॅक बॉक्स बसवणे अनिवार्य केले गेले. फोटोग्राफीक फिल्म आणि चुंबकीय वायरच्या जागी आधुनिक स्टोरेज डिव्हाईस आले. ब्लॅक बॉक्स वापरासंबंधी काही नियम घालून देण्यात आले. आता त्याचा रंग ब्लॅक न ठेवता नारिंगी, लाल किंवा पिवळा असा ठेवण्यात येऊ लागला. तसेच चौकोनी आकाराच्या ऐवजी गोल किंवा सिलिंडर सारखा आकार करण्यात आला. बाहेरच्या बाजूने ठळक अक्षरात सूचना लिहिली जाऊ लागली - ‘फ्लाईट रेकॉर्डर- डू नॉट ओपन’. सूचना लिहिण्याचे कारण असे की, अपघातानंतर हा बॉक्स कुणा सर्वसामान्य व्यक्तीच्या हाती पडला आणि त्याने तो उघडला तर आतमधली अत्यंत महत्वाची माहिती नष्ट होण्याचा धोका असतो.

मंडळी, या ब्लॅक बॉक्स मध्ये दोन युनिट असतात. एक असते फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि दुसरे असते कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. डेटा रेकॉर्डर हे पंचवीस तासांचा डेटा रेकॉर्ड करू शकते ज्यात विमानाचा वेग, अक्षांश रेखांश, इंजिनाची स्थिती, हवामान इत्यादी बऱ्याच गोष्टी समाविष्ट असतात. व्हॉइस रेकॉर्डर हे डिव्हाईस वैमानिकांचे आपापसातील संभाषण रेकॉर्ड करते. आपत्कालीन स्थितीत त्यांनी नेमकी कोणती पाऊले उचलली याची माहिती यातून समजते. वैमानिकांसोबतच इतरही आवाज रेकॉर्ड केले जातात. जसे की, फ्लाईट अटेंडन्टचे आवाज, विमानात वाजलेले अलार्म, बोर्ड आवाज, इत्यादी.

मंडळी, हे ब्लॅक बॉक्स अतिशय मजबूत असतात बरं. यांना विमानात बसवण्याआधी यांची अतिशय कठोर चाचणी केलेली असते. मोठे धक्के पचवण्याची क्षमता, आगीतून वाचण्याची क्षमता, दीर्घकाळ पाण्यात राहण्याची क्षमता आणि अश्या विपरीत परिस्थिती मध्येही आपल्या आतील माहिती सुरक्षित ठेवण्याची क्षमता इत्यादी चाचण्या यशस्वीपणे पार पडल्यानंतरच ब्लॅक बॉक्स विमानात दाखल होतो.

तर मंडळी, कशी वाटली ही माहिती? कमेंटस मध्ये कळविण्यास विसरू नका. आणि हो, शेअर करण्यासही विसरू नका.

 

 

लेखक : अनुप कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required