ओदिशामधले काही वाघ काळे का आहेत? संशोधनाने उलगडलेलं याचे रहस्य तर वाचा...
ओदिशामधले काही वाघ काळे का आहेत? संशोधनाने उलगडलेलं याचेही रहस्य तर वाचा...
कॅप्शन: भारतात एकूणच वाघांची संख्या मर्यादित आहे, त्यांना वाचवण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. काळा वाघ ही दुर्मिळ प्रजात फक्त फोटोपुरती राहू नये हीच आशा बाळगूया.
गेल्या वर्षीच एका हौशी फोटोग्राफरने दुर्मिळ काळ्या पट्ट्याच्या वाघाचा फोटो कॅमेरात कैद केले होते आणि ते फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. ती बातमी तुम्ही नक्कीच वाचली असेल . काळ्या रंगाचे वाघ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटले असेलच. हो! कारण आतापर्यंत पिवळा किंवा पांढरा वाघ आपण पहिला असेल. आज पाहूयात की नक्की काय कशामुळे या वाघांच्या अंगावर असे काळे पट्टे आहेत? याचे गूढ नुकतेच उकलण्यात आले आहे.
या प्रजातीचे वाघ ओदिशामध्ये दिसून येतात. यांना मेलानिस्टिक वाघ (Melanistic Tiger) असे नाव आहे .दिवसेंदिवस या वाघांची संख्या कमी होत आहे. मुळात वाघच अगदी थोड्याफार प्रमाणात अस्तित्वात आहेत. त्यातच वाघाची ही दुर्मिळ प्रजात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
बँगलोरच्या नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस (एनसीबीएस) मधील शास्त्रज्ञ उमा रामकृष्णन आणि त्यांचा विद्यार्थी विनय सागर यांच्या टीमने यावर संशोधन केले आहे. या संशोधनात त्यांना असे आढळून आले आहे की हा रंग एका विशिष्ट जनुकातील उत्परिवर्तनामुळे उद्भवतो. म्हणजे जनुका(जीनस् )मध्ये असलेले सिंगल म्यूटेशन. यामुळे त्यांचे अंगावरचे पट्टे रुंद होतात आणि कधीकधी ते पूर्णपणे काळे दिसतात. अशा वाघांमधील असामान्यपणे गडद किंवा काळा कोट याला स्यूडोमेलॅनिस्टिक किंवा खोटे रंग म्हणतात. उमा रामकृष्णन म्हणतात की, या फेनोटाइपचे(प्रकार) अनुवांशिक आधार पाहण्यासाठी असा अभ्यास पहिल्यांदा केला गेला आहे. या प्रकारावर आधी पुष्कळ चर्चा झाल्या आहेत आणि लिहिलेही गेले आहे. परंतु प्रथमच त्याच्या अनुवांशिक आधाराची वैज्ञानिकदृष्ट्या तपासणी झाली. त्याद्वारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून काळा वाघ हे आकर्षणाचे केंद्र होते. संशोधकांनी भारतातील इतर वाघांचे अनुवांशिक विश्लेषण केले . पूर्ण डेटाच्या आधारे त्यांना हे दिसून आले की सिमिलीपालचे काळे वाघ हे वाघांच्या अगदी उत्पत्तीपासून कमी संख्येने आढळून आले आहेत. तसेच असे काळे वाघ इतर कोणत्याही ठिकाणी किंवा इतर कोणत्याही जंगलात आढळले नाहीत.
प्रोसीडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या जर्नलमध्ये सोमवारी हा अभ्यास प्रकाशित झाला. या संशधनामुळे ही दुर्मिळ जात संवर्धन करण्यास मदत होणार आहे. सिमिलीपाल अभयारण्यातील वाघ पूर्व भारतातील एक वेगळी ओळख आहे. त्यांच्या जनुकाचा प्रवाह अगदी मर्यादित आहे. जनुकातील या बदलामुळे मांजरींच्या इतर अनेक प्रजातींमध्ये, अगदी चित्त्यांमध्येसुद्धा पट्ट्यांच्या रंगात असेच बदल होतात. काळ्या वाघाच्या रंगात तीव्र बदल हा डीएनए वर्णमालामध्ये फक्त एका फरकामुळे होतो. इतर प्राण्यांत हा रंग बदल विशेष जाणवत नाहीत.
भारतात एकूणच वाघांची संख्या मर्यादित आहे, त्यांना वाचवण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. काळा वाघ ही दुर्मिळ प्रजात फक्त फोटोपुरती राहू नये हीच आशा बाळगूया.
शीतल दरंदळे