या 3 प्रयोगातून तुम्ही तुमच्या स्वप्नांना कंट्रोल करू शकता !!
मंडळी, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नांना कंट्रोल करता आलं तर ? आम्ही त्या स्वप्नांबद्दल बोलत नाही जे तुम्ही तुमच्या भविष्यासाठी बघता. आम्ही त्या स्वप्नांबद्दल बोलतोय जे तुम्हाला झोपेत पडतात.
राव, झोपेत पडणाऱ्या स्वप्नांवर आपलं कोणतंही नियंत्रण नसतं. ही बाब आता जुनी झाली आहे. तुम्ही तुमच्या स्वप्नांना काबूत ठेवू शकता, तुमच्या इच्छेप्रमाणे फिरवू शकता, आपल्याला हवं ते बघू शकता....पण कसं ? विज्ञानाकडे याचं उत्तर आहे !!
चला तर समजून घेऊया स्वप्नांच्या अद्भुत दुनियेला....
सुस्पष्ट स्वप्न (Lucid Dream)
मंडळी, स्वप्नांचा एक प्रकार म्हणजे ‘सुस्पष्ट स्वप्न’. म्हणजे काय तर, स्वप्न पडलेलं असताना आपल्याला हे माहित असणं की हे स्वप्न आहे. २०१६ च्या एका अभ्यासानुसार प्रत्येक माणसाला आयुष्यात एकदा तरी असं स्वप्न पडतंच. काही लोकांना तर महिन्यातून एकदा तरी अशी स्वप्न पडतातच. अशा स्वप्नांमध्ये वावरत असताना आपल्याला माहित असतं की हे आभासी विश्व आहे. जागृकावस्थेत आपण स्वप्न बघत असतो. १९७५ साली वैज्ञानिकांनी सुस्पष्ट स्वप्नाला पुष्टी दिली होती.
तर, वैज्ञानिकांचा दावा आहे की सुस्पष्ट स्वप्नांचा वापर करून आपण आपलं स्वप्न कंट्रोल करू शकतो. यासाठी ॲडलेड, ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला. या प्रयोगात त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने स्वप्न कसे काबूत ठेवता येईल हे शोधून काढलं.
हे प्रयोग पुढील प्रमाणे होते !!
१. वास्तविकता चाचणी
या प्रयोगात त्यांनी लोकांना स्वतःला विचारण्यास सांगितलं की ‘मी स्वप्नात तर वावरत नाहीये ना ?’. हे आठवडाभर दिवसातून १० वेळा तरी विचारलं पाहिजे असा नियम होता. त्याचबरोबर आजूबाजूंच्या गोष्टींमध्ये काही बदल दिसतोय का हेही त्यांना तपासायला सांगितलं. यासोबत एक विचित्र गोष्ट त्यांनी करायला सांगितली. “तोंड बंद करून श्वास घेणे”. हा प्रयोग यासाठी की स्वप्नात आपण बंद तोंडाने श्वास घेऊ शकतो कारण वास्तविक आपलं तोंड उघडं असतं.
२. ५ तासांची झोप
वैज्ञानिकांनी दुसऱ्या प्रयोगात लोकांना ५ तासांचा अलार्म लावायला सांगितला. ५ तास झोप झाली की उठायचं आणि तबल ७०० पानांचं पुस्तक वाचायचं. या पुस्तकाचा विषय होता, “जर तुम्हाला सुस्पष्ट स्वप्न पडलं तर काय कराल ?”. या पुस्तकात लिहिलं होतं की तुम्ही स्वप्नात आहात की नाही हे तपासल्यानंतर तुमच्या दोन्ही हातांचे टाळावे एकमेकांवर घासावेत आणि काय संवेदना होतायत याचा अनुभव घ्यावा. हे सगळं करत असताना मनात घोकत राहायचं की ‘हे एक सुस्पष्ट स्वप्न आहे’. पुस्तक वाचन झाल्यावर त्यांना पुन्हा झोपण्याची मुभा होती. पुढे जाण्याआधी एक महत्वाच्या मुद्दा जाणून घेऊया...
डोळ्यांची सतत उघडझाप होणारी झोप काय असते ?
मंडळी, झोपेचे २ प्रकार असतात एक असते शांत झोप आणि दुसरी असते डोळ्यांची सतत उघडझाप होणारी झोप. दुसऱ्या प्रकारच्या झोपेत आपल्याला स्वप्न पडतात, डोळ्यांची सतत उघडझाप होत राहते, या प्रकारच्या स्वप्नात आपले हात पाय एक प्रकारे लकवा मारलेल्या स्थितीत पोहोचतात पण मेंदू जागृत असतो. याच प्रकारात सुस्पष्ट स्वप्न पडण्याची जास्त शक्यता असते.
३. स्मरणशक्ती आणि सुस्पष्ट स्वप्न
वैज्ञानिकांनी या प्रयोगात एक वाक्य मनातल्या मनात घोळवत राहायला सांगितलं होतं. हे वाक्य होतं, “पुढच्यावेळी जेव्हा मी स्वप्न बघेन तेव्हा मी हे लक्षात ठेवेन की मी स्वप्न बघतोय.” जो पर्यंत झोप लागत नाही तोपर्यंत त्यांना हे वाक्य बोलत राहायचं होतं. उद्द्येश फक्त एवढाच की झोपण्याआधी त्यांचं शेवटचं वाक्य हेच असावं.
हे प्रयोग करण्यासाठी त्यांनी ३ ग्रुप केले होते. पहिल्या ग्रुप बरोबर फक्त १ क्रमांकाचा प्रयोग केला गेला. दुसऱ्या ग्रुप सोबत १ आणि २ असे दोन्ही प्रयोग केले गेले. तिसऱ्या ग्रुपला मात्र तिन्ही प्रयोग करावे लागले. प्रयोगाच्या आधी तिन्ही ग्रुप्सना हा प्रयोग करण्याच्या आधी पडलेल्या स्वप्नांबद्दल लिहिण्यास सांगण्यात आलं जेणेकरून प्रयोगातील बदल लक्षात येतील.
प्रयोगातून सिद्ध काय झालं ?
सहभागी लोकांना प्रयोग करण्यापूर्वी फक्त ८ टक्के सुस्पष्ट स्वप्न पडलं होतं. पण प्रयोग झाल्यानंतर या टक्केवारीत वाढ झाली.
पहिला ग्रुप : १० टक्क्यापेक्षा कमी सुस्पष्ट स्वप्नं
दुसरा ग्रुप : ११ टक्के सुस्पष्ट स्वप्नं
तिसरा ग्रुप : १७ टक्के सुस्पष्ट स्वप्नं
तिन्ही ग्रुप्स मध्यले जे लोक तिसऱ्या प्रयोगाच्या वेळी अवघ्या ५ मिनिटात झोपले त्यांना तब्बल ४६ टक्के सुस्पष्ट स्वप्नं पडली होती.
याचाच अर्थ तिसऱ्या प्रयोगात जिथे सतत घोकत राहायचं होतं की “पुढच्यावेळी जेव्हा मी स्वप्न बघेन तेव्हा मी हे लक्षात ठेवेन की मी स्वप्न बघतोय.” यशस्वी ठरलं.
हे कसं घडलं ?
तर त्याचं उत्तर आहे, जेव्हा आपण झोपण्याआधी म्हणतो की मी अमुक अमुक लक्षात ठेवेन तेव्हा आपलं मना हे गृहीत धरतं की आपण ते नक्कीच लक्षात ठेवू. प्रयोगात सामील लोकांनी स्वतःशी जेव्हा हे वाक्य सतत म्हटलं आणि लगेच झोपी गेले तेव्हा त्यांच्या मानाने पक्कं केलं होतं की आपण स्वप्न बघत असताना स्वप्नात आहोत हे लक्षात ठेवू. आणि अगदी तसंच झालं.
मंडळी या प्रयोगातून हे सिद्ध होतं की आपण झोपलेलो असताना स्वप्नात वावरू शकतो आणि हव्या तशा गोष्टी करू शकतो. पण अजूनही स्वप्न पूर्णपणे काबूत करण्यापासून आपण बरेच लांब आहोत. एकदा का हे शक्य झालं तर आपण झोपेतही अनेक कामं करू शकतो...भविष्यात हे सध्याही होईल....
मंडळी तूर्तास हे प्रयोग तुम्ही सुद्धा करून बघा आणि काय परिणाम समोर येतात ते आम्हाला सांगा !!